चिकन टिक्का मसाला

  • कोवळ्या चिकन ब्रेस्ट ३
  • कांदे ३ मध्यम
  • लालबूंद टोमॅटो ६ मध्यम
  • काळीमिरी १० नग
  • तमाल पत्र २
  • काश्मिरी तिखट १ टी स्पून
  • गरम मसाला पावडर अर्धा टी स्पून
  • काजू १०० ग्रॅम
  • फ्रेश क्रिम ५०० ग्रॅम
  • तेल २ टेबल स्पून
  • बटर २५० ग्रॅम
  • कसूरी मेथी पावडर १ टेबल स्पून (सपाट)
  • आलं-लसूण पेस्ट १ टेबल स्पून
  • मीठ चवी नुसार.
  • साखर १ टि स्पून
  • लाल रंग अंदाजाने.
  • लिंबे ३ मध्यम
२ तास
५ ते ६ पोटभर

चिकन ब्रेस्ट मधील हाडे काढून ब्रेस्ट 'बोनलेस' करुन घ्यावी. ब्रेस्टचे दीड इंचाचे तुकडे करावे.

या तुकड्यांना आले-लसूण पेस्ट, मीठ चोळून त्यावर लिंबे पिळावीत. हे दोन तास मुरत ठेवावे.

नंतर २०० ग्रॅम क्रिम फेटून त्यात लाल रंग किंचीत मिसळून क्रिम केशरी रंगाचे बनवून घ्यावे. आता यात चिकनचे तुकडे मिसळून ते सर्व निखाऱ्यावर भाजून घ्यावेत. निखाऱ्यावर भाजण्याची सोय नसेल तर ओव्हन सुरक्षित ताटलीला जरा बटरचा हात लावून त्यावर चिकनचे तुकडे मांडून ३०० डिग्री तापमानावर ओव्हन मध्ये भाजून घ्यावेत. त्यासाठी आधी ओव्हन ३०० डिग्री तापमानावर तापवून घेऊन नंतर चिकन आंत ठेवावे. मध्ये एकदा सर्व तुकडे बाजू बदलून ठेवावे. दोन्ही कडून खरपूस भाजून झाले की बाहेर काढून ठेवावेत.

आता, काजू, पाण्यात घालून उकडावेत. उकडले की थंड करून त्याची पेस्ट करून ठेवावी. २०० ग्रॅम क्रिम फेटून ठेवावे. कांदे पातळ आणि लांब चिरून सोनेरी रंगावर तळून काढावेत. थंड झाले की थोडे पाणी घालून त्याचीही पेस्ट करावी. टोमॅटो चिरून, मिक्सर मध्ये फिरवून त्याचा रस बनवावा. तो गाळून ठेवावा.

एका पातेल्यात तेल आणि बटर टाकून तापवावे. ते तापले की त्यात काळीमीरी आणि तमाल पत्र टाकावे. मसाला परतला की त्यात कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोचा रस टाकून परतत राहावे. रस शिजून जरा आटला की त्यात काजू पेस्ट टाकावी. नीट मिसळून घ्यावी. त्यात, काश्मिरी तिखट, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, कसूरी मेथी, मीठ चवीनुसार, साखर १ टि स्पून टाकून मिसळून घ्यावे. गरज भासल्यास किंचीत (अर्धी वाटी) पाणी टाकून रस्सा सारखा करून घ्यावा. आता त्यात २००ग्रॅम क्रिम फेटून घालावे आणि रस्सा मिसळून घ्यावा. किंचीत रंग मिसळून रस्सा केशरी रंगाचा करून घ्यावा. रस्सा शिजून बटर सुटू लागले की चिकनचे भाजलेले तुकडे त्यात टाकून मिसळावे. पाच मिनिटांनी उतरावावे.

चिकन टिक्का मसाला वाढण्याच्या सटात काढून त्यावर उरलेले, फेटलेले क्रिम घालून, वर कोथिंबीर भुरभुरून सजवावे.

शुभेच्छा...!

चिकन टिक्का मसाला दाटसर केशरी रंगाचा असतो. हा बटर नान, परोठे किंवा भाताबरोबर छान लागतो. चिकन टिक्का मसाला कमी मसालेदार असून बटर आणि क्रिमच्या चवीचे टोमॅटोच्या आंबट गोड चवीशी सख्य साधून असतो. तिखट नसल्याने मुलांना विशेष आवडतो.