महर्षी

"बर तर श्रीमान मॅजिस्ट्रेट, हिंदुस्थानी क्रांतिकारक आपल्या ध्येयासाठी मृत्युला कसे आनंदाने आलिंगन देतात हे प्रत्यक्ष पहाण्याचे भाग्य आज तुम्हाला लाभले आहे" हे होते शहिद भगतसिंहाचे उदगार दि. २३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी म्हणजे फ़ाशीच्या केवळ काही मिनिटे आधी काढलेले. फ़ाशीसाठी कोठडीतून बाहेर पडताना ते तिघे ज्या रुबाबात गाणी गात आणि एकमेकाचे हातात हात घालुन आले आणि ते निघाल्याचे वर्तमान लाहोर तुरुंगातील समस्त बंदींना समजताच ज्या प्रचंड आवाजात त्यांनी या तिघांचा जयजयकार केला त्यामुळे फ़ाशी देण्यास जमलेले इंग्रज थीजून गेले होते. अखेर स्वत:च्या हाताने फ़ास गळ्यात घालुन घेत आणि मातृभूमिचा जयघोष करित ते तिघे सायंकाळी ७.३३ ला फ़ाशी गेले. २४ ची फ़ाशी जनक्षोभाच्या भितीने आदल्याच संध्याकाळी सर्व नियम धाब्यावर बसवून सूर्यास्तानंतर अमलात आणली गेली. पण त्यांचा दरारा मृत्युनंतरही कायम होता. त्यांच्या अंत्यायात्रेच्या प्रसंगी भडका उडून परिस्थिती हाताबाहेर जाइल आणि शिवाय या हुतात्म्यांना अधिक महत्त्व, अधिक लोकप्रियता लाभेल म्हणून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता परस्पर जाळुन टाकाचा निर्णय घेतला गेला. लाहोर तुरुंगाच्या मागच्या बाजुचे लोहारकामाचे निर्माण गृहाची भींत फ़ोडून चोर वाट तयार झाली. रात्री काळोख पडताच पोलिसांच्या लॉर्‍या हे मृतदेह आणि जाळाचे सामान घेउन निघाले. फ़िरोजपूर रस्त्यावर कैसर-ए-हिंद पुलानजिक त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून घाइघाइने अग्नी दिला गेला.


१८५७ ते १९४७ च्या दरम्यान असंख्य देशभक्तांनी आहुती दिली. या सर्वात अग्रपूजेचा मान भगतसिंहाचा का? कारण भगतसिंहाने हुतात्म्यांच्या हौतात्म्याला प्रतिष्ठा आणि औचित्य प्राप्त करुन दिली. आधी गोर्‍या व मग काळ्या इंग्रजांनी तमाम क्रांतीकारक म्हणजे हिंस्त्र, खूनी, दरोडेखोर वा अगदी तसे थेट म्हणता नाही आले तर 'पथभ्रष्ट' असा अपप्रचार केला होता. मात्र बॉम्ब सारख्या संहारक अस्त्राचा अत्यंत अहिंसक मार्गाने वापर करुन भगतसिंहाने चमत्कार घडवीला. तरीही त्यांचा उपेक्षापूर्वक उल्लेख करणार्‍यांना त्याची दाद द्यावीशी वाटली तर नाहीच, पण ते अधिक लोकप्रिय झाले तर आपले काय या न्यून गंडाने पछाडलेल्या प्रस्थापित नेत्यांनी जमेल तशी अवहेलना मात्र केली. तरीही भगतसिंहांचे उद्दिष्ट साध्य झालेच. निरुपद्रवी बॉम्ब्स्फ़ोटाने स्वत:वर अभियोग करण्यास सरकार ला भाग पाडाचे आणि जनतेसमोर अभियोग उभा रहाताच आपले तत्त्व, आपले ध्येय, आपला विचार तमाम माध्यमांमार्फ़त सार्‍या जगापुढे आणायचे उद्दिष्ट होते आणि ते पुर्णत: साद्ध्य झाले. धाडसी व देशभक्त या पलिकडे भगतसिंह कुणाला फ़ारसा माहित नाही. पण भगतसिंह हा एक तत्त्ववेत्ता, वक्ता, अभ्यासू व समाजवेत्ता असा सर्वसमावेशक नेता होता. सावरकर व शिवाजी ही श्रद्धास्थाने असलेल्या भगतसिंह 'रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले' या उक्तिचा खंदा पुरस्कर्ता होता. १८५७ चे स्वातंत्र्य समर ह्या सावरकरांच्या बंदी असलेल्या ग्रंथाचे त्याने धाडसाने व चातुर्याने पुनरमुद्रण व वितरण केले होते.


संसदेत बॉम्ब्स्फ़ोटाच्या बरोबर जी पत्रके फ़ेकली गेली, त्यातली पहिलीच ओळ अशी होती कि 'बहिर्‍या कानांवर पडण्यासाठी मोठ्या आवाजाची आवश्यकता असते'. हे वाक्य सुप्रसिद्ध फ़्रेंच क्रांतिकारक विलाँ याचे होते. भगतसिंहानी जगातील अनेक देशांमध्ये घडलेल्या क्रांतिंचा सखोल अभ्यास केला होता. अभियोगाला उत्तर देताना "मी काही वक्ता नाही, माझे इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व नाही वा मला कायद्याचे ज्ञानही नाही" अशी सुरुवात करत आपल्या मुद्देसूद भाषणाने इंग्रजी न्यायव्यवस्थेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. हेतू लक्षात न घेता जर एखाद्या कृत्याला आरोपाचे स्वरूप द्यायचे तर राजस्व अधिकारी हे लुटारू ठरतात आणि न्यायाधिश हे खुनी ठरतात या त्यांच्या युक्तिवादाने सरकार निरुत्तर झाले. मात्र स्वत: आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहून स्वत:वर अभियोग निर्माण केला तर सत्य जगापुढे येते हा सिद्धांत त्यांनी यशस्वी सिद्ध केला आणि १५ वर्षांनंतर आझाद हिंद फ़ौजेच्या विरांनीही याच प्रमाणे स्वत:ला अटक करून घेत स्वत:वर राजद्रोहाचा  अभियोग चालविण्यास इंग्रज सरकारला भाग पाडले अन्यथा नेताजी आणि आझाद हिंद फ़ौजेला 'गद्दारांची सेना' ही अपकिर्ती कायमची  सहन करावी लागली असती.


आपले जीवन ध्येय निश्चीत करुन त्यानुसार वाटचाल करणारा आणि त्याची किंमत खुशीने मोजणारा भगतसिंह हा एक महर्षी होता.