संस्कृती म्हणजे काय? आणि ती वाचवायची आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे?

बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्ये बरेच दिवसांत संस्कृती, संस्कृतिरक्षक,  संस्कृतिभक्षक आणि तत्सम शब्द पाहायला मिळाले नाहीयेत. पण जेव्हा असे शब्द माझ्या पाहण्यात येतात तेव्हा मला प्रश्न पडतो की ही संस्कृती संस्कृती म्हणतात ती नक्की काय आहे. जाणकारांनी आपापली मते मांडावीत ही अपेक्षा. ह्या चर्चेद्वारे कोणालाही दुखवायचा हेतू नाहीये आणि कोणताही पूर्वग्रह न बाळगता विचार मांडायचा मी प्रयत्न केलाय. ह्या चर्चेतून कदाचित काहीच निष्पन्न होणार नाही. (प्रत्येक चर्चेतून काहीतरी निष्पन्न झालंच पाहिजे असा कुठे नियम आहे काय? आणि खरं सांगायचं झालं तर ज्या चर्चेतून काहीतरी निष्पत्ती झाली ती चर्चाच काय? असो... ) पण माझ्या (आणि कदाचित इतर मनोगतींच्याही) मनात पडलेल्या प्रश्नांना वाट मिळेल आणि झालंच तर थोड्याफार प्रश्नांची उत्तरे पण मिळतील अशी अपेक्षा आहे.

माझा प्रश्न असा आहे की संस्कृती म्हणजे काय आणि ती वाचवण्याबद्दल अधूनमधून जी चर्चा/ओरड सुरू असते ती नक्की काय वाचवायची म्हणून असते?
जर आपली संस्कृती ही अगदी पुरातन आहे, अगदी महाभारत/रामायणकालापासून किंवा त्याही मागे जाऊन अगदी वेदकालापासून अस्तित्वात आहे तर हल्लीहल्लीच तिच्या अस्तित्वाविषयी इतकी भीती का? मी लहानपणापासून ह्या 'संस्कृती'बद्दल जे काही ऐकत आलो आहे त्यातून ज्या गोष्टी माझ्या मनावर बिंबवल्या गेल्या आहेत त्या म्हणजे -
१. महाभारत, महाभारतातली श्रीमद्भगवद्गीता, रामायण, अनेकविध पुराणं, वेद असे अनेक ग्रंथ आपली संस्कृती काय आहे ते सांगतात.
२. ह्या ग्रंथांत जे काही उपदेश सांगितले आहेत त्यांचे पालन करणे म्हणजे संस्कृती.
३. पुरातन कालापासून काही चालीरीती पाळल्या जातात त्या म्हणजे आपली संस्कृती.

