शासनाच्या मराठी शब्दकोशाचा पहिला खंड मार्चअखेर प्रकाशित

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचून आनंद झाला.

मराठी शब्दकोशाचा पहिला खंड पूर्ण : खंडाचे प्रमुख संपादक प्राचार्य रामदास डांगे यांनी "सकाळ'ला दिलेली माहिती.

बातमीचा गोषवारा असा.

बारा वर्षांनंतर सुरू झालेल्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या "मराठी शब्दकोशा'चे "अ' ते "औ' या पहिल्या खंडाचे काम पूर्ण झाले असून तो मार्चअखेर उपलब्ध होणार आहे.

आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व शब्दकोशांतील शब्द यात एकत्रित केलेले आहेत.

दुसऱ्या खंडाचे ("क' वर्ग) काम सुरू झाले असून, मार्चअखेर तो पूर्ण होईल. असे एकूण सात व एक पुरवणीखंड अशा एकूण आठ खंडांची निर्मिती करण्यात येणार आहे.

प्रा. डांग्यांनी आणखी दिलेली माहिती.

कोकणी, अहिराणी, खानदेशी, माणदेशी, झाडी, डांगी, वऱ्हाडी आदी बोलींतील शब्द, दलित व ग्रामीण साहित्यांतील नवीन शब्द यांचा यात समावेश असणार आहे.

व्यावहारिक शब्दकोश (मो. दि. भाटवडेकर), अभिनव मराठी शब्दकोश (द. ह. अग्निहोत्री), प्राचीन मराठी शब्दकोश (डॉ. तुळपुळे, फील्डहाऊस), ऐतिहासिक शब्दकोश (य. न. केळकर), शब्दरत्नाकर (वा. गो. आपटे, भावे), मराठी पर्यायी शब्दांचा कोश (प्र. न. जोशी) हे कोश; तसेच मराठी शब्दविलास, दख्खनी भाषा, एकाक्षरी शब्दकोश, शब्दसंस्कृती (हिंदी), झाडी बोली, उत्पत्ती कोश, लोकसाहित्य, सरस्वती कोश, या संदर्भग्रंथांतील ज्या शब्दांचा समावेश जुन्या कोशांत नाही, त्यांचा समावेश कोशाच्या नव्या खंडांत करण्यात येणार आहे. मराठी भाषेतील नवीन शब्दांचा या कोशात समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी अलीकडील वीस ते पंचवीस वर्षांतील विविध प्रकारच्या ग्रंथांतून नव्यानेच वापरण्यात आलेल्या शब्दांचा संग्रह करण्याचे योजिले आहे. त्यासाठी त्या- त्या प्रदेश व बोलीतील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेण्यात येत आहे.

मूळ बातमी येथे आहे : मराठी शब्दकोशाचा पहिला खंड पूर्ण  (ई सकाळ पुणे, ता. २४ नोव्हे. २००८)


हा शब्दकोश मोल्सवर्थ शब्दकोशाप्रमाणे ऑनलाईन उपलब्ध असेल का? की तो ग्रंथालयांतूनच पडून राहील?

नसल्यास तो तसा करण्यास सुकर जावे अशी काही व्यवस्था ह्या शब्दकोशात संकल्पित असेल/आहे का?