होत आहे विश्व माझे...

कालचा काळोख माझा, आजचा अन हा प्रकाश,

होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा , सावकाश ॥१॥

अंतरीचे सूख माझ्या आज झाले बोलके

आणि माझे दुःख आपोआप झाले पोरके

गवसलो माझा मला मी, भोगले मी त्या क्षणास ॥२॥

होत आहे विश्व माझे, मीही त्याचा, सावकाश ॥

काळज्या होत्याच खोट्या, आणी भीती ती खुळी

जे जसे दिसते जगाला, ते तसे नसते मुळी

कळून आले, जाणिवेने बघत गेलो आसपास॥३॥

होत आहे विश्व माझे, मीही त्याचा, सावकाश ॥

काल नव्हतो मोकळा मी, आज नाही बद्ध मी

कालच्याइतकाच उरलो आज आहे शुद्ध मी

बंधने वा मोकळेपण, हे मनाचे फक्त भास॥४॥

होत आहे विश्व माझे, मीही त्याचा, सावकाश ॥

जेवढा अव्यक्त आहे, तेवढा प्रत्यक्ष मी

मीच माझी सर्व कर्मे, आणि माझी साक्ष मी

कर्म त्याचा मार्ग चालो-चालतो मीही उदास ॥५॥

होत आहे विश्व माझे, मीही त्याचा, सावकाश ॥