कधी मज वाटे

कधी मज वाटे पुष्पगंध व्हावे
मोकळ्या कुंतली जुई मोगरा फुलावे
कधी मज वाटे अर्धचंद्र व्हावे
तुझ्या रूंद भाळी कुंकुवात हसावे
कधी मज वाटे स्वप्न व्हावे गुलाबी
गहिऱ्या नयनी निशा होऊन जागावे
कधी मज वाटे मधुर गीत व्हावे
डाळींबी अधरी सुरात विलसावे
कधी मज वाटे पवन मंद व्हावे
गुपित गोड मनीचे कानी गुणगुणावे
कधी मज वाटे सुक्ष्म तीळ व्हावे
गोऱ्या लाजऱ्या गाली तीट म्हणून सजावे
कधी मज वाटे सांज रंग व्हावे
तुझ्या कोमल करा मेंदी होऊन उरावे
कधी मज वाटे लय ताल व्हावे
नादी घुंगरांच्या पदन्यासी स्थिरावे
कधी मज वाटे हो आरसा बिलोरी
तुला सामावूनी हॄदयी जपावे
कधी मज वाटे अबोल प्रीत व्हावे
तुझ्या रेशिमस्पर्शी अविरत बहरावे
कधी मज वाटे आस जन्मांतरीची
तुझ्या मिलना सखे फिरूनी जन्मा यावे