भक्ती

दारावरती तोरण बांधित
कुंदकळ्यांची रास जणू 
बहरून आली वेल फुलांनी
तरारून ये अणू अणू

रूपसुंदरा गाते आणिक
रसरसलेली काव्यफुले
तुषारांतले गीत नाचरे
चंद्रासंगे किती डुले

अंधारावर काढत बुट्टे
दिवे दिवे पाजळताना
किती तारका नाचत येती
सांजरंग ओघळताना

ऐश्वर्याचा आनंदाचा
उत्सव दाटे सभोवती
दूर कुठेशी पहा चालली
तुला साजिरी धुपारती

लखलखत्या तेजात तुझे ते
दर्शन घडता भगवंता
हात अचानक जुळती माझे
तुझी पाहता अथांगता

माझ्या छपरामधील भोके
तुझ्या घराचे दरवाजे
उचंबळे अंतरात माझ्या
रूप तुझे ते किति साजे!

--अदिती
( मार्गशीर्ष शु. १४ शके १९३०,
११ डिसेंबर २००८)