शुभानन गांगल यांचा "मराठी - एक मुक्त भाषा" हा लेख

आजच्या (१७-०२-०८) 'लोकसत्ता'त प्रकाशित झालेला श्री. शुभानन गांगल यांचा "मराठी - एक मुक्त भाषा" हा लेख वाचून मला एक सामान्य वाचक म्हणून पडलेले काही प्रश्न, सुचलेले काही मुद्दे, व काही आक्षेप इथे चर्चेसाठी मांडत आहे.

"मराठी शुद्ध लेखनात चूक न होणारी व्यक्ती सापडणे कठीण आहे."

या वाक्यात 'शुद्धलेखनात' असे न लिहिता "शुद्ध लेखनात" असे फोड करून लिहिण्याचे प्रयोजन काय? 'शुद्धलेखन' या नामाचे 'शुद्ध लेखन' असे दोन शब्द केल्यावर वाक्याचा अर्थ बदलतो. आता 'शुद्ध' हा शब्द 'लेखन' या नामासाठी विशेषण म्हणून येतो. जे लेखन 'शुद्ध' आहे त्यात चूक असण्याचा प्रश्न कुठे येतो?

"अर्थाला नेहमीच पूर्णत्व असते. अर्धवट अर्थालाही त्या अर्थाचे पूर्णत्व लाभलेले असते."

याचा अर्थ (अर्धवट किंवा पूर्ण) काय ? जर अर्धवट अर्थालाही पूर्णत्व असेल तर तो अर्धवट कसा ? त्याला पूर्णच म्हणायला नको का  ?

"सर्वांच्याच नेहमी चुका घडत असतील तर ती चूक न ठरता तोच भाषा नियम ठरतो."

सर्वांचीच नेहमी एखादी विशिष्ट चूक घडत असेल तर ती चूक न ठरता तोच भाषा नियम ठरतो असे म्हणायचे आहे का ? वेगवेगळ्या चुकांचा एक नियम ठरू शकत नाही.

"संस्कृत  भाषेचे  भूत त्यांच्या मानगुटीवरून उतरल्याशिवाय त्यांना मराठीचे मीपण समजणार नाही."

शुद्धलेखन व व्याकरण या तांत्रिक विषयांवरील लेखात "मराठीचे मीपण" सारखे संदिग्ध शब्दप्रयोग वाचकाला संभ्रमित करतात. जे म्हणायचे असेल ते नेमकेपणाने आणि ज्यांची व्याख्या सांगता येईल अशा शब्दांत मांडले तर मुद्देसूद चर्चा होऊ शकते. मराठीचे 'स्वतंत्र अस्तित्व' किंवा 'वेगळेपण' असे म्हटल्यास अधिक अर्थबोध होतो.

"मग त्यांनी ग्राह्य धरलेली भाषेसाठीची गृहीते कोणत्या क्षितीजापर्यंत पोहोचतील ?

क्षितिज ह्या शब्दात 'ति' ह्रस्व असतो. शुद्धलेखनावरील लेखात तरी अशी प्राथमिक चूक होता कामा नये. 'गृहीत' ह्या विशेषणाचे (की क्रियाविशेषणाचे ?) नाम 'गृहीत' आहे की 'गृहीतक' की अजून काही ह्याविषयी जाणकारांनी खुलासा करावा.

"चुकीचे पुस्तकी व्याकरण व चुकीचे पुस्तकी लिखित नियम नावाच्या हसविणाऱ्या आरशांमधून मराठी भाषेला आज आपले विद्रूप रूप बघावे लागत आहे."

पुन्हा वरचाच शुद्धलेखनाचा मुद्दा. 'आरशांमधून' हे बहुवचन वापरायचे असेल तर 'नावाच्या' हे एकवचन अशुद्ध ठरते. त्याच्या जागी 'नावांच्या' असे हवे.

