गुन्हेगारी विषयक चित्रपट, बातम्या व मालिका : बनलीत "गुन्हेगारांची आयती पाठ्यपुस्तके"व "अपेक्षीत प्रश्नोत्तरे"!!

आताच (सव्वीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता) स्टार न्यूज वर दाखवले गेले की अहमदाबाद मध्ये हॉस्पिटल मध्ये झालेल्या बॉंबस्फोटांची कल्पना अतिरेक्यांना कॉंट्रॅक्ट चित्रपटापासून मिळाली. तसेच 'अ वेन्सडे' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात, नासिरूद्दिन शहा कॉल टॅप होवू नये म्हणून ज्या क्लॄप्त्या वापरतो म्हणे, तश्याच क्लॄप्त्या वापरण्याचा (योजना) प्लॅन, आता मुंबईत बॉंबस्फोट घडवण्यासाठी काही अतिरेकी वापरणार होते, अशी कबूली आरोपींनीच दिली आहे. अतिरेक्यांचा टोळीने त्यासाठी खास हा चित्रपट पाहिला.

आणखी एक आवर्जून सांगावेसे वाटते की, 'जॉनी गद्दार' या चित्रपटात नील मुकेश हा 'जेफ्री आर्शर' चे पुस्तक वाचून आणि अमिताभचा एक जुना चित्रपट पाहून त्यापासून प्रेरणा घेवून आगगाडीत (ट्रेन) एक खून करतो. म्हणजे चित्रपटापासून प्रेरणा घेवून एक जण खून करतो हे पुन्हा एका चित्रपटातच दाखवले आहे. ( वा! छान! आता काय बोलणार तरी काय पुढे? आता आणखी जॉनी गद्दार पाहून कुणीतरी खून करतो असा चित्रपट निघेलही... धन्य ते चित्रपट आणि धन्य त्या कल्पना...)

पण मग आता प्रश्न असा पडतो की, असे आतंकवादावरचे चित्रपट (आणि, गुन्हेगारी वर आधारित कार्यक्रम, ज्यात 'नाट्य रूपांतर' करून गुन्हा कसा केला हे दाखवले जाते, तसेच डिटेक्टिव्ह सिरियल्स, पुस्तके) आपल्याला समाजासाठी खरंच आवश्यक आहेत का? तसेच विविध वृत्तवाहिन्या ज्या प्रकारे गुन्ह्याच्या पातम्या देतात त्याचा सुद्धा वापर गुन्हेगारांना आपल्या कारवायांसाठी करता येत असेल. त्यातल्या त्यात पुस्तकांपेक्षा जास्त परीणाम चित्रपट व मालिकांचाच होतो हे नक्की.

असे चित्रपट पाहून सामान्य माणसाला काय फायदा होतो? किती पोलिसांना फायदा होतो? किती पोलिस हे असे चित्रपट नियमित बघतात? अशा चित्रपटांची गरज आहे का? पूर्वी असे चित्रपट निघायचे पण त्या वेळेस त्यात नाटकीपणा, अतिशयोक्ती जास्त असायची. आता चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानामुळे वगैरे व अति वास्तववादी स्क्रीप्ट मुळे अतिशय खराखुरा आणि वास्तववादी बनू लागला आहे. आणि आजकाल पूर्ण चित्रपटाचा विषय तीन तास तोच (गुन्हेगारी) असतो. गाणेही नसतात. त्यामुळे गुन्हेगारांना त्यातून अनेक कल्पना मिळायला लागल्या आहेत. हे सिद्ध झालेले आहे हे मी वर सांगितलेच आहे. वर सांगितलेली तीन उदाहरणे जगासमोर आलीत. पण असे किती चित्रपट, मालिका पाहून किती लोकांनी गुन्हा केला असेल पण ते अश्या प्रकारे जगासमोर कधीच आले नसेल.

अश्या मालिकांचा, चित्रपटांचा, पुस्तकांचा लेखक (जो एक सामान्य पापभिरू माणुस असतो) जर विविध कल्पना निर्माण करू शकतो तर त्या पाहून गुन्हेगार का गुन्हा करणार नाही?

चर्चेचा विषय असा :  असे चित्रपट आवश्यक आहेत का? असे चित्रपट गुन्हेगारांसाठी अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकासारख्या व "अपेक्षीत प्रश्नोत्तरां" सारखा उपयोगी पडत आहेत का?

जोड चर्चा : अगदी थोडेसे विषयांतर : आतंकवाद्यांच्या शहरांच्या लिस्ट मध्ये "बॅड मॅन" (बंगळूरु, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, आग्रा?? नागपुऱ??) असे आहे असे पोलिसांना समजले आहे, असे जगजाहीर केल्यानंतर ते अतिरेकी तो प्लॅन नक्कीच बदलून टाकणार, हे दहावीतलाही मुलगा सांगू शकेल. मग हे वृत्तवाहीन्यांवाले असे जगजाहीर का करतात? ते "बॅड वूमन" हे कींवा "बदनाम" असेही असू शकते? आपल्याला काय माहीत? दहशतवाद्यांनो, आम्हाला तुमचा प्लॅन समजला हे टिव्ही वर कशाला सांगता? त्यांचा प्लॅन बदलवायला? या बाबत आपल्याला काय वाटते? जे जे पोलिसांना समजले ते ते लगेच बातम्यांतून जाहीर करण्याची गरज आहे का? यातून दहशतवाद्यांना आपला प्लॅन, मार्ग बदलण्यास मदतच होते. काय वाटते आपल्याला?