संगीत

संगीत साधनेसाठी...

आजच्या "पुढारलेल्या' जमान्यात संगीत कला आत्मसात करणं खूप सोपं झालंय. म्हणजे फारसं अवघड राहिलेलं नाही. पूर्वी ही कला आत्मसात करण्यासाठी कोण कष्ट पडत होते! त्यासाठी काय काय करावे लागे, याचे किस्से वाचले की वाटतं. खरच पूर्वीच्या गायक, वादकांनी अतोनात कष्ट केले म्हणून तरी आपल्याला आज काही चांगलं ऐकायला मिळतं. तेव्हा जर का आजच्या सारखी गल्लीबोळात संगीत विद्यालये असती, तर आपण आज कुणाला "मोठी माणसं' म्हटलो असतो?

अंगभूत प्रतिभेच्या जोरावर संगीत क्षेत्रात स्वत:चे युग निर्माण करणारे संगीतकार सुधीर फडके यांनी संगीत साधनेसाठी केलेली वाटचाल अत्यंत खडतर होती. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक बापू वाटवे यांनी त्याची एक आठवण सांगितलेली आहे. कोल्हापूरमधील पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर बाबुजी संगीत साधनेसाठी मुंबईत आले. एका चाळीत त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली. भल्या पहाटे आन्हीक उरकून सार्वजनिक नळावर आंघोळ करायची आणि भायखळ्याच्या भाजी बाजारात हजर व्हायचे. फळे, भाज्या खरेदी करायच्या कधी भाड्याची सायकल घेऊन तर कधी पायी गिरगाव ते दादर दारोदार फिरुन भाजी विकायची. काहीवेळा जोडीला चहा पावडर असे. त्यातून मिळणाऱ्या पैशात बाबुजी गरजा भागवायचे. हा उद्योग आटोपला की संगीताच्या शिकवण्या करायच्या, मेळ्यातील गाण्यांना चाल लावून द्यायची. "हिज मास्टर्स व्हाइस' कंपनीत संगीतकारापासून म्युझिक हॉल साफ करण्यापर्यंत पडेल ते काम करायचे. असे अनेक कष्ट बाबुजींनी केले. दिवसभर गाऊन एक आणेली मिळाली तरी त्यावर त्यांनी समाधान मानले. मध्य प्रदेशातील एक गोंड राजाने बाबुजींच्या गाण्यावर प्रसन्न होऊन त्यांना त्याकाळी शंभर रुपयांची बिदागी दिली होती. पण एकदा पैशांची खूप निकड भासली म्हणून त्यांना पेटी आणि तंबोराही विकावा लागला होता.