व्हेज बिर्याणी

  • गाजर, फ्लॉवर, फरसबी, मटार प्रत्येकी पाव किलो.
  • मेथी एक जूडी
  • चण्याचे पीठ दोन वाट्या
  • जूने बासमती तांदूळ एक किलो
  • कांदे एक किलो
  • काळी मिरी १५ नग
  • लवंग ७-८ नग
  • दालचीनी ४ इंच
  • बडीशोप १ टेबलस्पून
  • जिरे १ टीस्पून
  • धणे एक टेबलस्पून
  • बाद्यान २ फुलं
  • हिरवी वेलची ८ नग
  • दही १ वाटी
  • काजू ५० ग्रॅम
  • बेदाणे २५ ग्रॅम
  • रेडीमेड गरम मसाला पावडर २ टी स्पून
  • कोथिंबीर मूठभर
  • पुदीना मुठभर
  • केशर चिमूटभर
  • दूध अर्धी वाटी
  • हळद - तिखट
  • खायचा सोडा एक चमचा
  • आलं-लसूण पेस्ट २ टेबल स्पून
  • टोमॅटो पाव किलो
  • वनस्पती तूप अर्धा डाव
  • बटर ४०० ग्रॅम
  • कसूरी मेथी पावडर १ टेबल स्पून
२ तास
७-८ जणांना भरपेट

अर्धी वाटी दूध गरम करून घ्यावे. तवा, फ्रायपॅन किंवा कढलं गरम करून, गॅसवरून खाली उतरवून, त्यावर केशर टाकावे आणि थोडे भाजून घ्यावे. (तवा, फ्रायपॅन किंवा कढलं जास्त तापवायच नाही नाहीतर केशर जळून जाईल.) भाजलेले केशर वाटीत काढून थंड झाले की बोटांनी चुरून घ्यावे अथवा केशराचा छोट्टासा खलबत्ता असेल तर खलून घ्यावे. हे केशर गरम केलेल्या दूधात घालून ५ ते ६ तास बाजूला ठेवून द्यावे. वाटी फ्रिज मध्ये ठेवली तरी चालेल. 

मेथीची पाने काढून धूऊन चिरून घ्यावीत. त्यात मावेल एवढे चण्याचे पीठ घालून चिमूटभर हळद, चवी पुरते मीठ, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट मिसळून जरूरी पुरत्या पाण्याने मळून घ्यावे. या मळलेल्या गोळ्याचे सुपारी एवढे गोळे करून किंवा लिंबा एवढा गोळा घेऊन लंबगोल आकाराचे गोळे करावेत. हे गोळे, मंद गॅसवर, तेलात गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. तसेच काजू तळून घ्यावेत. बाजूला ठेवून द्यावेत.

काळीमिरी, लवंग, दालचीनी, बडीशोप, जिरे, वेलची, बाद्यान, धणे कोरडे भाजून, थंड करून मिक्सरवर त्याची वस्त्रगाळ पुड करून घ्यावी.

कांदा उभा आणि पातळ चिरुन घ्यावा. तेलात सोनेरी रंगावर तळून घ्याव. त्यातला अर्धा कांदा, थोडेसेच पाणी घालून गंधासारखा मऊ वाटून घ्यावा.

टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

फ्लॉवरचे तुरे काढून घ्यावेत. गाजर, फरसबी यांचे एक सेंटी आकाराचे (डायमंड शेप मध्ये) तुकडे करून घ्यावेत. सर्व चिरलेल्या भाज्या, मटार पाण्यात घालून त्यात एक टी स्पून मीठ आणि अर्धा टी स्पून खायचा सोडा घालून पातेल्यावर झाकण न ठेवता अर्धवट उकडून घ्याव्यात. उकडल्यावर रोळीत काढून त्यावर थंड पाणी शिंपडावे. 

तांदूळ धूवून, पाण्यात अर्धा तास भिजत ठेवावेत.

