सरकारी मराठी शब्दकोश-प्रकाशन समारंभ

बारा वर्षांपूर्वी ज्याचे काम सुरू झाले होते त्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या "मराठी शब्दकोशा'च्या "अ' ते "औ' या पहिल्या खंडाचे काम पूर्ण झाले असून, त्या खंडाचे प्रकाशन शनिवार दिनांक १४ मार्च २००९ रोजी पुणे शहरातील उद्यान प्रसाद कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. 

आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व शब्दकोशांतील शब्द यात एकत्रित केलेले आहेत.

दुसऱ्या खंडाचे ("क' वर्ग) कामही सुरू आहे. एकूण सात व एक पुरवणीखंड अशा एकूण आठ खंडांची निर्मिती करण्यात येणार आहे.

कोशाचे प्रमुख संपादक प्राचार्य डांग्यांनी दिलेली माहिती:-

कोकणी, अहिराणी, खानदेशी, माणदेशी, झाडी, डांगी, वऱ्हाडी आदी बोलींतील शब्द आणि दलित व ग्रामीण साहित्यांतील नवीन शब्द यांचा या कोशात समावेश आहे.

व्यावहारिक शब्दकोश (मो. दि. भाटवडेकर), अभिनव मराठी शब्दकोश (द. ह. अग्निहोत्री), प्राचीन मराठी शब्दकोश (डॉ. तुळपुळे, फील्डहाऊस), ऐतिहासिक शब्दकोश (य. न. केळकर), शब्दरत्नाकर (वा. गो. आपटे, भावे), मराठी पर्यायी शब्दांचा कोश (प्र. न. जोशी) हे कोश; तसेच मराठी शब्दविलास, दख्खनी भाषा, एकाक्षरी शब्दकोश, शब्दसंस्कृती (हिंदी), झाडी बोली, उत्पत्ती कोश, लोकसाहित्य, सरस्वती कोश, या संदर्भग्रंथांतील ज्या शब्दांचा समावेश जुन्या कोशांत नाही, त्यांचा समावेश कोशाच्या नव्या खंडांत केला आहे. या व्यतिरिक्त, मराठी भाषेतील नवीन शब्दही या कोशात दाखल झालेले आहेत. त्यासाठी अलीकडील वीस ते पंचवीस वर्षांतील विविध प्रकारच्या ग्रंथांतून नव्यानेच वापरण्यात आलेल्या शब्दांचा संग्रह करण्याचे काम अखंड चालू ठेवले आहे. त्यासाठी त्या-त्या प्रदेश व बोलीतील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेण्यात येत असते.

प्रा. पूर्णिमा लिखिते कोशाच्या एक सहसंपादिका आहेत.