पहाटे पहाटे ...

रात्रीचा गडद काळा घनदाट अंधार एखादी शाईची दौत लवंडावी तसा सभोवार दाटलेला असतो. शांत, संथ, थंडगार मखमली अंधार. असं वाटतं की आकाशात राहणाऱ्या म्हातारीने अंधाराचा हंडा चुलीवर चढवला आणि चूल बंद करायला ती विसरूनच गेली. दुधावर धरावी तशी दाट जाडसर सलग साय अंधारावर धरली आणि त्या सायीखालून द्रवरूप अंधाराने उतू जायला सुरुवात केली. बघता बघता अंधार सगळीकडे पसरला.

काळा म्हणजे तरी कसा? तान्ह्या बाळासाठी म्हणून मुद्दाम नंदादीपाच्या वातीवर चांदीचा चमचा धरून, त्याची काजळी तुपात खलून आजीनं केलेल्या बाळकाजळाइतका मुलायम. सुगंधी. अंगावर रोमांच उभे करणारा. उन्हाळ्याच्या दिवसांत, रात्री गच्चीवर टिपूर लख्ख चंद्रप्रकाशात फिकट उदास वाटणारा. पण मध्यरात्रीनंतर चंद्र कलायला लागल्यावर त्या चंद्रावरही मायेनं पांघरूण घालणारा. शहरात असताना दिव्यांच्या झोतांमुळे गढूळ झाल्यासारखा वाटणारा भेसळमय अंधार शहराबाहेर गेलं की कसा सलग, घट्ट एकसंध, गुळगुळीत वाटतो. रायगडावर रोपवेमधून जाताना वर आकाश, खाली दूर राहिलेली जमीन आणि त्यांच्यामधल्या पोकळीमध्ये अंधारावरच उभा असलेला तो अधांतरी तंबू कशी अनामिक हुरहूर लावून जातो.  

कधीकधी रात्री अचानक जाग येते. डोळे उघडले आहेत की मिटलेले हेही लक्षात येऊ नये असा अंधार सगळीकडे पसरलेला असतो. मधूनच पलिकडच्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक्सचे आवाज वाऱ्यावर तरंगत येतात. अनामिकाची भिती वाटण्याऐवजी त्या अंधाराची सोबत मस्त उबदार वाटायला लागते. अजून बराच वेळ रात्र आहे असं वाटत असतानाच पलिकडे आंब्याच्या झाडावरून कोकिळ ओरडायला लागतो. डोळ्यांपुढे अर्धवट राहिलेलं स्वप्न असतं पण खिडकीबाहेर एक निराळंच जग खुणावत असतं.

अंग चोरून जेरीच्या पांघरुणात झोपलेल्या टॉमने झोपेत हातपाय पसरल्यावर ते पांघरूण त्याला जसं अपुरं पडत जाईल तसं आकाशाने तोंडावरून ओढून घेतलेलं अंधाराचं पांघरूण त्याला अपुरं पडायला लागतं. सर्व बाजूंनी त्या पांघरुणाच्या कडा हळूहळू उलायला लागलेल्या असतात. प्रकाश मांजरासारखाच पावलांचा आवाज न करता क्षितिजाच्या कडेकडेने आभाळाच्या घुमटात झिरपायला लागलेला असतो. झुंजूमुंजू, ब्राह्ममुहूर्त, पंचपंच उषःकाल, भली पहाट या सगळ्या शब्दांनी एकत्रितपणे जिचं वर्णन करता येणार नाही अशी ती साखरझोपेची वेळ फारच गोड असते. पूर्व क्षितिजावर आश्विनौ, उषा , अरुण इ. चिरतरुण मंडळी दर्शन देत असतात. धड अंधार नाही , धड उजेड नाही अशी ती प्रातःसंध्येची वेळ कळेल नकळेल असं काहीतरी अस्फुट सांगून जाते . तिच्या अपूर्णतेच्या गोडीला त्या अस्फुटाची मोठी हृद्य झालर असते. जगाच्या आरंभापासून ती किती माणसांना अशीच जाणवत राहिलेली आहे असा विचार आला की आजवर जन्माला आलेल्या असंख्य अनाम मानवांशी आपलं काहीतरी नातं आहे असं वाटून जातं.