एक जाड बुडाचे पातेले गॅस वर ठेवून त्यात अर्धा डाव तूप गरम करावे. तूप तापले की त्यात वाटून ठेवलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ आणि एकजीव होईपर्यंत परतावे. त्यानंतर, वाटून ठेवलेला गरम मसाला, तिखट, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, कसूरी मेथी पावडर घालून परतावे. दही फेटून घालावे. गरज भासल्यास पाववाटी पाणी घालावे. (भाज्या शिजल्या नंतर त्यात पाणी राहाता कामा नये. त्यामुळे पाण्याचा वापर गरज भासली तरच करावा.) मसाला तूप सोडू लागला की अर्धवट शिजवलेल्या भाज्या त्यात घालाव्या. भाजी मसाल्यात नीट मिसळून खाली उतरवून ठेवावी.

तांदूळ निथळवून घ्यावेत. जेवढ्यास तेवढे पाणी आणि अर्धा चमचा मीठ घालून, घट्ट झाकण ठेवून भात मोकळा शिजवून घ्यावा. (गॅस अगदी बारीक, गव्हाच्या दाण्याएवढा ठेवावा). भात शिजला की परातीत काढून जरा थंड करून घ्यावा.

गॅस वर लोखंडी सपाट तवा तापत ठेवावा. (नॉन-स्टीकचा नाही). एखाद्या जाड बुडाच्या पातेल्यास तळाला आणि बाजूंना बटर चोळून लावावे. त्यात अर्ध्या भाताचा थर द्यावा.

या थरावर, सर्व भाजीचा थर लावावा, यावर अर्धे काजू, अर्धे बेदाणे, अर्धी कोथिंबीर, अर्धा पुदीना, एक टी स्पून रेडीमेड गरम मसाला, अर्धे केशराचे दुध, पसरवून घालावे. त्यावर चार टेबल स्पून बटर चार भागात विभागून टाकावे. सर्व मेथीचे मुटके पसरवून लावावेत.

या वर उरलेल्या भाताचा थर द्यावा, त्यावर इतर उरलेल्या गोष्टी (काजू , बेदाणे, कोथिंबीर, पुदीना, गरम मसाला, केशराचे दुध, आणि बटर) वरील प्रमाणेच पसरवून घालावे. त्यावर बाजूला काढून ठेवलेला अर्धा कांदा पसरवून टाकावा. घट्ट झाकण लावून दोन इंची मास्कींग टेपने (कागदाची चिकटपट्टी) पातेले हवाबंद करून गॅसवर तापत ठेवलेल्या तव्यावर अर्धा तास ठेवून द्यावे. (तवा तापल्यानंतर गॅस पुन्हा अगदी बारीक करावा)

अर्ध्या तासानंतर बिर्याणी खाली उतरवावी. (गॅस बंद करायला विसरू नये.)

शुभेच्छा...!   

पातेल्याची टेप जेवणाच्या टेबलवर सगळे जमले की काढावी.  बिर्याणीचा जो दरवळ पसरतो त्याने तुम्ही अर्धी लढाई जिंकता.

बिर्याणी वाढून घेताना, कलथा बिर्याणीत उभा खुपसून भात आणि भाजीचा, असे दोन्ही थर एकत्र काढून वाढावे.

सोबत, खालील कृती प्रमाणे दहीकांदा बनवून बिर्याणी बरोबर घ्यावाः-

४ कांदे उभे आणि पातळ कापून घ्या.
१ इंच आलं बारीक चॉप करून घ्या.
१ मिरची बारीक चॉप करून घ्या.

हे सर्व जिन्नस एकत्र कुस्करून, चवी पुरते मीठ आणि साखर (अगदी थोडी) घालून, दही घाला आणि सर्व एकत्र कालवून शोभेसाठी कोथिंबीर घाला.

दही कांदा तयार. 

बिर्याणीच्या अनेक पाककृती आहेत. त्या पैकी ही जरा क्लिष्ट, वेळखाऊ पाककृती आहे. पण, मला जास्त पसंद आहे.

सौ. केशव (मित्रपत्नी) आणि अनुभव.