अब्दुल करीम खाँ यांची ठुमरी : 'पिया बिन नहीं आवत चैन...'

पिया बिन नहीं आवत चैन...
भक्‍ती, प्रेम, विरह या भावना झिंझोटी राग व्यक्त करतो. पण झिंझोटीतील विरह आक्रोश करीत नाही आणि त्यातील प्रेमाला दिखाऊपणा नाही. या भावना एखाद्या विश्‍वासाच्या आधारावरच व्यक्त होतात. अब्दुल करीम खॉं यांची "पिया बिन नहीं आवत चैन' ही झिंझोटी रागातील ठुमरी त्याचे उत्तम उदाहरण आहे. या ठुमरीबद्दलची एक आठवण सैगलने आपल्या चरित्रात सांगितली आहे. खॉंसाहेबांची ही ठुमरी 1931 मध्ये रेकॉर्ड झाली आणि प्रचंड गाजली. त्यानंतर 1935 मध्ये हीच ठुमरी "देवदास' या चित्रपटात वापरण्यात आली. मात्र, ती गायली सैगलने! सैगलने अप्रतिम गायलेली ही ठुमरी खॉंसाहेबांच्या दोस्तांनी ऐकली आणि खॉंसाहेबांनीही ती ऐकावी, असा हट्ट त्यांच्याकडे धरला. खॉंसाहेबांनी आपल्या 63 वर्षांच्या आयुष्यात कधीही सिनेमा पाहिला नव्हता. परंतु, दोस्तांच्या आग्रहाखातर ते "देवदास' पाहण्यासाठी गेले आणि त्यातील सैगलने गायलेली ठुमरी ऐकून ओक्‍साबोक्‍शी रडले. झिंझोटीतील आर्तता आणि सैगलच्या गायकीतील भावार्तता यांना खॉंसाहेबांकडून मिळालेले हे एक प्रशस्तिपत्रच म्हणावे लागेल. सिनेमा पाहिल्यानंतर खॉंसाहेबांनी सैगलाचा पत्ता शोधला. एकदिवस त्याच्या घरी गेले आणि त्याला ती ठुमरी अनेकवेळा गायला सांगितली. पुन्हा भेटू म्हणून त्यादिवशी खॉंसाहेबांनी सैगलाचा निरोप घेतला. पुन्हा मात्र त्यांची कधीही भेट होऊ शकली नाही. पहिली भेट हीच त्यांची शेवटची भेट ठरली. कारण महिनाभरातच खॉंसाहेबांचे अचानक निधन झाले. पुढे 1938 मध्ये अलाहाबादला शास्त्रीय संगीत समारोह झाला. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या संगीत महोत्सवास हजेरी लावली. परंतु खॉंसाहेबांची अनुपस्थिती प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जात होती. त्यावेळी त्यांच्या आठवणीने व्याकूळ होऊन सैगलने "पिया बिन नहीं आवत चैन' ही ठुमरी पेश करून खॉंसाहेबांना आदरांजली
वाहिली.