"व्याकरण व लेखननियम यातील चुका आता इतक्या वर्षांनंतर बदलायच्या ठरविल्या तर त्याचे परिणाम छापून प्रसिद्ध झालेल्या आजवरच्या पानापानांवर किती होईल, या विचारात सरकार मग्न राहील."

एकतर '...त्याचे परिणाम...किती होतील...' तरी हवे नाहीतर '...त्याचा परिणाम...किती होईल...' तरी हवे. 

"...आम्ही मराठी जसे वापरत होतो तसेच ते आता अधिकृतपणे वापरता येईल..."

या वाक्यात 'मराठी' हा शब्द 'मराठी भाषा' ह्या अर्थाने (म्हणजेच एक नाम म्हणून) आला आहे, 'आम्ही' साठी वापरलेले विशेषण म्हणून नाही हे उघड आहे. पण 'मराठी' हे नाम स्त्रीलिंगी आहे त्यामुळे वरील वाक्य "...आम्ही मराठी जशी वापरत होतो तशीच ती आता अधिकृतपणे वापरता येईल..." असे हवे का ?

"जगाला अक्षर ही कल्पना मराठीच देऊ शकेल."

म्हणजे काय ?

"त्यामुळे संगणकीय क्षेत्रात मोठी क्रांती होऊ शकेल."

कशी ?

"मराठीच्या अक्षर निर्मितीचा संबंध भौतिकविज्ञान, गणित, कालमापन, भाषाविज्ञान या सर्वांशी आहे, हे कळल्यावर, मराठी भाषेला जगातील एकमेव शास्त्रीय भाषा म्हणून स्थान मिळेल."

लेखात सलग आलेली वरील तीन वाक्य शालेय वाद-विवाद स्पर्धेत टाळ्या वसूल करण्यासाठी घातलेल्या वाक्यांसारखी वाटतात. पण एका शास्त्रीय, तांत्रिक लेखात असली शेंडा-बुडखा नसलेली, कोणत्याही पुराव्याचा आधार नसलेली वाक्य शोभत नाहीत. मराठी भाषेवर गांगलांप्रमाणेच माझे ( व येथील साऱ्या सदस्यांचे) प्रेम आहे, आमच्या ह्या मातृभाषेचा आम्हांस रास्त अभिमानही आहे. पण शेवटी अतिशयोक्ती किती करावी याला काही सुमार ? "जगातील एकमेव शास्त्रीय भाषा" ?!

"झालेल्या चुकांची कात टाकून नव्या उजळत्या कांतीने मराठीने स्वतःचा कायापालट करावा."

'उजळ' हे विशेषण असताना त्याचे 'उजळत्या' हे रूपांतर कशासाठी ? ( आणि व्याकरणाच्या दृष्टीने चूक नसले तरी एकाच वाक्यात 'कात', 'कांती' व 'काया' हे खटकतंच.)

याशिवाय 'मराठी' या विषयावरील लेखात 'हँगओव्हर', 'इलेक्ट्रॉनिक ग्राफ्स', 'इंटरनॅशनल फोनेटिक' ही इंग्रजी घुसखोरी कशासाठी ? आणि हे शब्द जर वापरायचेच तर मराठीइतकेच इंग्रजी शुद्धलेखनाकडे लक्ष द्यायला नको का? 'फोनेटिक' (एकवचन) हे इंग्रजीत विशेषण आहे. "इंटरनॅशनल फोनेटिक" याचा काय अर्थ होतो ? गांगल यांना बहुधा 'इंटरनॅशनल फोनेटिक्स्' ( बहुवचन -> नाम) असे म्हणायचे असावे.

तांत्रिक विषयांवरील लेखन हे ललित लेखनाहून अधिक काटेकोरपणे केले जावे असे मला वाटते. आजच्या 'लोकसत्ता'च्या त्याच पानावरील श्री. अरूण फडके यांचा "शुद्धलेखन - आग्रह नव्हे, सवय !" हा लेख याचे उत्तम उदाहरण आहे.