विडंबन झाले कवितेचे

मूळ जमीन : इथे (पान १) आणि इथे (पान २)पाहा.

साहित्याशी जडले नाते बोरूघाशाचे

विडंबन झाले कवितेचे                             ॥धृ॥

कविराजांनी धनू उचलिले गझल-रुबायांचे
पूर्ण जाहले विडंबकाच्या हेतु अंतरीचे
उडू लागले शब्दकावळे छचोर काव्याचे                              ॥१॥

वक्र टाळकी कसुन वाचती काव्य अर्थवाही
नयनांमाजी एकवटुनिया काकदृष्टि पाही
फुलू लागले फूल हळू हळू निजल्या मज्जेचे     ॥२॥

सोकावुनिया जरी विडंबन पाडत तो राही
तडिताघातापरी भयंकर वाद तोंच होई
कविराजांच्या तक्रारीचे, बोल कोपल्याचे                             ॥३॥

अंगारुनिया आले डोळे, चरफडले राजे
मुक्त हासऱ्या प्रतिसादांचे बघुन सडे ताजे
पडू लागले तृतीय लोचन अमुच्यावर त्यांचे     ॥४॥

हात जोडुनी म्हणे विडंबक तो कविराजासी
"आज विडंबन अर्पियले मी अपुल्या चरणासी"
संतापाने मिटले डोळे क्रुद्ध का कवीचे?                               ॥५॥

देवाज्ञेने स्फुरे अम्हाला रोज शब्दक्रीडा
अधिर लेखणी, अधिर तीहुनी डोक्यातिल कीडा
अर्थहीन हे चरण लावती लेबल पद्याचे            ॥६॥ 

काव्याकाशी कशी भरावी उषःप्रभा लाल
उगी राहिलो वामांगी शब्देविण कंगाल
कवन रचुनिया धनी जाहलो शरसंधानाचे                            ॥७॥

नाही उरला राम, चालले ते वनवासाला
कविराजांच्या हात घालसी का कासोट्याला
त्यांच्या वर्मी घाव बैसले खो खो हास्याचे        ॥८॥

खोडसाळ सांगाल अम्हाला का कविता लिहिता?
कविराजांचे सूर हरवले विडंबने बघता
साहित्याशी कसले नाते तुमचे डोंबलाचे?                            ॥९॥