मर्सिडीजचा तारा म्हणतो , बळवंतराव होरा चुकला

पुढे दिलेली कविता ही पुलंच्या "उरलंसुरलं" या पुस्तकातील आहे.

मावळत नाही सुर्य आता पूर्वी जसा मावळत होता

खवळत नाही दर्या आता पूर्वी जसा खवळत होता

चौपाटीच्या दर्यामधले मासे सगळे वाहून गेले

पांगणाऱ्यांच्या पांगल्या होड्या कोळ्याचे तर तुटले जाळे

चौपाटिची भेळ आता पूर्वीसारखी खाववत नाही

शहाळ्यातले पाणी आता काही केल्या पेववत नाही

कश्तिवाला कावस बाबा आता जोडीत नाही हात

शेंगागंडेरीशी भांडून झाली पुरती वाताहात.

चौपाटीच्या सभेत आता आडवे बांबू करतात दाटी

स्विमिंगपूलशी गर्दी जमते तरण्यापेक्षा चरण्यासाठी

 'कडकचंपे' चंपीवाला चोळित बसतो आपलेच पाय

चौपाटीचा चणेवाला आपले चणे आपणच खाय!

पूर्वीच्या त्या पोरी आता आया होवून येतात इथे

त्यांच्या मागुन मागून फिरतात त्यांच्या तारुण्याची भुते

टिळकांचाही पुतळा आता सारे काही पाहून थकला

 मर्सिडीजचा तारा म्हणतो , बळवंतराव होरा चुकला

- पु. ल. देशपांडे.

पुलंचे व्यंगात्मक लेखनदेखील आपल्याला अंतर्मुख करून सोडते.त्यांची निरीक्षण शक्ती विलक्षण होती. या कवितेतील वर्णन हे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर चौपाटीचे चित्रण आहे.

माझी शंका या कवितेतील शेवट्या पंक्तीसंदर्भात आहे.

टिळकांच्या अथक परीश्रमानंतरअही पूर्वेकडील सांस्कृतिक आक्रमण थांबले नाही(मर्सिडीजचा तारा हे पाश्चीमात्य संस्कृतीचे प्रतिक) असे कवीला सुचवायचे आहे का?

(याच संदर्भातील 'टिळकांच्या पुतळ्याजवळ' ही कविता आठ्वली.ती पूर्ण कविता येथे कोणी देवू शकेल काय?)

माझ्या एका मित्राच्या म्हण्ण्यानुसार, पूर्वी थेट पुतळ्यासमोर युनायटेड मोटर्स चा मर्सिडीजचा तारा  होता.( तो ताराही आता नाही आणि मध्ये अनेक इमारती उठल्या आहेत) कदाचित कवीने त्या संदर्भात हा उल्लेख केला असेल???

पण होरा चुकला म्हणजे काय? ( टिळक विख्यात गणिती आणि 'होराभूषण' होते)

रसिक मनोगती प्रकाश टाकतील का?