रात्र थांबवा जरा !

का तशीच चालली बनून रात्र पाहुणी?

सांगतोय का तिला मिठीतली नशा कुणी?

का तसेच चांदणे पहाटगीत गातसे?

की कुणी सुधा पिऊन धुंद धुंद होतसे?

रातराणिची तशीच ही सुगंध-स्पंदने

की कुणा मिळून मुक्ति घट्ट होत बंधने?

चोरपावली निघून जाय रात्र ही पहा,

सांगतात तृप्त श्वास, काय वाटले, अहा !

रात्र थांबवा अशीच,रात्र थांबवा जरा

सोबती तिच्याच ये,मिठीस अर्थ तो खरा!

ही जशी असेल रात्र दाट दाट आतुनी

तेवतात रासरंगदीप अंतरातुनी!

थांबवा म्हणून रात्र,चांदणेहि थांबू द्या,

रेशमी सुगंध-वेळ ही अशीच लांबू द्या!!