ह्यावर मला असा प्रश्न पडतो की ज्या चालीरीतींबद्दलच बोलायचं त्याच कुटुंबाकुटुंबाप्रमाणे बदलत जातात. शिंप्याच्या घरच्या चालीरीती ह्या, मराठ्याच्या घरच्या चालीरीतींहून कितीतरी भिन्न असतात. ब्राह्मणाघरी ज्या गोष्टी त्याज्य ठरतील (उदा. मासे खाणे) त्याच गोष्टी कदाचित सारस्वताकडे राजरोस होत असतील. (आता इथे जर सारस्वत म्हणजे मासे खाणारे ब्राह्मण असा मुद्द कोणी मांडणार असेल तर वाक्यातील पहिला शब्द बदलून हवं तर 'कोकणस्थ/देशस्थ ब्राह्मणाघरी' असा लिहितो. ) मग प्रत्येकाची संस्कृती वेगळी म्हणायची काय?
बरं, जरी ह्या सर्व चालीरीतींमधून काही सर्व जातिधर्मपंथसमाजामध्ये समान अशा वेगळ्या काढून त्यांना संस्कृती म्हणायचं झाल्यास ती टिकवायची आहे म्हणजे नक्की काय करायचंय? कारण अनेकदा संस्कृती म्हणून समजल्या गेलेल्या चालीरीती ह्या कालबाह्य ठरून समाजातून नाहीशा होतात. पूर्वी सतीची चाल होती. ती आपल्या संस्कृतीचं एक अंग समजली जायची पण आता तिच्यावर कायद्यानुसार बंदी येऊन ती चाल कालबाह्य ठरली आहे.
जर धर्मग्रंथांत सांगितलेल्या गोष्टी म्हणजे संस्कृती असे म्हणायचे असेल तर प्रत्येकाला माहीत असलेली द्रौपदी ही पाच नवरे करूनही सुसंकृत होती का? (तिला कर्ण हा आपला अजून एक नवरा असावयास हवा होता असेही वाटत असते. ) हीच द्रौपदी पंचकन्यांपैकी एक आहे. (हा श्लोक "... पंचकन्यां स्मरेन्नित्यं... " असा आहे की "... पंचकं ना स्मरेन्नित्यं... " असा आहे ह्याचा कोण्या जाणकाराने खुलासा केल्यास आमचे मंडळ आभारी असेल. माझा नेहमी गोंधळ होतो. ) एकपतिव्रता अशा सावित्रीची आठवण म्हणून नुकतीच वटपौर्णिमा साजरी झाली. रावणासारख्याने पळवून नेऊनही सच्चरित्र राहिलेली सीता (सीतादेखील पंचकन्यांपैकी एक आहे) पूजनीय की लग्नानंतरही नियोगपद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेणाऱ्या कुंती आणि माद्री पूज्य? (कुंतीला लग्नापूर्वी सूर्याकडून नियोगपद्धतीनेच कर्ण झाला आणि तिने कुमारीमातृत्व स्वीकारले. मग आजकालच्या कुमारीमाताच असंस्कृत आणि अनैतिक कशा? )
महाभारतात आणि हरिवंशात प्रथम प्रजोत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली असे वर्णन आहे. आदिपर्वाच्या ६६व्या अध्यायात ब्रह्मदेवाचा मुलगा दक्ष आणि त्याची सख्खी बहीण ह्यांच्या शरीरसंबंधाने ५० कन्या झाल्याचा उल्लेख आहे. ह्याच दक्षाचा पुतण्या कश्यप याने ह्या कन्यांपैकी १३ जणींशी विवाह केल्याचाही उल्लेख तिथे येतो.
हरिवंशाच्या दुसऱ्या अध्यायात एक कथा येते जिच्यामध्ये वसिष्ठ प्रजापतीची मुलगी शतरूपा ही वयात आल्यावर स्वतः वसिष्ठाशीच पत्नीभावाने राहिल्याचा उल्लेख येतो.
अर्जुनाला षंढत्व प्राप्त होऊन त्याची/चा बृहन्नडा झाल्याची कथा सर्वज्ञात आहे. हे षंढत्व त्याला उर्वशीच्या शापामुळे मिळालेले असते. उर्वशी ही पुरुरव्याची पत्नी असल्याने पौरववंशाची जननी आणि अर्जुनाची पूर्वज. तीच एकदा अर्जुनाकडे भोगयाचना करते आणि अर्जुनाने नकार दिल्यावर त्याला शाप देते.

