मुक्त कविता!

का म्हणून साऱ्याच शब्दांनी

अळी-मिळी गुप चिळी पाळलीये?

ह्या प्रश्नानं मन भांडावून गेलं.

व्यक्ती नसली की तिचं महत्त्व कळतं...

तसंच शब्दांबाबत झालं...

''शब्दच नसतील तर???

माणसाला कुणी माणूस म्हणणार नाही,

विश्वाला कुणी विश्व म्हणणार नाही,

कारण 'माणूस' आणि 'विश्व' च काय,

पण'कुणी' हा शब्दच मुळात अस्तित्वात नसेल... ''

मन भरकटत होतं.

खट्याळ शब्द मौनानंच सगळं पाहात होते.

त्यातल्याच एकाला हसू आवरेना...

तो फुटला...

तो फुटला, तसे सगळेच शब्द खदा खदा हसू लागले !

त्यातल्या एकेका शब्दाचं हसणं थांबवून

त्यांना एका जागी आणताना

गंमत झाली !!!

त्यांच्या मुक्त हसण्यासारखीच

मुक्त कविता झाली !