आप्पे

  • इडली रवा - ४ वाट्या
  • उडीद डाळ - १ वाटी
  • हरभरा डाळ - १ वाटी
  • हिंग, हळद, मीठ - चवीपुरते
  • जिरे - २ चमचे
  • ओले खोबरे - १/२ वाटी
  • आलं - दिड इंच
  • मिरच्या - ७-८
  • खायचा सोडा
१ तास
६ जणांना

रवा व दोन्ही डाळी वेगवेगळ्या ७ ते ८ तास भिजत घालाव्या. दोन्ही डाळी व जिरे वाटून रव्यात चांगले एकत्र करून उबदार जागी १० ते १२ तास ठेवावे. पीठ चांगले फुगून वर येईल.

त्यानंतर त्यात आले, मिरची, खोबरे, मीठ वाटून घालावे. हळद, हिंग, मीठ (जरुर असल्यास) घालून सर्व नीट एकत्र करून घ्यावे.

पहिल्यांदा आप्पेपात्र ७ ते १० मिनिटे गरम होऊ द्यावे. (नंतर प्रत्येक घाण्याला आप्पेपात्र गरम व्हायला इतका वेळ लागत नाही. ) त्यानंतर त्याच्या प्रत्येक कप्प्यात थोडे थोडे तेल घालून चांगले तापू द्यावे.

थोड्या पिठात चिमूटभर सोडा घालून चांगले हालवून आप्पेपात्राच्या कप्प्यात थोडे थोडे पीठ घालावे. वर झाकण ठेवून ४-५ मिनिटे शिजू द्यावे. झाकण  काढून आप्पे उलटावे. चांगले भाजले की काढावे.

खोबऱ्याचा चटणी बरोबर गरम गरम वाढावे.

१) वर दिलेल्या प्रमाणात साधारण ६० आप्पे होतात.

२) आप्पेपात्रात एका घाण्यात ७ आप्पे होतात. म्हणून पाककृतीला लागणारा वेळ १ तास दिला आहे. एका घाण्याला साधारण ७ मिनिटे लागतात.

सौ. आई