आतिथ्याची एक आर्ष चाल :-
केवळ भारतीयच नव्हे तर ग्रीक संस्कृतीतदेखील अशा काही गोष्टी आढळतात की त्यामुळे संस्कृतिरक्षण म्हणजे नक्की काय हा प्रश्न पडावा. अथेन्स शहरातील तत्त्वज्ञ सॉक्रेटिस याने आपली बायको झांटिपी हिला आपला मित्र बियाडिस यास संभोगार्थ दिल्याची गोष्ट ग्रीक इतिहासतज्ज्ञ प्लूटार्क लिहितो. उद्योगपर्वाच्या ४५व्या अध्यायात महान तपस्वी आणि थोर तत्त्ववेत्ते सनत्सुजात मित्रनीती म्हणून सांगतात, "इष्टान पुत्रान विभवान स्वाञ्श्च दारान्।" म्हणजे, "संकटसमयी मित्राला आपली स्त्रीदेखील निर्मळ अंतःकरणाने अर्पण करावी. "
द्विगोर्लुगनापत्ये (४-१-८८) या सूत्राच्या अनुषंगाने पाणिनी सांगतो द्व्योर्मित्रयोरपत्यं द्वैमित्रिः। दोन मित्रांच्या अपत्याला द्वैमित्री म्हणतात. एका मित्राने जर आपली बायको आपल्या मित्राला दिली आणि त्या मित्रापाशी राहून त्या बायकोला मूल झाले तर शास्त्रतः बायको एकाची आणि मूल दुसऱ्याचे अशा स्थितीत पितृत्व दोघांकडेही येईल.
पण आपल्याला जमदग्नी आणि रेणुकेची गोष्टदेखील ठाऊक आहे. रेणुकेने चित्ररथ गंधर्वाकडे नुसते कामदृष्टीने पाहिले म्हणून जमदग्नीने तिला आपल्या पुत्राकडून ठार करवले.

अश्वमेध यज्ञ :-
साम्राज्य, संपत्ती आणि शूरवीर प्रजा उत्पन्न व्हावी म्हणून अश्वमेध यज्ञ केले जात असे.  त्यावेळी वीर्यशाली प्रजोत्पत्तीसाठी जे नाटक केले जात असे त्यात अनेक राजपत्न्या घोड्याशी रममाण होत असत. असे हे नाटक अत्यंत बीभत्स असे. पण हा बीभत्सपणा पूर्वपरंपरेला अनुसरूनच असल्याने यज्ञपुरुष आपले बरेच करील, वाईट करणार नाही अशी हे यज्ञ करणाऱ्या ऋत्विजांची आणि राजांची खात्री होती.

पशुसमागम :-
आदिपर्वात पांडुशापवृत्त म्हणून एक कथा येते. पांडुराजा एक दिवस मृगयेसाठी रानात गेला असता दम नामक ऋषी एका मृगीशी रत होत असता पांडुराजाच्या बाणाने मरण पावला. मरता मरता ऋषीने पांडुराजास शाप दिला की तुलाही मैथुनसुख प्राप्त होणार नाही. मैथुन करू गेल्यास तुझा मृत्यू होईल. ह्या शापामुळे पांडुराजाला आपल्या पत्न्या कुंती आणि माद्री ह्यांना नियोगपद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास परवानगी द्यावी लागली. एक दिवस कामवासना अनावर होऊन जेव्हा पांडूने माद्रीशी सहवास केला तेव्हा त्यास मृत्यू आला.

ही झाली प्राचीन उदाहरणे. अर्वाचीन कालाबाबत बोलायचे झाल्यास राजा रणजितसिंग हत्तीच्या अंबारीत सर्व लोकांसमक्ष स्त्रीशी रत होई असे ज्याकूमो नावाचा प्रवासी लिहितो. पुण्यातील बाजीराव रघुनाथ यांची 'घटकंचुकी'सुद्धा प्रसिद्ध आहे. निवडक स्त्रीपुरुष रंगमहालात जमून स्त्रियांच्या चोळ्या एका घागरीत घालीत व ज्या पुरुषाला ज्या स्त्रीची चोळी मिळे तो तिच्याशी सर्वांदेखत रममाण होई. ह्या पाशवी खेळाला घटकंचुकी म्हणत. हीच घटकंचुकी अगदी १०० वर्षांपूर्वीपर्यंत कर्नाटाकात प्रसिद्ध होती. हिच्यात लहानमोठेपणा किंवा नाती पाहिली जात नसत. अनेक राजांना एकाहून जास्त पत्न्या असत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा ८ राण्या होत्याच की. मग आजच बहुपत्नित्वाची चाल निषिद्ध का होते?

