मन शब्दातुनी बोलु पाहते.... [शब्द]

शब्द जहर, कधी शब्द कहर
कधी भावरंगी संथ लहर
लहरीतुनी स्वप्नरक्त वाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते....

शब्द आस, कधी शब्द भास
कधी हृदयी घुटमळता एक श्वास
श्वासातुनी नाव ’ते’ घुमु लागते
मन शब्दातुनी बोलु पाहते....

कधी शब्द रंग, कधी अंतरंग
कधी नकळत थरथर अन, तरंग
तरी नजर पुरावा अजुन मागते
मन शब्दातुनी बोलु पाहते....

शब्द धुके, ते शब्दही मुके
कधी ही सोनेरी तनु झुके
राज पुसटसे खोलु पाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते....

शब्द गंध ही शब्द धुंद
पावले नशेची मंदमंद
नसांनसातुनी ’तीच’ वाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते....

शब्द मेघ ’ती’ चांदणरेघ
सावल्या कापती शब्दभेग
चांदण्यासवे ती झरु पाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते....

हा शब्द शब्द हा शब्द्स्पर्श
शब्दासवेही मी वाटतो हर्ष
जगणे मज शिकवुन जाते
मन शब्दातुनी बोलु पाहते....

--सचिन काकडे [ एप्रिल २९,२००८]
फ़क्त तुझ्यासाठीच ” हा खेळ सावल्यांचा”