दिवस सुगीचे !!

भुऱ्या केसांची एक बट
कपाळावर रुळत राहते
आणि तुझ्या गालावरची
एक खळी खुलत राहते.   

तुझी बोलकी नजर
माझ्याकडे रोखून पाहते
ओठावरील हसू तुझ्या
सगळे काही सांगून जाते.     

कधी कधी तुझ्याकडे
अशीच मी पाहत जाते
खांद्यावरती भार देत
हळूच हलकी होत जाते

श्वासाशी तुझ्या माझा
श्वास जोडत राहते
तुझ्यातल्या माझ्या प्राणाशी
एकरुप होत जाते

वाटते तू तर निळे आकाश
अन मी अथांग जमीन आहे
क्षितीजा पाशी भेटलोय जरी
वाट ही नवीन आहे

लाख नक्षत्रे उराशी घेउन
नभ जसे हे नटले आहे
अनेक स्वप्ने घेउन समीप
भविष्य आपले सजले आहे

तुझ्या सहवासात ऊन शीतल
अन हिवाळे धगीचे आहेत
तुझ्या माझ्या आयुष्यातले
दिवस हे सुगीचे आहेत

== पल्लवीसमीर