फेब्रुवारी २३ २००८

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ९

ह्यासोबत

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ९

शौच आणि संतोष वगळता, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान ह्या तीन नियमांना मिळून क्रियायोग म्हटले जाते. ह्या क्रियायोगाचे स्वरूप कोणते, त्याचे आचरण कसे करावे आणि ते का, ह्या सर्व प्रश्नांचा विचार ह्याच पादाच्या पहिल्या आणि दुसर्‍या सूत्रांत केलेलाच आहे.

वरील यमनियमांचे पालन करू लागल्यावर पूर्ववासनांच्या संस्कारांमुळे चित्तात जेव्हा त्यांना विरोधी असलेल्या वासना उत्पन्न होतील तेव्हा त्यांचा निरास कसा करावा ह्याचा उपाय यापुढील सूत्रात सांगितलेला आहे.

०३३. वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम् ।

यमनियमांचे अनुसरण (अनुष्ठान) करत असता त्यांना विरोधी असणार्‍या व हिंसादी दुष्कृत्ये हातून घडवणार्‍या अशा ज्या विषयवासना चित्तात उत्पन्न होतात त्या म्हणजे वितर्क होय. ह्या वितर्काची बाधा होईल तसतसे त्याचे निवारण करू शकतील अशा सद्वासनांची भावना चित्तांत करावी. हे प्रतिपक्षभावन होय.
 
०३४. वितर्का हिंसादयः कृतकारितानुमोदिता लोभक्रोधमोहपूर्वका मृदुमध्याधिमात्रा दुःखाज्ञानानन्तफला इति प्रतिपक्षभावनम् ।

हिंसादी दुष्कृत्ये हातून घडवणार्‍या अशा ज्या विषयवासना चित्तात उत्पन्न होतात आणि त्यानुरूप आपले आचरण घडते त्या म्हणजे वितर्क होत. ह्या वितर्कात कृत, कारित आणि अनुमोदित असे तीन मुख्य भेद असतात. ह्या वितर्कांना लोभ, क्रोध किंवा मोह ही आधी उत्पन्न होणारी कारणे असतात म्हणून हे वितर्क लोभक्रोधमोहपूर्वक होत. ह्या कारणरूप मनोविकारांचा किंवा कार्यरूप वितर्कांचा संवेग म्हणजे प्राबल्य असेल तदनुसार त्यांचे मृदू, मध्य आणि अधिमात्र तीव्र असे आणखी तीन पोटभेद आहेत. अशा सत्तावीस प्रकारचे हे वितर्क अनेक प्रकारची दु:खे देणारे, अज्ञान वाढवणारे आणि जन्ममरणरूप संसारातील अनंत फले भोगायला लावणारे असे आहेत; त्यामुळे त्यांचेविरोधी भावना चितात उत्पन्न करून वितर्कांचे निर्मूलन करणे म्हणजे प्रतिपक्षभावन होय.

०३५. अहिंसाप्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः ।

हिंसावृत्ती चित्तात केंव्हाही उत्पन्न न होणे ही अहिंसेची प्रतिष्ठा होय. ही ज्या योग्याच्या चित्तात उत्पन्न झालेली असेल त्या योग्याच्या सान्निध्यात जे जे येतील त्यांच्याही चित्तातील वैराचा निरास (त्याग) घडून येतो.
 
०३६. सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम् ।

योग्याच्या ठिकाणी सत्य स्थिर भावास प्राप्त झाले म्हणजे एखादी क्रिया केल्यावरच जे फल प्राप्त व्हावयाचे ते फल, ती क्रिया कोणी केली नसताही  त्या योग्याच्या इच्छेचा आश्रय करते. म्हणजे योग्याच्या केवळ इच्छामात्रेच ते फल निष्पन्न होते.

