मे ११ २००९

१. अध्यात्म : पूर्वभूमिका

ह्यासोबत

१) अध्यात्माचा साधा अर्थ आपण मुळात काय आहोत हे समजणे असा आहे. जे तुम्हाला समजेल ते तुम्ही आत्ता, या क्षणी आहातच त्यामुळे अध्यात्म म्हणजे तुमचा तुम्हाला पत्ता सांगण्या सारखे आहे. जीवनातली सगळी निराशा, टेन्शन्स, असहायता आणि जे जे काही म्हणून उणे आहे ते आपण मुळात कोण आहोत हे न समजल्यामुळे आहे. आपल्या मूळ स्वरूपाला सत्य, शाश्वत, अमृत, शून्य, आत्मा, निराकार, अनंत, अपरिवर्तनीय अशी अनेक नांवे आहेत पण सगळ्याचा अर्थ एकच आहे. त्यामुळे  अध्यात्मात शब्दाला महत्त्व नसून कळण्याला आहे. सत्य कळले की नाही हे समजण्याचा एकमेव मार्ग किंवा पुरावा तुमच्या जीवनातली चिंता पूर्णपणे नाहीशी झाली की नाही, तुम्हाला जगण्याची मजा यायला लागली की नाही, तुम्हाला कोणत्याही प्रसंगात पूर्णपणे स्वस्थ वाटते की नाही हा आहे. अध्यात्मातला पॅरॅडॉक्स असा आहे की तुम्हाला सत्य कळले नाही म्हणून तुमचे स्वरूप किंवा मूळ रूप बदलत नाही. स्वरूप कळल्याने तुम्ही निश्चिंत होता आणि न कळल्याने किती जरी प्रयत्न केला आणि मनाजोगते झाले तरी सचिंत राहता एवढाच फरक आहे.

२) अध्यात्मातला संवाद हा नेहमी ऐकणाऱ्याच्या ओपननेस वर  अवलंबून असतो, ज्या क्षणी तुम्हाला मला काही कळले नाही असे वाटेल त्या क्षणी माझ्यातला आणि तुमच्यातला दुवा निखळेल. त्यामुळे मला समजले असो अगर नसो तुम्ही मला समजले आहे असे मानता की नाही यावर मी काय म्हणतो ते तुमच्या पर्यंत पोहोचणार की नाही हे अवलंबून आहे. आध्यात्मिक चर्चा हा दोघातला संवाद आहे त्यामुळे बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला समजले आहे की तो उगाच वाद घालतो आहे हे लगेच समजते. अर्थात सांगणाऱ्याचा आनंद हा ऐकणाऱ्याला समजल्यावर द्विगुणित होतो पण बोलणारा प्रतिसादांचा कौल पाहून बोलत नाही, नाहीतर ते न समजलेल्याने समजलेल्या शिकवण्या सारखे होईल. तुम्हाला ही चर्चा निरस वाटली तर तुम्ही बाजूला होऊ शकता पण एखाद्याला खरंच समजत असेल तर त्याला डायव्हर्ट करू नका. या लिखाणाचा उद्देश एक अतिशय सोपी गोष्ट अत्यंत सोप्या पद्धतीनं तुमच्या पर्यंत घर बसल्या आणि मोफत पोहोचवणे आहे, वाद निर्माण करणे, कुणाचाही अपमान करणे, कुणालाही कमी लेखणे हा नाही. तुम्हाला सत्यं समजले नाही तरी तुमच्यात कोणतेही न्युनत्व येत नाही त्यामुळे अश्या प्रकारचे गैरसमज करून घेऊन किंवा मी स्वतःला कोण समजतो अशी माझी संभावना करून काहीही साधणार नाही. काहीही करून तुम्हाला समजलेच पाहिजे किंवा मला समजले आहे हे सर्वमान्य झाले पाहिजे असा या लेखनाचा हेतू नाही. जेंव्हा मला वाटेल की या लेखनाचा कुणालाही काही फायदा होत नाही तेव्हा मी लिहिणे बंद करीन.  

