फुल टिल्ट - एक अद्भुतरम्य सायकल सफर

प्रवासवर्णन असे आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे स्थलवर्णनच जास्त असते. कारण त्यातील प्रवास हा पारंपरिक वाहनांतून (मोटार, बोट, विमान, रेल्वे आदी) झालेला असतो. प्रत्यक्ष प्रवासाचे वर्णन त्यात जवळपास नसतेच.

१९६३ साली एक बत्तीस वर्षांची आयरिश युवती सायकलवरून भारतात यायला निघाली, आणि आली. त्या 'प्रवासा'चे वर्णन म्हणजे फुल टिल्ट (Full Tilt) हे पुस्तक. त्या युवतीचे नाव Dervla (काय उच्चार करायचा तो करा! ) Murphy.

तिच्या प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती १९४१ साली. तिला तिच्या दहाव्या वाढदिवशी एक सायकल आणि एक नकाशा भेट म्हणून मिळाला, आणि काउंटी वॉटरफर्ड मधल्या लिस्मोर या ठिकाणी एका टेकडीवर तिने हा प्रवास करण्याचे ठरवून टाकले. आणि धूर्तपणे तिने हा बेत स्वतःपाशीच ठेवला. तो जाहीर करून 'मोठ्या' माणसांची करमणूक करणे (त्यांनी तिच्या डोक्यावर हलकेच थोपटून "होतं असं या वयात, 'मोठी' झालीस की कळेल तुला" असं म्हणणे) हे तिला नको होते. कारण 'मोठं' झाल्यावरदेखील आपल्याला असंच वाटणार आहे, आणि एक दिवस आपण हा बेत तडीस नेणार आहोत हे तिला तेव्हापासूनच ठाऊक होते. आणि तो बेत तिने बावीस वर्षांनी तडीस नेला.

सायकल हे साधे असले, तरीदेखील शेवटी एक यंत्रच. त्यात काय बिघाड होऊ शकतील याचा तिने तिच्यापरीने विचार केला, आणि तिला वाटले की टायरच कामातून जाणे ही गोष्ट तिला सर्वात जास्त त्रासदायक होऊ शकेल. मग तिने तिच्या मार्गावरच्या चार ब्रिटिश वकिलातींत पार्सलने एकेक टायर पाठवून ठेवला.

नकाशे पुनःपुन्हा निरखून पारखून तिने साधारणपणे कुठल्या तारखेला ती कुठे असेल याचा अंदाज बांधला आणि तिच्या मित्र-मंडळींना कळवला. म्हणजे तिला पत्र पाठवायचे असेल तर कुठल्या तारखेला ते कुठल्या वकिलातीच्या पत्त्यावर पाठवायचे याचा त्यांना अंदाज यावा.

तसेच तिने एक स्वयंचलित पिस्तूल खरेदी करून ते वापरण्याचा सराव केला. तिच्या मित्र-मंडळींना जरी हे 'अंमळ जास्तच मेलोड्रॅमॅटिक' वाटले तरी तिने त्याकडे लक्ष दिले नाही. आणि त्याचा तिला पुढे फायदाच झाला.

जवळजवळ ३००० मैल अंतर १४ जानेवारी ते १८ जुलै अशा सहा महिन्यांत पार करून ती दिल्लीला पोचली. पण यातील प्रत्येक दिवस तिने सायकल रेटवली नाही. परिस्थितीवशात तिला मुक्काम करावे लागले. पण जेव्हा सायकलिंग केले तेव्हा दिवसाला पार केलेले कमीतकमी अंतर होते एकोणीस मैल, आणि जास्तीत जास्त अंतर होते एकशे अठरा मैल. सरासरी काढायची झाली तर ती सत्तर ते ऐंशी मैल प्रतिदिवस पडली. ज्यांना गणिती माहितीत (जास्त) रस असतो अशा लोकांसाठी ही आकडेमोड तिने करून ठेवली.

असला हा प्रवास एकट्याने करणारी बाई किती धीराची आणि शूर असेल या कल्पनेला तिने स्वतःच्याच शब्दांत छेद देऊन ठेवला आहे. एपिक्टेटस या ग्रीक तत्त्ववेत्त्याचे शब्द उद्धृत करून ती म्हणते, "मृत्यू वा संकट यांपेक्षा मृत्यू किंवा संकटाची भीती ही जास्त भीतिदायक असते". आणि पुढे स्वतःचे म्हणणे मांडते, की संकटात सापडलेल्या माणसाला धैर्याची गरज असतेच असे नाही, स्व-संरक्षणाची नैसर्गिक जाणीव त्यावेळेस शरीराचा आणि मनाचा ताबा घेते.

पहिले दोन महिने तिने मित्रमंडळींना जमेल तेवढ्या नियमितपणे पत्रे पाठवली. पण ते फारच त्रासदायक होऊ लागल्याचे जाणवल्यानंतर तिने डायरी लिहिण्याला सुरुवात केली. मग एखादे त्यातल्या त्यात विश्वासार्ह पोस्ट ऑफिस दिसल्यावर ती तोवर लिहिलेली डायरी पाठवून देई. तिची मित्रमंडळी त्या डायरीची आपापसात देवाणघेवाण करीत, आणि त्यांतील कुणीतरी एक ती डायरी 'संदर्भासाठी' राखून ठेवी. हे पुस्तक त्या 'संदर्भासाठी'च्या डायरीवर पूर्णपणे आधारित आहे. काही फुटकळ शब्दांच्या किंवा व्याकरणाच्या दुरुस्त्या सोडता तिने त्यावर अजून काही संस्करण केले नाही. घरी निवांत पोचल्यावर ज्ञानकोश चाळून त्यातली माहिती मध्ये मध्ये घुसवून आपण किती थोर हे जाणवून देण्याचा प्रयत्न तिने टाळला.

हा तिचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास, आणि हे पहिले प्रवासवर्णन. नंतर पायाला भिंगरी लागल्यागत तिने नेपाळ, इथिओपिया, बाल्टिस्तान, मादागास्कर, दक्षिण अमेरिका इत्यादी अनेक देश बहुतांशी सायकलवरून प्रवासले  आणि प्रवासवर्णने लिहिली. तिच्याबद्दलची माहिती दुवा क्र. १ इथे पाहावी.

तिची भाषा अगदी सरळ सोपी, नर्मविनोदी आहे. स्वतःवरच विनोद करून हसण्याची तिची पद्धत लोभस आहे. काही वेळेला अतिशयोक्तीचाही सुरेख वापर तिने केला आहे.

तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगांची जंत्री देत बसलो तर अख्खे पुस्तकच परत लिहून काढावे लागेल, त्यामुळे तो मोह टाळतो. फक्त एवढेच नमूद करतो, की काही ठिकाणी तिची 'पाश्चिमात्य' मनोवृत्ती जरा जास्तच ठळकपणे जाणवते. अर्थात हा माझ्या वैयक्तिक समजुतीचाही भाग असण्याची दाट शक्यता आहे.

हे पुस्तक ब्रिटिश कौन्सिलने विकायला काढलेल्या जुन्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून एका मित्राने घेतले. ते मी त्याच्याकडून आणून वर्षभर तसेच ठेवले होते. अचानक वाचायला काढले आणि हाती खजिनाच लागला. ते संपायला आल्यावर मनापासून वाईट वाटले, आणि मी ते पुरवून पुरवून वाचले. पण संपलेच!

हे John Murray नामक लंडनस्थित प्रकाशकाने प्रसिद्ध केले आहे, पण अधिक माहिती आंतरजालावरूनच घेतलेली बरी.