मोदक

  • २ वाट्या खवलेला ओला नारळ, २ वाट्या चिरलेला गूळ
  • १ चमचा खसखस
  • २ वाट्या तांदुळाचे पीठ, २ वाट्या पाणी
  • २ चमचे तेल, मीठ
  • उकड मळण्यासाठी तेल व पाणी
  • साजूक तूप २ चमचे
१ तास
२ जण

खवलेला ओला नारळ व चिरलेला गूळ एकत्रित करा. मध्यम आचेवर पातेले ठेवून त्यात २ चमचे साजूक तूप घालून एकत्रित केलेले मिश्रण घालून शिजवा. काही वेळाने या मिश्रणाचे सारण बनायला लागते व ते कोरडे पडायला लागते. गॅस बंद करा. सारण शिजत आले की त्यात खसखस भाजून घाला.

मध्यम आचेवर एका पातेल्यात २ वाट्या पाणी तापत ठेवा. त्यात थोडेसे मीठ व २ चमचे तेल घाला. या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. उकळलेल्या पाण्यात तांदुळाची पीठी घालून कालथ्याने पटापट एकसारखे ढवळा. नंतर परत मंद आचेवर हे पातेले ठेवून त्यावर झाकण ठेवा. एक दणदणीत वाफ येऊ देत. नंतर झाकण काढून ही तयार झालेली उकड एका ताटलीत काढून घ्या व त्यामध्ये पाणी व तेल घालून चांगली मळून घ्या.

उकडीचा साधारण मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन त्याला गोल आकार द्या. पाणी व तेलाचा हात घेऊन हातानेच या गोल आकाराची पातळ, नितळ व खोलगट पारी बनवा. पारीच्या वरच्या कडा जास्त पालळ असायला हव्यात. नंतर या खोलगट पारीमध्ये पूरेसे सारण घालून थोड्या थोड्या अंतरावर पाकळीसारखा आकार द्या. पाकळीचा आकार देताना पारीच्या कडा दोन बोटांच्या चिमटीमध्ये पकडून दाब द्या. हा दाब तसाच पारीच्या खालपर्यंत द्या. अश्या प्रकारे सर्व पाकळ्या अगगद हाताने एकत्रित करून त्याचे मोदकाच्या वर एक टोक बनवा जसा देवळाला कळस असतो तसा.

अश्या प्रकारे सर्व मोदक करून घ्या. चाळणीला तेल लावून मोदक त्यामध्ये घालून कूकरमध्ये उकडून घ्या. कालावधी १५ मिनिटे. जश्या इडल्या उकडतो त्याप्रमाणे.

गरम गरम मोदकांवर साजूक तूप भरपूर प्रमाणात घ्या. चव चांगली लागते. वरील प्रमाणात साधारण १५ ते २० मोदक होतात.

तू सुखकर्ता तू दुखहर्ता... तूच कर्ता आणि करविता.... मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया... मोरया मोरया अष्टविनायक मोरया...

सौ आई