मराठीतले 'सर्वस्पर्शी' संगीतकार

'सारेगमप लिटल चॅंप' या कार्यक्रमाच्या एका भागात शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर मान्यवर परीक्षक होत्या. एका स्पर्धकाने हिंदी गाणे चांगले म्हटले. त्यावर 'आताच एवढा चांगला परफॉर्मन्स दिलाय. आतापासूनच बॉलिवूडमध्ये जाण्याची तयारी कर. मी हिंदीत स्थान मिळविण्यासाठी अजून स्ट्रगल करतोय, ' अशी प्रतिक्रिया अवधूत गुप्ते याने दिली होती.

यावर श्रुती सडोलीकर यांनी केलेली कॉमेंट मराठी माणसाचं आत्मभान जागं करणारी होती. "अवधूत, तुला बॉलिवूडमध्ये करिअर करायचंय, हे ठीक आहे; पण कुणीतरी मला संधी देईल आणि मी तिथे जाईल, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा मराठी संगीतच इतकं समृद्ध करायला पाहिजे, की तुमच्याकडे मराठी गाणी गाण्याची संधी द्या, अशी मागणी अनेकांनी केली पाहिजे. "

श्रुतीताईंची ही प्रतिक्रिया मनात घर करून राहिली आहे.

इथं हा प्रसंग देण्याचं कारण संगीतकार अजय-अतुल हे आहेत. या जोडीचा मराठी चित्रपट आणि संगीत क्षेत्रात सध्या बोलबाला आहे. मराठी संगीतातील पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन या दोघांनी नवनवीन प्रयोग केले. 'साडे माडे तीन' या चित्रपटात 'जाझ'सारख्या संगीत शैलीचा वापर करून त्यांनी मराठी संगीताला वेगळा बाज देण्याचा प्रयत्न केलाय. 'मन उधाण वाऱ्याचे... ', 'कोंबडी पळाली... ' 'सारेगमप'चे शीर्षकगीत... आठवा त्यांची ही गाणी... म्हणूनच या 'सर्वस्पर्शी' संगीतकारांना आता मराठीतील ए. आर. रहमान म्हटलं जातंय. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या दोघांना नुकताच प्रतिष्ठेचा 'निनाद' पुरस्कार मिळाला आहे.

मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू शकत नाही, असा प्रश्न ते विचारतात. या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्माण केली आहेत. इतकेच नाही, तर शंकर महादेव, सुनिधी चौहान यांना मराठी गाणी गायला लावली.

अजय-अतुल यांनी मराठीबरोबरच हिंदी, तेलगू, इंग्रजी गाण्यांनाही संगीत दिलंय. लहानपणापासून आम्ही स्वतःकडे संगीतकार म्हणून पाहतोय, असे ते सांगतात. तुमचं काम बोललं की तुम्हाला संघर्ष कमी करावा लागतो. त्यामुळेच कोणत्याही गाण्याला संगीत देताना ते तंत्र आणि दर्जा या दोन्ही पातळ्यांवर अत्युच्च असावे, असा आमचा प्रयत्न असतो. असं संगीत निर्माण करताना आम्ही स्वतःशीच स्पर्धा करीत असतो, त्यामुळेच दर्जेदार सृजन होतं, अशी अजय-अतुलची धारणा आहे.

अभिरुची उच्च असेल, तर तुमचा विचारही तितकाच परिपक्व असतो. यातून निर्माण होणारी कलाकृती ही परमोच्च आनंद देणारीच असते. अजय-अतुल याच श्रेणीतील आहेत.