संवेदना

'बॉम्बब्लास्ट' सिनेमा पाहताना त्यातील एक दृष्य. बॉम्बस्फोटानंतर जखमी/मृत व्यक्तीच्या देहांकडे पाहताना रोनित रॉयला उलटी होते. माझा एक मित्र म्हणाला,"खरं तर पोलिसांना हे नको व्हायला." त्यावर दुसरा मित्र म्हणाला,"का? तो ही माणूसच आहे." आधीचे आठवत नाही पण तेव्हापासून असले काही प्रसंग पाहिले/ऐकले की पोलिसांबद्दल,डॉक्टरांबद्दल विचार मनात येतात, 'असं सारखं सारखं बघून त्यांच्या संवेदनावर फरक तर नसेल ना पडत?'

'अब तक छप्पन' किंवा तत्सम सिनेमे पाहताना माझ्या बहिणीचे वाक्य आठवते. ती ही म्हणाली की नेहमी आपण असे पाहले तर नंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाईल. आज काल तेच अनुभवायला मिळतंय. आधी खरे तर एखाद्याला मारताना दाखवत नव्हते. पण हळू हळू त्याची सुरूवात झाली. तेव्हा सिनेमात नुसते गोळी मारली किंवा चाकू खुपसला तरी पाहण्यार्‍या एखाद्याच्या तोंडून 'ईईईई' निघायचे, पण आता नेहमी खून, गोळ्या मारणे वगैरे पाहून त्याबाबत लोकांना बाबत जास्त काही वाटत नाही.

घरी चिकन करायचे म्हटले तर मी कोंबडी आणायला जातो तेव्हा त्यांना मारताना कधी पाहत नाही. फक्त ते तुकडे समोरच करून देतात ते दिसते. ह्यावरूनच 'बाकी शून्य' मधील जय सरदेसाईचा स्वत: कोंबडी कापण्याचा प्रकार आठवला. त्यालाही सुरूवातीला ते विचित्र वाटते, नंतर तो सराईताप्रमाणे ते करतो. त्याचप्रकारे मलाही बहुधा त्याची आता सवय झाली आहे. पण जेव्हा मी एखाद्याला
लहान मुलाला तिथे आणलेले पाहतो तेव्हा त्यांना लगेच सांगतो की लहान मुलांना तिथे आणू नका. ते आपण थोडं फार थांबवू शकतो पण टीव्हीवर जे सर्रास दाखवले जाते त्यावर अजून तरी जास्त काही थांबविणे होत नाही. दोन आठवड्यांपुर्वी एक मित्र आला होता माझ्या घरी, त्याच्या बायको आणि मुलासोबत. तेव्हा एका वाहिनीवर असेच काही तरी चालू होते, माझ्या लक्षात येऊन लगेच कार्टून चॅनल लावला. खरं तर त्यातही आजकाल काय दाखवतात मला माहित नाही. तरीही 'अभय सिनेमातील वाक्य आठवते, कमल हासन(अभय) ला कोणीतरी विचारतो की तुला हे लोकांना मारण्याचे प्रकार कसे सुचतात, त्यावर तो म्हणतो की 'कार्टून चॅनल मधून'. बापरे, म्हणजे मुलांची त्यातूनही सुटका नाही का?

मी वर म्हणालो की मला ही बहुधा त्याची सवय झाली असेल. कारण ३/४ वर्षापुर्वी AXN वर Fear Factor मध्ये एका मुलीला Bowling मध्ये १० पिन पडायच्या राहतात म्हणून तेवढेच म्हणजे १० जिवंत Beetles खायला सांगितले होते. तेव्हा तो प्रसंग पाहताना का माहित नाही पण मला मजा वाटली होती.:(
एक प्रश्न पडतो, मी मांसभक्षण करतो म्हणजे त्याबाबत संवेदनशील असणे विसंगत आहे का?

असो, टीव्ही वर तर आता सिनेमेच सोडा पण एखाद्या अतिरेक्यांशी एन्काऊंटरचे ही थेट प्रक्षेपण दाखवतात. अर्थात तिकडे प्रत्यक्षात काय होते हे दिसते, पण त्याचा वाईट परिणाम नको व्हायला.
त्यातल्या त्यात परवा जेव्हा दिल्ली मधील अतिरेक्यांच्या एन्काऊंटरचे थेट प्रक्षेपण दाखवले होते त्यानंतर एका वाहिनीवर, बहुधा IBN7 वर, एक रिपोर्टर सांगत होता की तिथे एका लहान मुलाने ते सर्व पाहिल्याच्या धक्क्यात होता. तर हा रिपोर्टर त्या मुलाला विचारत होता की 'उस बारे में कुछ बताओ'.

वरील सर्व आणि जर त्या ५/६ वर्षाच्या मुलाला त्या गोळीबाराबद्दल विचारले जात असेल तर आता वाटते की खरंच आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत का?

(हाच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल.)