मुक्त

युद्धाची तुतारी वाजली तशी त्याने शस्त्रसज्ज व्हायला आपल्या मनाचा दरवाजा उघडला. तर्कदुष्टतेचे हत्यार आणि बधिरलेल्या भावनांचे चिलखत या साजाकडे त्याची पावले पडू लागली. त्याला हात घालताच त्याने नेस्तनाबूत केलेल्या असंख्य जाणीवांची भुते उत्सुकतेने कलकलाट करू लागली. आता त्यांच्यात आणखी एकाची भर पडणार होती.

त्याच्या दृष्टीने आजचा संग्राम शेवटचाच होता. जन्म आणि मृत्यूच्या वर्तुळात त्याला जखडून ठेवणाऱ्या अखेरच्या बेडीवर तो आज घाला घालणार होता आणि कुठल्यातरी अज्ञात परिक्रमेला जाणार होता.

पण त्याने शस्त्रसज्ज व्हायला सुरुवात करताच एक आश्चर्य घडले.

त्याचे चिलखत विरून गेले आणि त्याचे हत्यार त्याच्यावरच कोसळून त्याची त्याच्या असंख्य जाणीवांइतकीच शकले झाली.

प्रत्येक जाणीवेचे भूत आपापला तुकडा घेऊन निर्विकारपणे भिरभिरत गेले.

हा संग्राम अखेरचाच होता.

जन्म-मृत्यूच्या वर्तुळातून तो मुक्त झाला होता.