सोहळे

पडे पूर्णचंद्रास आता खळे
तमाचीच आली तमाला फळे
तुला लोचने शोधती, ढाळती
मुक्या आसवांचे सडे आंधळे

पतंगापरी कागदी शीड हे
सदा चाललेली तुझी वादळे
कुठे पोचलो हे मुळी ना कळे
मनी बेत होते किती वेगळे

फुले, चंद्रकोरी, निळ्या चांदण्या
दिवास्वप्न वाटेत जे सोडले
उरी बोचते दुःख त्याचे असे
जसे रक्त जख्मेतुनी साखळे

अशी झाकते या जगाला निशा
कुणाचे न काही कुणाला कळे
उरे सोबती एक आता मला
पहाटेस जी चांदणी मावळे

तमाच्या समुद्रातही पेटली
इथे एक ज्योती कधीची जळे
मला मार्ग दावीत जाईल ती
तिच्या भोवती साजिरे सोहळे

--अदिती
( २४ ऑक्टोबर २००८
आश्विन कृ. ११ शके १९२९)