हिशेब

तुझे काय? माझे काय? हिशेबाला सुरुवात.

एकमत झाले : हसू, दुमताला रुजवात ।

दिले कुणी? जास्त कुणा लाभलंय दानी ऊन?

उत्तरातसुद्धा सखे,लाभतात प्रश्नचिन्हं ।

मिळे कुणा? कुणातले संपलेत चंद्र आज?

आणि माथी कुणाच्या गं आज नक्षत्रांचे साज?

कुणा नदी? पाऊसही, आणि नवी फुले, पक्षी?

हस्तरेषांतून आणि कुणाच्या गं मोर-नक्षी?

सांगतेस ? तुला तरी मोजमाप साधले का?

कमी-जास्त, प्रयत्नांनी कुणीतरी सांधले का?

"होय, सांधलेत सारे चंद्र आणि प्रश्नचिन्हं ।

फुले, पक्षी, मोर-नक्षी, पाऊस नि वेडी उन्हं ।"

मग आता तुझे आणि माझे काय हिशेबाला?

फक्त आहे मोजायाचे, खारे पाणी, तारामाला ॥