तसे काहीच वेगळे नसते !

तसे काहीच वेगळे नसते... सारे काही तेच असते
'ती' भासू लागते 'देखणी' ...जेव्हा नजर सुंदर बनते !

तिच्या घराची वाट त्याला... वाटू लागतो राजरस्ता
मनात फुलत असतं 'गुपित'... स्वतःशीच हसता हसता
तिला 'जपणं'... तिचंच 'स्वप्न'... काळ वेळ काही नसते
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

कभी खुशी... कभी गम... कधी वाटून जाते हुरहूर
कभी दूर... कभी पास... तिचं लपणं... त्याची कुरबूर
ती 'नवी'... तीच 'हवी'... दुसरे काही नको असते
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

मग एक स्वप्न नवं... मनात त्याच्या साकारू लागतं
तिच्या नजरेत 'हिरो' होण्यास... मन त्याचं झुरू लागतं
ती 'दिशा'... तीच 'ध्येय'... एवढेच गणित त्याचे असते
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

मग सुरू होतो खेळ... नवा डाव... पाठलाग
स्वप्न गुलाबी बघता बघता... हळूच त्याला येते जाग
ती 'परी' होऊन कशी... त्याच्याचकडे बघत असते
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

'पत्र' खरं... की 'मित्र' खरा... त्याला काही सुचत नाही
दिसली कधी तरी तिला... 'विचारणं' मात्र जमत नाही
कशीबशी... त्याची-तिची... चुकून माकून भेट ठरते
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

'भेट' द्यावी... की 'गुलाब' द्यावा... त्याला सारखा पडतो संभ्रम
तिला कशाचीच गरज नसते... तिचे जादूभरे 'विभ्रम'
खुळे... लंगडे-लुळे होणे... त्याचे एकट्याचेच घडत असते
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

'ती' येते... भेट होते... त्याचे होऊन जाते 'फूल'
लाजत लाजत म्हणतो तो... 'कशी मला पडली भूल?
भूक नाही... तहान नाही... झोपही तशी क्वचित येते !'
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

'ती' मात्र गहिवरलेली... गोंधळलेली... बावरलेली...
'उगाच नको बघूस स्वप्न !'... म्हणतानाही घाबरलेली...
बोटामधली अंगठीच तिच्या... सारे काही बोलून जाते
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

रडवेला तो... चिडलेला तो... थोडा थोडा होतो अगतिक
तिला काहीच वाटत नव्हते... मीच झालो होतो 'विक'
उगाच कशाला माझे मन... तिच्यात एवढे गुंतले होते !'
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

दुसऱ्या दिवशी मित्र पुसती... 'काल कुठं होता गूल ?
कळत कसं बे नाही तुले... झाला कसा 'एप्रिलफूल'?
'हिची' नाही त 'तिची' अंगठी बोटात तिच्या असू शकते !'
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !

पुन्हा फुलू लागतं स्वप्न... पुन्हा होते 'नजर' नवी
पुन्हा म्हणू लागतं मन... 'ती' हवी, 'तीच' हवी...
आडोश्याला एक रुपडं... खुदूखुदू हसत असते
'ती' भासू लागते 'देखणी'... जेव्हा नजर सुंदर बनते !