०३७. अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम् ।

योगाभ्यासी साधकाच्या चित्तात अस्तेयवृत्ती (चोरी न करण्याची वृत्ती) सुप्रतिष्ठित झाली म्हणजे पृथ्वीवरील रत्नांनी उपलक्षित असलेली सर्व साधनसंपत्ती (त्याने स्वत:साठी तिची अभिलाषा केलेली नसूनही) त्याने लोककल्याणार्थ इच्छा करताच त्याच्यापुढे उपस्थित होते.
 
०३८. ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभः ।

ब्रह्मचर्य सुप्रतिष्ठित झाले असता  त्या योग्याला कोणत्याही कार्याविषयी वीर्य म्हणजे सामर्थ्य आणि उत्साह प्राप्त होतात.
 
०३९. अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथंतासंबोधः ।

अपरिग्रह (सुखसाधनांचा साठा न करण्याची वृत्ती) स्थिर झाला असता पूर्वीचे जन्म कसकसे होते आणि त्यापुढील जन्म कसकसे होतील ह्याविषयीचे ज्ञान होते.
 
०४०. शौचात् स्वाङ्गजुगुप्सा परैरसंसर्गः ।

शौच म्हणजे स्वच्छता. स्व-अंग म्हणजे स्वत:चे शरीर. जुगुप्सा म्हणजे निंदा, निर्भत्सना, घृणा, किळस. शारीरिक स्वच्छता पाळल्याने, आपले शरीर वस्तुत: किती अस्वच्छ असते त्याची जाण निर्माण होऊन त्याविषयी एक प्रकारची किळस निर्माण होते. तसेच स्वच्छता न पाळणाऱ्या लोकांचा संसर्गही नकोसा वाटू लागतो. जुगुप्सेच्या संस्कारामुळे 'हा मलीन देह मी नसून, त्याचा साक्षी जो आत्मा तो मी आहे' असे अनुसंधान आपण राखू शकतो. अशा रीतीने अनात्मभूत देहाविषयी वाटणाऱ्या आत्मियतेला शैथिल्य प्राप्त करून देणारी जुगुप्सा चित्तात उत्पन्न होणे, हे शारीरिक स्वच्छताव्रताचे फळ होय.
 
०४१. सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्र्येन्द्रियजयात्मदर्शनयोग्यत्वानि च ।

सौनमस्य म्हणजे प्रसन्नता. मनातील सत्त्वगुणात असलेले रज, तमादी मळ दूर होऊन मन शुद्ध झाल्यास प्रसन्न होते. त्यामुळे एकाग्रता साधते. इंद्रिये स्वाधीन राहू लागतात. ह्यामुळे आत्मतत्त्वाच्या साक्षात्काराची पात्रता साधकाच्या अंगी बाणते. मानसिक स्वच्छताव्रताचे प्रसन्नता हे फळ असते.
 
०४२. संतोषाद् अनुत्तमः सुखलाभः ।

अनुत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ. संतोषाने सर्वश्रेष्ठ सुख लाभते.
 
०४३. कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात् तपसः ।

तपाच्या योगाने शरीर आणि इंद्रिये ह्यांच्यातील अशुद्धी नष्ट होते आणि त्यामुळे काही शरीरसिद्धी आणि काही इंद्रियसिद्धी योग्याच्या ठिकाणी सहजपणे प्रकट होऊ लागतात.
 
०४४. स्वाध्यायाद् इष्टदेवतासंप्रयोगः ।

इष्ट देवतेचे स्वप्नात, जागेपणी अथवा समाध्यवस्थेत दर्शन होणे, तिच्याशी संभाषण होणे, तिचा अंगात संचार होणे  किंवा तिचा साक्षात्कार होणे हा त्या देवतेचा संप्रयोग होय. ऊपास्य देवतेच्या मंत्राचा जप करणे इत्यादी प्रकारच्या स्वाध्यायामुळे इष्टदेवतासंप्रयोग घडून येतो.
 
०४५. समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात् ।

ईश्वरप्रणिधानाने आत्मसाक्षात्कार करून देणारा निर्विकल्प समाधी सिद्ध होतो.
 

Post to Feed
Typing help hide