यशस्वी उड्डाण : उपग्रहाचे (आणि उपग्रहनयन व्यवसायाचे)

भारताने १९६३ मध्ये अंतराळ कार्यक्रम सुरू केला आणि  स्वदेशी उपग्रह घडवून स्वदेशी अग्निबाणांचा वापर करून अंतराळात यशस्वीरीत्या पाठवले. सगळे स्वतःच बनवल्यामुळे परावलंबित्व आले नाही. १९८० मध्ये पहिला ३५ किलो वजनाचा स्वदेशी उपग्रह अशा प्रकारे स्वदेशी अग्निबाणाकरवी अंतराळात पाठवला गेला. (आर्यभट्ट?)

हे सगळे सांगायचे कारण म्हणजे भारताने (अंतरिक्ष कार्पो. बंगळूर) काल इस्रायलचा ३०० किलो वजनाचा हेरक उपग्रह श्रीहरिकोट्याहून अंतरिक्षात यशस्वीरीत्या पाठवला. आणि २० मिनिटांनी कार्यकारी संचालक के आर सिद्धार्थ मूर्तींनी संपूर्ण व्यापारी तत्त्वावर अशा प्रकारचे हे दुसरे उड्डाण यशस्वी झाल्याचे सांगितले. (ह्याआधी गेल्या वर्षी इटलीच्या उपग्रहाला (११दशलक्ष डॉ शुल्क आकारून!) यशस्वीरीत्या पाठवले होते! ) हा उपग्रह इस्रायलने बनवलेला उपग्रह (इस्रायलचा पहिलाच) ढग असोत नसोत, दिवस असो वा रात्र, कुठल्याही ऋतूत ...  सातत्याने निरीक्षण करू शकतो, आणि चित्रे पाठवू शकतो.

भूराजकीय संवेदनशीलतेमुळे हे सर्व गुप्ततेने केले गेले. उड्डाणानंतर ८० मिनिटांनी जेरुसलेममधील तळावर त्याने पाठवलेला संदेश मिळाला आणि उड्डाण यशस्वी झाले असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्ष चित्रे यायला अजून १४ दिवस लागतील. धुवीय उपग्रहनयन वाहनाने आतापर्यंत ओळीने ११ कामगिऱ्या यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत. अशाच वाहनाचा वापर करून भारताचे चांद्रयान -१ ह्या वर्षाच्या अंतापर्यंत जायचे आहे.

उपग्रहनयन व्यवसायाची उलाढाल येत्या दहा वर्षांत सुमारे १४५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे हे उड्डाण व्यावसायिक दृष्ट्या फार महत्त्वाचे मानले जाते. भरवसा वक्तशीरपणा आणि खर्च ह्या सर्व बाबतीत भारताची कामगिरी योग्य असल्याचे सांगतात. व्यापारी उपग्रहनयनाच्या व्यवसायात भारताला अमेरिका, रशिया, युक्रेन, चीन आणि युरोपीय अंतरिक्ष संस्थांशी स्पर्धा करावी लागणार आहे. भारतीय उड्डाणाला इतरांच्या केवळ ६० ते ७० टक्केच खर्च येत असल्याने त्याचा फायदा भारताला मिळेल असे वाटते.

हे सगळे पाहता, भारताने उपग्रहाच्या व्यापारी उड्डाणाच्या व्यवसायात यशस्वी उड्डाण केले आहे असेच म्हणावे लागेल.

हे सगळे मी जालावरच वाचले दुवा क्र. १ चित्रही तेथूनच ओढलेले आहे.


अवांतर : हा उपग्रह इस्रायलने इराणच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सोडलेला आहे असेही कळते. येथे वाचाः दुवा क्र. १