म्हणून मला प्रश्न पडतो की ह्यातील कोणती चाल/गोष्ट/कथा म्हणजे आपली संस्कृती आहे जी आपण अत्यंत प्राणपणाने जपली पाहिजे.

वरील उदाहरणांतील सर्व चाली आपल्याला चमत्कारिक आणि अनैतिक वाटतील. पण मला तरी वाटते की संस्कृती ही उत्क्रमिष्णू (उत्क्रांतिशील, बदलणारी) असली पाहिजे. पूर्वीच्या काळी जे नैतिक समजले जात होते ते सध्याच्या काळात नैतिक समजले जाईलच असे नाही. जशी भाषा बदलत जाते तशी संस्कृती बदलत जाते. समाजातील अंतर्घर्षणाने किंवा कधीकधी बाह्यप्रेरणेने तिच्यात बदल झाले आहेत आणि नेहमीच होतात. काही काळापूर्वी जी चाल नैतिक समजली जात होती तीच कालांतराने नीतिबाह्य ठरून समाजाला अमान्य होते.
बायकामुलींनी नऊवारी सोडून जेव्हा पाचवारी/सहावारी नेसली तेव्हा डोळे वटारले गेले होतेच. नंतर सहावारी सोडून पंजाबी ड्रेसचा अंगिकार केला गेला तेव्हा आणि पंजाबी ड्रेसची जागा जीन्स-टीशर्टने घेतली तेव्हादेखील समाजाच्या कपाळावर अनेक आठ्या पडल्या होत्याच. पण तरीही मुलींसाठी जीन्स-टीशर्ट हा पोषाख आता स्वीकारला गेलाच आहे.  पुरुषांच्या पोषाखात फार बदल झाले नसले तरीही पुरुषदेखील बाराबंदी/बंडी/धोतर ह्यावरून अँटिफिट जीन्स आणि टीशर्ट वापरायला लागले आहेतच. समाज पुरुषप्रधान असल्याने पुरुषांच्या पोषाखाबाबत फार खल केला गेला नाही इतकेच.  ह्या बदलांतल्या कोणते स्वीकारार्ह आहेत आणि कोणते टाकाऊ आहेत हे ठरवणे आपल्या हातात नाही. कालौघात ह्या सर्व गोष्टी ठरत असतात.
काही जण म्हणतात की समाजाला योग्य असणाऱ्या गोष्टी म्हणजे संस्कृती. पण समाजाला योग्य काय आणि अयोग्य काय हे नक्की कोण ठरवणार? योग्य/अयोग्य ह्या अत्यंत सापेक्ष संकल्पना आहेत. जेवताना पाण्याऐवजी वाइन पिणे हे भारतीय समाजाच्या दृष्टीने कदाचित अयोग्य ठरत असेल. (हेदेखील मी छातीठोकपणे सांगू शकत नाही हे इथेच मान्य करतो. ) पण अनेक युरोपीय देशांमध्ये ती एक अत्यंत सहज गोष्ट असते.

पण काही प्रश्न अनुत्तरितच राहतात.
- संस्कृती म्हणजे नक्की काय?
- जर संस्कृती ही बदलत जाणारी असेल तर रक्षण नक्की कसले करायचे आहे?
- ह्या बदलाचा विचार करता, पालन तरी नक्की कसले करायचे आहे?

- चैत रे चैत.

ह्या लेखात स्त्रीपुरुष संबंधाबाबतच बरेचसे उल्लेख आले ह्याला कारण म्हणजे ह्याच संदर्भात संस्कृती, संस्कृतिरक्षण आणि तत्सम शब्द वापरले जातात. वरील लिखाणातील काही दाखल्यांसाठी इतिहासतज्ज्ञ वि. का. राजवाडे यांच्या 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' ह्या पुस्तकाचा आधार घेतला आहे.