आदर आणि मान

आदर आणि मान हे साधारण समान अर्थच्छटा असलेले दोन शब्द मराठी भाषेत प्रचलित आहेत. असंख्य ठिकाणी आणि असंख्य प्रसंगांमध्ये हे शब्द वापरले जातात. माझ्या भाषेवर असलेला पुणेरी शुद्ध मराठी (हा म्हणजे मनोगतावरचा आयडी नव्हे. ही पुणे ३० भागातली एक बोलीभाषा आहे )  बोलीचा प्रभाव मान्य करूनही, या दोन शब्दांचा वाक्यात उपयोग नक्की कसा करावा याबद्दल अलिकडे मला काही प्रश्न पडतात. उदा.
मराठी भाषेत मान दिला जातो, (सन्)मान केला जातो, मान राखला जातो, (बहु)मान केला जातो, मान राखला जातो आणि मान केला जातो
तर
आदर बाळगला जातो , किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आदर असतो, आदराने उल्लेख इ. केला जातो, अतिथीचे आदराने अतिथ्य केले जाते, एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा किंवा एखाद्या पदाचा आदरणीय या नावाने उल्लेख केला जातो तेंव्हाही 'लोकांच्या आदरास पात्र' या अर्थाने आदरणीय असा अर्थ अभिप्रेत असावा असा माझा भाबडा समज आहे.
पण
मराठीत आदर करणे असा शब्दप्रयोग प्रचलित आहे काय? एखाद्या व्यक्तीचा मी आदर करतो / करते म्हणजे नक्की काय करणे अपेक्षित आहे?
मराठी भाषेच्या (मला अज्ञात )इतर बोलींमध्ये असा शब्द प्रचारात आहे का? की हा मराठीवरील सरळसरळ हिंदी भाषेचा प्रभाव आहे? हा शब्दप्रयोग कसा आला असावा?
हिंदी भाषेत कदर (कद्र) करना असा वाक्प्रचार ऐकलेला आहे. एका पंजाबी लोकांवर आधारित हिंदी चित्रपटात ( पिंजर - अमृता प्रीतम यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट) "भूले से भी कभी उसका निरादर मत करना" असा एक संवाद ऐकलेला आठवतो आहे. हे दोन उल्लेख किंवा वाक्प्रचार आदर करणे या शब्दप्रयोगाच्या जवळ जातात असे वाटते.
तरीही हा आदर करणे नामक प्रकार काय आहे आणि हा शब्दप्रयोग प्रचारात नसेल तर त्याच्या ऐवजी मराठीमध्ये काय शब्द वापरला जातो / जावा यावर तज्ञ प्रकाश पाडू शकतील काय?
धन्यवाद
--अदिती
( माझ्या मर्यादित ज्ञानावर आधारलेला हा प्रश्न मी येथे उपस्थित केला आहे. जर माझ्या ज्ञानातच त्रुटी असतील तर कृपया उदार मनाने मला क्षमा करावी ही विनंती.)