संपल्यानंतर

घालतो कपडे तरी नंगाच मी
भावनांचा एक नंगानाच मी

मी जसा नाही तसे का बनवता?
सरळ जगणे सोडले केव्हाच मी!

खूप लोकांना तपासुन पाहिले
जाणले की शेवटी माझाच मी

ती खरोखर समजते काही मला...
की मलाही देत आहे लाच मी?

एक साधे तत्त्व मीही पाळतो
जो मला 'पाजेल' बस त्याचाच मी

खूप गेला वेळ हे समजायला
फार ना काही तसा साधाच मी

आरशाची काच बहुधा 'बाकली'
मी कसा अन दाखवे भलताच मी

केवढा सांभाळला होता तरी
संपल्यानंतर तसा गेलाच 'मी'