हळूहळू "मी आहे, मी जागा आहे, मी इथे आहे" असं ओरडत बसायच्या कामाचा खांदेपालट होतो. रातकिड्यांची ड्यूटी संपल्यामुळे ते आनंदाने झोपी जातात आणि ताज्यातवान्या झालेल्या चिमण्या नव्या दमाने ते काम करायला सुरुवात करतात. त्यांच्या आवाजाने वैतागून कावळे उठतात. "काय शिंची कटकटाय, अगं ए पलिकडे जाऊन झोप बघू तू.... " असा काहीसा सूर लावत ते आपली आघाडी उघडतात. सामना उत्तरोत्तर रंगत जातो. मध्येच भारद्वाज मंडळी बुभुःकार करून जातात. दयाळ हजेरी लावतात. शिंपी, शिंजीर, नाचण, बुलबुल, होले इ. मंडळी आपली प्रातःकाळची स्वरमेहनत आटपतात तोवर आभाळातून अंधार हद्दपार झालेला असतो. मोतिया रंगाचा कोवळा प्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. त्याला अजून तेजाचं रूप मिळालेलं नसतं. चुलीवर ठेवलेलं पातेलं नुक्तं तापायला लागावं आणि पुढे होणाऱ्या तप्त अवस्थेची  त्याने उगाचच चुणूक दाखवावी तसा तो बाळप्रकाश सूर्याचं उन्ह लौकरच येणार आहे याचं सूतोवाच करून जातो. फार ऊष्ण नसलेला तो प्रकाश हवाहवासा वाटतो.

खिडकीबाहेर ही लगबग सुरू असतानाच घरोघरी उत्साही मंडळी फिरायला म्हणून बाहेर पडतात. ( अतिउत्साही आजोबा मंडळी एक फेरी संपवून एव्हाना रस्त्याकडेच्या बाकावर विसावलेली असतात). एवढं सगळं झाल्यावर कोंबड्यांना खडबडून जाग येते आणि जणू काही आपण आरवलो म्हणूनच एवढा 'उजेड' पडला अशा थाटात कुक्कुटमंडळी आपली सेवा रुजू करायला लागतात. घरोघरीच्या आकाशवाण्या आपापल्या आवडीप्रमाणे गाऊ लागलेल्या असतात. कुठे लघुलहरींवर 'स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला' चा गजर सुरू असतो तर कुठे एफ्फेम वर आगाऊ आरजे मंडळी पंजाबी गाण्यांचं दळण काल रात्रीची शिळी मिसळ लिंबू पिळून पुन्हा विकायला ठेवावी तशी दळू लागलेली असतात. आणि या गडबडीतच खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आगगाडीचं इंजिन  एकदम धडधडत फलाटावर यावं तसा तो बालरवीचा पहिला किरण एकदम जमिनीवर उतरतो....
आणि आत्तापर्यंत मधुर, रमणीय वगैरे वाटणारी सोनेरी सकाळ "हापिसची वेळ झाली "  चा गजर करणाऱ्या घड्याळाच्या काट्यांमागे पार नाहीशी होऊन जाते. मखमली वगैरे अंधार, सोनसळी वगैरे सकाळ आणि बालरवी वगैरे मंडळी पुलाखालून वाहून गेलेल्या पाण्यासारखी वाहून गेलेल्या काळच्या पाठ्यपुस्तकांच्या पानांमध्ये लुप्त होतात.
' माइल्स टु गो बिफोर आय स्लीप, प्लेसेस टु गो अँड प्रॉमिसेस टु कीप ' चा विचार मनात येतो आणि ते माइल्स कापून पुन्हा रात्र यायला खरंच युगं लोटणार असं वाटायला लागतं. रात्रीची जादू नाहीशी होते पण जिभेवर रेंगाळणारी पहाटेची गोडी मात्र ती जादू खरंच इथे होती याची ग्वाही देत राहते.

--अदिती
(१६ फेब्रु. २००९,
माघ कृ ७, शके १९३० )