साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्को येथे घेणे योग्य की अयोग्य?

आजच्या दैनिक सकाळ मध्ये खालील बातमी वाचली.

माय मराठी सातासमुद्रापार!

पुणे, ता. २२ - "इये मराठीचिये नगरी'तच आजवर ८१ वर्षे रंगलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता सातासमुद्रापार निघाले असून, अमेरिकेत सॅनफ्रॅन्सिस्को (कॅलिफोर्निया) येथे फेब्रुवारी २००९ मध्ये आयोजित केले जाईल.... साहित्य संमेलनाच्या इतिहासात संमेलन परदेशी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच बैठकीत आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला. निवडणूक झाल्यास २६ सप्टेंबर रोजी नूतन अध्यक्ष निश्चित होतील.

"अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा'च्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय बहुमताने घेण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली. या बैठकीला महामंडळाच्या मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ या घटक संस्थांचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी; तसेच हैदराबाद, बडोदा, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड आणि भोपाळ या संलग्न संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी; तसेच पदसिद्ध प्रतिनिधी विद्यमान संमेलनाध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर उपस्थित होते.

ठाले-पाटील म्हणाले, ""महामंडळाकडे परदेशातील संस्थेकडून संमेलन आयोजित करण्यासाठी प्रथमच आलेल्या निमंत्रणावर बैठकीत सखोल चर्चा झाली; तसेच रत्नागिरी, ठाणे, परभणी येथील निमंत्रणांचीही चर्चा झाली. परदेशातून निमंत्रण येण्याची घटना "ऐतिहासिक' आहे. ज्या संस्थेने निमंत्रण पाठवले आहे ती "बे एरिया महाराष्ट्र मंडळ' ही संस्था तेथे गेली २५ वर्षे मराठी मंडळींसाठी कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने त्यांनी मोठा आर्थिक भार उचलून संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन महामंडळाने हे निमंत्रण स्वीकारले. ''

परदेशात संमेलन घेण्याबाबत महामंडळाची घटना काय सांगते, या प्रश्नावर "जेथे मराठी माणूस आहे तेथे संमेलन होऊ शकते, ' असा घटनेत उल्लेख असल्याचे ठाले-पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय बे एरिया मंडळ महामंडळाशी संलग्न झाले आहे. त्यांची सभासदसंख्या दोन हजारांहून अधिक आहे. रत्नागिरीत यापूर्वी दोन वेळा संमेलने झाली आहेत. तेथे पुन्हा संमेलन घेण्यापेक्षा परदेशातून प्रथमच आलेल्या निमंत्रणाचा स्वीकार प्राधान्याने केला गेला. अर्थात, त्यापूर्वी निमंत्रक संस्था आणि महामंडळाने "मराठी रसिकांना सवलतीच्या दरात संमेलनाला येणे कसे शक्य होईल, ' या मुद्द्याचाही विचार केला. बे एरिया मंडळाने प्रत्येकी ७० हजार रुपये खर्चाची परवडण्यासारखी योजना महामंडळाला दिली आहे. हे संमेलन केवळ परदेशात होणारे नसून, ते आंतरखंडीय संमेलन आहे; कारण संमेलनात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप; तसेच कॅनडा, दुबई, सिंगापूर आणि भारतातून मराठीप्रेमी सहभागी होणार आहेत. मराठी भाषेच्या या सोहळ्याचे निमंत्रण अमेरिकी विद्यापीठातील प्राध्यापकांनाही देण्यात येणार आहे. विदेशी भूमीवर मराठीसाठी सतत झटणाऱ्या मंडळींना प्रतिसाद देणे, हे महामंडळाने कर्तव्य समजून संमेलन परदेशी घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
.....

वरील बातमी वाचून पडलेले काही प्रश्न:

  • परदेशात अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतल्याने जिथे मराठी लिहिली, बोलली जाते त्या महाराष्ट्रातील वाचकसंस्कृती वाढीस लागणार आहे काय?
  • आम साहित्यरसिक, साहित्यप्रेमींची उपस्थिती शक्य होईल अशा ठिकाणी अ. भा. साहित्य संमेलन घेणे अधिक योग्य आहे काय?
  • महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाची व मराठी साहित्य महामंडळाची गरज उरलेली नाही, असे तुम्हाला वाटते काय?
  • सॅनफ्रान्सिस्कोत साहित्य संमेलन घेतल्याने मराठी साहित्य समृद्ध होण्यास मदत होईल असे तुम्हाला वाटते काय?
  • हे अखिल भारतीय साहित्य संमेलन सॅनफ्रांसिस्कोत होऊ नये म्हणून विरोध करणे योग्य आहे काय?

कृपया आपले मत व्यक्त करावे.