अर्घ्य

अनादी कालापासून मिळालेलं

ते तेजाचं वरदान-

अनंत कालापर्यंत टिकणारं-

हे सूर्या,

त्या तेजाचं वरदान आम्हालाही दे!

ब्रम्हांडामध्ये स्थिर झालेल्या हे सूर्या,

या मृदकणांच्या गर्भात

तुझ्या तेजांशानं चिरवास करीत राहा;

सप्तसागर

आपल्या वीर्यानं तुला अर्घ्य देतील;

तुझ्या वरदानानं

तेजोराशी धारण करून

अवघ्या वरस्पती

आम्हाला तेजान्न प्रदान करतील

आणि

आमचं वीर्य तेजोमय असेल!

ब्रम्हांडामध्ये विराजमान झालेल्या

हे हिरण्यगर्भा,,

तेजांशाच्या रूपानं

सहस्त्र गर्भाशयात

तूं चिरवास करीत राहा-

आमच्या पिंडातील धातूंच्या

सप्ताश्वरथातलं वीर्य-

त्या वीर्याची आम्ही

ओम भूर्भुव:स्वाहाच्या जपनादात

तुला दिलेली अर्घ्य स्वीकारून

सहस्त्ररश्मींसारखी तेज:पुंज

सहस्त्र-सहस्त्र संतती इथे अवतरू दे-

जिच्या योगानं ही भरतभू

तेजानं उजळून निघेल!

हे सूर्या,

तुझ्या अनादी-अनंत तेजानंच

कुंतीची कूस धन्य धन्य झाली होती!