३) जेव्हा एखाद्याला सत्य समजते तेव्हा तो आपल्या भाषेत आणि आपल्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतो. तो कुणाचेही अनुकरण करत नाही. त्यामुळे गीता ही गीता आहे, उपनिषदे ही उपनिषदे आहेत, कुराण वेगळ्या पद्धतीने सत्यं मांडते, पातंजली त्यांची पद्धत सांगतात, बुद्ध त्याच्या भाषेत शून्याची उकल करतो, त्यामुळे सत्यं जरी एकच असले आणि सगळ्यांचा निर्देश एकाच गोष्टीकडे असला तरी मार्ग आणि अभिव्यक्ती भिन्न होतात आणि त्यात समन्वय होऊ शकत नाही. तुम्हाला माझं म्हणणं समजलं नाही तर तुम्ही गीता वाचा पण मला गीतेतल्या प्रमाणे सत्याची उकल करा असे तुम्ही म्हणू शकत नाही कारण ते गीतेवर प्रवचन होईल. मी माझ्या पद्धतीनं उकल करीन. मला कॉंप्रमाईज करता येणार नाही.

४) सत्यं शोधनाचे खरं तर तीनच मार्ग आहेतः एक : सांख्य योग (म्हणजे ज्याला समजले आहे त्याचे फक्त ऐकणे), दोन : भक्ती योग (म्हणजे एखाद्या मानसिक आकाराशी तद्रूप होऊन निराकाराला जाणणे) आणि तीन : तंत्र (म्हणजे काही शारीरिक किंवा मानसिक प्रक्रियांनी सत्याप्रत पोहोचणे). आपण सांख्य योगाचा मार्ग अवलंबणार आहोत. हा मार्ग भक्तिमार्गा पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. तुम्हाला तुमची कुणावरही श्रद्धा असली तरी ती बाजूला ठेवावी लागेल. नाहीतर तुम्ही गोंधळात पडाल किंवा दुखावले जाल.  सांख्य योगात निराकाराला सरळ समजून घेतले जाते त्यामुळे देव ही कल्पना निराधार ठरते. कारण देवाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी आहे आणि प्रत्येक कल्पना हा आकार आहे, पण निराकार एकच आहे. तंत्र मार्ग म्हणजे पातंजलींचा अष्टांगयोग किंवा शिवाचे तंत्रसूत्र या शारीरिक किंवा मानसिक प्रक्रिया आहेत त्या ह्या चर्चेत येणार नाहीत. फक्त ऐकणे आणि समजून घेणे हा अत्यंत सहज आणि सोपा सांख्य मार्ग आपण बघणार आहोत.

५) ह्या लेखनाचा प्रत्येक लेख संपूर्ण असेल. जसे एका महालात जायला शंभर दारे आहेत तुम्ही कोणत्याही दराने आत जाऊ शकता तसे कुठलाही ऐक लेख तुम्हाला सत्याची उकल करू शकेल. एकदा महालात आल्यावर तुम्हाला कळेल की सगळी दारे एकाच ठिकाणी येत होती. तुम्हाला उकल होत नाही याचा अर्थ तुम्हाला दार सापडले नाही. एकदा उकल झाल्यावर तुम्हाला कळेल की मी ऐकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकाराने सांगत होतो कारण सत्य ऐकच आहे. कोणत्याही ऐका लेखनाची दुसऱ्या लेखनाशी विसंगती असू शकत नाही त्यामुळे तेव्हा तसे आणि आता असे अश्या चर्चा करण्यापेक्षा समोर असलेल्या लेखनावर चर्चा विधायक होईल.

चर्चे साठी समान भाषा-समज आवश्यक आहे. निराकार हा माझा सत्याकडे निर्देश करण्यासाठी आवडता शब्द आहे. ओशो ज्याला 'नाऊ अँड हिअर' बुद्ध ज्याला शून्य, उपनिषदे ज्याला पूर्ण, आध्यात्मिक परिभाषेत ज्याला सत्य, कुराण ज्याला अल्ला, कृष्ण्मूर्ती ज्या प्रक्रियेला 'चॉईसलेस अवेअरनेस' निसर्गदत्त महाराज ज्याला सदवस्तू आणि एकहार्ट टोले ज्याला बीइंग म्हणतो त्याला मी निराकार म्हणणार आहे. आपण मुळात निराकार आहोत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. सध्या निराकार हा तुमच्यासाठी शब्द आहे पण मुळात निराकार हे आपले या क्षणी आणि काहीही न करता लाभलेले स्वरूप आहे.

Post to Feedबहोत खूब!
खुप आवडले
पटले नाही
अजनुकर्ण : सत्य एकच आहे यात न पटण्यासारखे काय आहे?

Typing help hide