आयुष्या....

तुझ्या नादास लागावे कुणी रमणीय आयुष्या?
सरे आयुष्य, करताना तुला सहनीय आयुष्या

इथे येणे, हवेसे वाटणे किंवा नको होणे
कुठे आहेस माझा सांग तू परकीय आयुष्या?

तुला जाणीव व्हावी याचसाठी प्रेम केले मी
पुन्हा जाऊ नको नरकामधे स्वर्गीय आयुष्या?

रचावी चांगली कविता, तुझा सल्ला खरा आहे
जसा आहेस ते मी मांडतो दयनीय आयुष्या

किती कंटाळलो, आता स्वतःशी दुष्मनी व्हावी
बुडाला लावतो आगी तुझ्या निष्क्रीय आयुष्या

इथे होतास तेव्हाची अवस्था माहिती आहे
कशाला व्हायचे मागून आदरणीय आयुष्या?

तुझे आहे बरे, येतोस अन जातोस केव्हाही
तुझ्याहीहून आहे मी अनाकलनीय आयुष्या