आषाढस्य प्रथमदिवसे......

आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. मनोगतींना कवी कुलगुरू कालिदासाच्या मेघदूत काव्याचा परिचय करून देत आहे. अर्थात हे काव्य जगप्रसिद्ध लघुकाव्य आहे त्यामुळे खूपजणांना त्याचा परिचय असणारच पण आजचा दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा होतो त्यानिमित्त हे स्मरण.

लघुकाव्य किंवा खंडकाव्य हा संस्कृत साहित्यातील प्रसिद्ध प्रकार आहे. मानवी भावनांचे यथार्थ चित्रण यात आढळते. यातील प्रत्येक श्लोक हा आशयसंपन्न असतो. वाक्यं रसात्मकं काव्यम..... ही काव्याची व्याख्या या लघुकाव्याला बरोबर लागू पडते. भावनाचे चित्रण असल्याने हे भावकाव्य आहे तसेच याला गेयता असल्याने हे गीतिकाव्यही आहे. निसर्ग आणि मानव यांच्यातील अत्यंत हृद्य नाते संबंध या भावकाव्यात प्रतीत झाला आहे. केवळ १२० श्लोकांचे हे काव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे दोन भागात विभागलेले आहे.

या संदेशकाव्यात एका शापित यक्षाची कथा आहे. यक्ष हे भारतीय पुराणकथांमध्ये धनाचे रक्षक मानले जातात.. "कुबेर" ह यक्षांचा राजा. हिमालयाच्या पायथ्याशी असलेली अलका नगरी ही त्याची राजधानी. देवलोकीचे खजिनदार असा यक्षांचा लौकिक असल्याने मौल्यवान रत्ने, सुवर्णालंकार, इ. श्रीमंती येथे ठिकठिकाणी आढळते. मेघदूताचा नायक यक्ष हा एक शापित यक्ष आहे. कुबेराच्या सेवेत त्याच्या हातून काही प्रमाद घडल्याने त्याला शाप मिळाला आणि त्या शापामुळे तो त्याच्या पत्नीपासून दूर रामगिरीवर राहू लागला. शापाचे ८ महिने संपल्यानंतर अषाढाच्या पहिल्या दिवशी एक महाकाय मेघ रामगिरीवर विश्रांती घेत असलेला पाहून यक्षाने त्या मेघाकरवी स्वतःची खुशाली आपल्या प्रिय पत्नीला कळवण्याचे ठरवले हा मेघसंदेश म्हणजेच कालिदासाचे अजरामर मेघदूत.

या कथेला कालिदासाने प्रतिभासंपन्न वळण दिलेय, त्याल एक काव्यात्म परिमाण दिलेय. आषाढस्य प्रथमदिवसे.... हा पूर्ण श्लोक असा आहे====

तस्मिन्नद्रौ कतिचिदबला विप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासांकनकवलय भ्रंशरिक्तः प्रकोष्टः।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्ट सानुं
वप्रक्रीडा परिणत गजं प्रेक्षणीयं ददर्श॥

मराठीत अनुवाद-----

प्रेमी कांताविरही अचली घालवी मास काही
गेले खाली सरुनी वलय स्वर्ण, हस्ती न राही।
आषाढाच्या प्रथम दिनी तो मेघ शैलाग्री पाहे
दंताघाते तरी गज कुणी भव्यसा खेळताहे॥

मंदाक्रांता वृत्तात रचलेल्या या काव्यावर ४० हून अधिक संस्कृत टीका आणि अनेक मराठी अनुवाद आहेत. यात या काव्याच्या यशाचे लोकप्रियतेचे गमक आहे.

पूर्वमेघात यक्षाचा संदेश घेऊन अलका नगरीत कसे जायचे याचा तपशील आहे. रामगिरी पसून माल--आम्रकूट--दशार्ण- नीचैर्गिरी-- उज्जयिनी--दशपूर--कुरुक्षेत्र --कनखल---कैलास--- आणि अलका हे मेघाच्या प्रवासातील लहानमोठे टप्पे आहेत. निर्विंध्या, नर्मदा इ. नद्यांची वर्णने आहेत. कलिदासाच्या प्रतिभास्पर्शाने हे बारकावेही चित्ररूप होतात, जसे वाऱ्यांच्या लहरींबरोबर मेघ ऐटीत एखाद्या राजाप्रमाणे दिमाखात चालला आहे, चतक पक्षी त्याच्या बाजूने गात उडत अहेत, बगळ्यांची शुभ्र माळ त्याच्या सेवेस तत्पर आहे, राजहंसांचा थवा मानससरोवरापर्यंत त्याच्या सोबत आहे, असा हा श्याम घन इंद्रधनुष्याची छटा लेऊन, केसात मोरपीस खोवलेल्या घनश्यामाप्रमाणे दिसतोय इ. वर्णन शब्दमय न राहता चित्रमय बनत्ते.

उत्तरमेघातही यक्ष स्वतःच्या घराचे वर्णन करतो. ती पूर्ण वास्तू, तिच्या समोरील भव्य इंद्रधनुष्याचे तोरण, हातांनी तोडता येण्यासारख्या फुलांनी बहरलेला बालमंदारवृक्ष, पाचूच्या पायऱ्यांचा सुवर्णकमळांनी शिगोशीग भरलेला जलाशय, इंद्रनील मण्यांनी मढलेली क्रीडेसाठी बनलेली टेकडी, भोवती असलेले सोनेरी कर्दळीचे कुंपण, यक्षपत्नीच्या इशाऱ्यानिशी नाचणारा तिचा निळा सवंगडी मोर, हे सर्व एखाद्या चलच्चित्राप्रमाणे मेघदूत वाचत असताना दिसते, त्याचे सहसंवेदन होते.

कालिदासाने एक शाश्वत सत्यही एके ठिकाणी सांगितले आहे---- " नीचैर्गच्छती च दशा चक्रनेमिक्रमेण--" रहाटगाडग्याप्रमाणे सुखदुःखांचे आहे. कोणतीच एक अवस्था सतत नसते. हा आशावाद येथे दिसतो.

तसेच एके ठिकाणी " मा भूदेवं क्षणमपी च ते विद्युता विप्रयोगः..... असे म्हणून श्याम मेघ आणि आकाशात क्षणमात्र चमकणारी वीज हे जणू दांपत्य आहे अशी कल्पना करून यक्ष मेघासाठी शुभकामना व्यक्त करतो की जसा त्याचा व त्याच्या पत्नीचा वियोग झाला तसा मेघ व वीज यांचा कधीही न होओ.

तर असे हे मेघदूत.. याच्याविषयी वसंत बापट लिहितात

" झाली काव्ये कितीक असती, अन पुढेही असोत
या ऐसे हे, सहृदय मना मोहवी मेघदूत॥ "