ऍपल / मॅक उपयोगकर्त्यांना विनंती

मित्रहो,
 
मी एक संगणक अंगठेबहाद्दर आहे. वा दीडशहाणा.
माझा तोशिबा सॅटलाइट लॅपटॉप डब्बा व्हायच्या मार्गावर आहे.
मुख्यतः मोठ्या कालावधीची, चांगल्या चित्रगुणवत्तेची चलतचित्रे / चित्रतुकडे यांच्यावर काम करताना चांगलाच लटकू लागला आहे. आणखी रॅम वाढवणं शक्य नाही.
आता नवीन संगणक घ्यायचा तर विंडोज व्हिस्टा नावाच्या चेंगट नि नखरेल पण सुंदर नि अवाढव्य प्रकरणाशी 'जुळवून' घेणं आलं. ते खरंतर मला करायचं नाही.
लिनक्सच्या आश्रयाला जाणं म्हणजे अगदीच वनवासात गेल्यासारखं. चॅटिंग वगैरेला रामराम.
त्यामुळे नवीन यंत्र घ्यायचंच तर ते ऍपलबुक असावं असा एक आपला विचार आहे. यात 'विविध-माध्यम'प्रकारांवर काम करणं हे विंडोजपेक्षा जास्त दमदार असून संपूर्ण प्रणालीवर तुम्ही जणूकाही अंतःप्रेरणेने काम करू शकता; एकदा हे वापरायला लागल्यावर तुम्ही विंडोज विसरून जाता वगैरे वगैरे गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. त्या खऱ्याही असोत बापड्या; पण मला काही प्राथमिक प्रश्न आहेत. मी अजून एकही मॅक पीसी जवळून काम केला गेलेला पाहिलेला नाही.
मुख्य प्रश्न -
१] माझा वापर पूर्ण घरगुती स्वरूपाचा राहील. ऑफिस, इंटरनेट भटकंती, वेब कॅम चॆटिंग - याहू, गूगल, स्कायपी आदी. हे सगळं पूर्वीइतक्याच निरामयतेने शक्य होईल का?
२] देवनागरी लेखन वाचनात काय स्वरूपाचे अडथळे आहेत?
३] विंडोजइतकी ही प्रणाली युनिकोड सहाय्यक नाही असं मत ऐकण्यात आहे. डायनॅमिक फॉण्ट पद्धतीवर आधारित लोकसत्ता आदी संकेतस्थळे दिसत नाहीत. युनिकोड आधारित म. टा., सकाळ इ. व्यवस्थित (? ) दिसतात. किती खरं किती खोटं?
४] विंडोजवर ’बरह’ उपकरणाचं बोट धरून आमचा देवनागरी युनिकोड प्रांतात संचार आहे. मॅकवर बरह नाही म्हटल्यावर कसं होणार?
५] विंडोज पीसीपेक्षा दीडपट जास्त पैसे भरून याला घरी घेऊन यावं इतका हा खरंच चांगला आहे का?
६] इतर उल्लेखनीय बऱ्या वा वाईट गोष्टी... [बॅटरीकाल इ. ]
 
मनोगतींकडून मार्गदर्शनाची आशा आहे.
 
शुभास्ते पंथान:
कौंतेय देशपांडे