पण

नुकतेच वाचनात आले की हिंदी चित्रपट सृष्टीतील विख्यात रचनाकार श्री. प्रसून जोशी ह्यांनी पण केला होता की ते 
त्यांच्या गाण्यांमध्ये कधीही प्यार,  इष्क,  मोहब्बत इ.  विटलेले शब्द वापरणार नाहीत त्यामुळेच की काय त्यांची 
अनेक गाणी सिल्क रुट,  अब के सावन,  रंग दे बसंती,  तारे जमीन पर इ. द्वारे लोकांना भावली आणि आजही ती 
लोकांच्या मनांत रुंजी घालतात.  

असाच एखादा पण इतरांनी करावयाचा झाला तर - मराठी चित्रपटसृष्टीला सासर,  माहेर,  हळद,  कुंकू,  पाटील,  
पाटलीण, साखर सम्राट हे सोडावे लागेल.  दक्षिण चित्रपट सृष्टीला भडक,  बटबटीत कपडे,  अनावश्यक खर्च,
पांचट विनोद सोडावे लागतील (आठवा : जीन्स नावाचा भयपट). हिंदी चित्रपट सृष्टीत अमिताभला अर्ध्या वयाच्या 
नायिकेबरोबर नायक म्हणून काम करण्याचे सोडून देऊन संन्यास घ्यावा लागेल. गुजराती चित्रपट सृष्टीला 
अत्याचारी सरदार आणि हुंडाबळी ह्या संकल्पना सोडाव्या लागतील. अलका कुबलला रडणे सोडून द्यावे लागेल. देवोल घराण्याला बॉबी देवोल नावाचा एक बथ्थड लोकांच्या माथी मारण्याचे सोडून द्यावे लागेल. मराठी वामि 
(वारंवारता अधिमिश्रण अर्थातच एफ. एम. ) च्या निवेदकांना श्रोत्यांना ऊठसूट बोधामृत पाजणे सोडून द्यावे 
लागेल. राखी सावंतला सवंग विधाने करणे सोडून द्यावे लागेल.  मल्लिकाला राहुल बोसला अभिनयाचे धडे देणे 
सोडून द्यावे लागेल.

काय, खरे की नाही?