वळू

वळू

बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेव्हापासून तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासून ही परिस्थिती बदलायला लागली आहे.

तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, वळू. कथानक सर्वांना माहीत झालेच असेल. एका गावात वळूने उच्छाद मांडलेला असतो त्यामुळे फॉरेस्ट ऑफिसरला बोलावणे पाठवले जाते. त्याबरोबर त्याचा भाऊ डॉक्युमेंटरी करण्यासाठी येतो. गावकऱ्यांना एकत्र जमवून डॉक्युमेंटरी करताना कथानक उलगडत जाते. त्यात संगीची प्रेमकथा असे उपकथानक सुद्धा आहे. डॉक्यमेंटरी करून संपते आणि त्यानंतरच्या एक-दोन प्रयत्नामध्ये वळू पकडला जातो, व चित्रपट संपतो.

मला चित्रपट आवडला नाही. कथानकात तसा काही दम नाही. अगदीच साधे आहे. म्हणून मग त्यात गावातल्या तरुण नेत्याची कुरघोडी करण्याची धडपड. भटजीबुवांचे (दिलीप प्रभावळकर) विनोद आणि संगीचे (अमृता सुभाष) प्रेमप्रकरण त्यात आले आहे. वळू बघितल्यानंतर त्याला पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरची नेमणूक विचित्र वाटते. वळू बिचारा एकदमच शांत आहे. चित्रपटात तो नुसताच इकडून तिकडे जातो. तर त्याला लोक एवढे घाबरतात का हे काही समजत नाही. वळूचे पूर्ण दर्शन अगदी शेवटी घडते. तोपर्यंत त्याचा त्याला अर्धवट दाखवून बॅकग्राउंडला त्याचा जोरात उच्छ्वास ऐकवण्यात आला आहे. त्यावरून तो हिंसक झाला आहे असे आपण समजायचे. वळू पकडण्यासाठी गेलेला फॉरेस्ट ऑफिसर डॉक्युमेंटरी बनवण्यात मध्यांतरापर्यंत वेळ घालवतो. त्यानंतर त्याने केलेले प्रयत्न एका अननुभवी माणसाने केलेले प्रयत्न वाटत राहतात. शेवटी वळू पकडला जातो परंतु त्या प्रसंगात काही थ्रिल नाही.

अतुल कुलकर्णी हा एक चांगला अभिनेता आहे हे हा चित्रपट बघून कोणीही म्हणणार नाही.काही मनाविरुद्ध घडले तर 'शिट शिट शिट' आणि मनासारखे घडले तर 'येस येस येस' असे संवाद त्याच्या तोंडी आहेत. वळू पकडण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरला आवश्यक असलेली लीडरशीप कुठेही जाणवत नाही. त्याच्यासारख्या अभिनेत्याला वाया घालवलेले आहे एवढेच म्हणता येईल.

दिलीप प्रभावळकरांनी ही भूमिका का स्वीकारली असावी असा प्रश्न पडतो. दिवस/रात्री कोणत्याही वेळेस परसाकडला जाणे या पलीकडे या भूमिकेत काहीच नाही. विनोद निर्मिती साठी हे पात्र असावे असे म्हटले तर सारखे 'लागली आहे' असा अभिनय करत इकडून तिकडे जाणार्‍या पात्रात कसली आली आहे विनोदनिर्मिती. त्यात सरकार राज मधली दिलीप प्रभावळकरांची भूमिका बघितल्यानंतर त्यांना या भूमिकेत बघायचे म्हणजे एक शिक्षा आहे.

चित्रपटात काही प्रसंग उगाच घुसडल्यासारखे वाटतात. आता छोट्या मुलाला त्याची आई देवळाबाहेरच शू करायला लावते. यात दिग्दर्शकाला काय म्हणायचे आहे? विनोदनिर्मितीसाठी असेल तर यात विनोद काय आहे. त्यात बाकी चित्रपट विनोदी अंगाने जात नाही. मला तर एकाही ठिकाणी खळखळून हसू आले नाही.

चित्रपटात सगळेच काही निगेटिव्ह नाही. गावाची वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. जीवन्याची भूमिका करणाऱ्या नटाने (गिरीश कुलकर्णी) उत्तम अभिनय केला आहे. फॉरेस्ट ऑफिसरला सगळी मदत केल्यानंतर ऑफिसर निघून जाताना एकदम हळुवार होणे हे त्याने मस्त दाखवले आहे. चित्रपट तांत्रिक दृष्ट्या चांगला वाटतो.

हे चित्रपट परीक्षण नाही, तर नुसतेच माझे मत आहे. या वरून चित्रपट पाहायचे की नाही हे ठरवू नका. पण मराठी चित्रपटात सुधारणा व्हावी. किंबहुना मराठीत आंतरराष्टीय दर्जाचे चित्रपट निघावेत असे वाटते. त्यामुळे 'वळू' खरोखरच चांगला असता तर किती छान झाले असते असे चित्रपट बघितल्यानंतर वाटत राहिले म्हणून चार ओळी खरडल्या एवढेच.

- - राजस