वेच्यावरून पुस्तक शोधायचेय - ठाण तशी वृत्ती

पुर्वी पुस्तक विकत घेण्याची चैन परवडण्यासारखी नसल्याने आवडलेले वेचे परतपरत वाचायला मी ते माझ्या एका डायरीत लिहून ठेवायला सुरूवात केली होती. उपक्रम चांगला असला तरी लहान वयात सुरू केलेला असल्याने आवश्यक तितका विचार नाही करून ठेवू शकले आणि त्यामुळेच की काय आज माझ्याकडे उत्तमोत्तम वेचे तर आहेत पण ते कुठल्या पुस्तकातले, कोणी लिहिलेले आहेत ही महत्त्वाची माहिती गायब असल्याने आज मी इच्छा आणि पैसे दोन्ही असूनही ती विकत घेऊ शकत नाहीये. शक्य असल्यास मला मदत करू शकाल का वेचे कुठल्या पुस्तकातले आहेत हे शोधून काढायला? इथे एक वेचा देतेय माझ्या डायरीतला...

वेचा -

खाण तशी माती त्याचप्रमाणे ठाण तशी वृत्ती बनते!
उघड्या दरवाज्याच्या मातीच्या घरात राहणाऱ्या माणसांना आपण मातीच्या घरात राहतो आहे हे पदोपदी जाणवत असतं. आपली घरं कच्ची आहेत, मोठा पाऊस आला की ती वाहून जातील आणि मग आपल्याला निवाऱ्याची, मदतीची गरज लागेल याची त्यांना क्षणोक्षणी जाणीव असते! त्यामुळे उतायची - मातायची त्यांच्या मनाची हिंमतच होत नाही. एकमेकांला आधार दिला तरच तग धरू हे दगडामातीच्या घरात राहणारे ओळखून असतात. 'एकमेकां साह्य करू' या सुपंथाचे ते सहजीव वारकरी होतात!

काँक्रीटच्या प्लॅटमध्ये बंद दरवाजाआड राहणाऱ्यांना भ्रम निर्माण होतो. आपण सुरक्षित आहोत, आपण आपल्या परिवाराभोवती आयुर्विम्याचे कवच उभारलं आहे. हे कवच कोणी भेदू शकणार नाही, असा भलता विश्वास त्यांच्या मनात ठिय्या मांडून बसतो. दुःखाच्या प्रसंगी अश्रू पुसण्यासाठी व आनंदाच्या क्षणी मिठी घालण्यासाठी खरेखुरे हात लागतात. आयुर्विम्याच्या जाहिरातीतील जोडलेले हात उपयोगाला येत नाहीत याची त्यांना जाणीव नसते! घंटा वाजली तरच पीपहोलमधून किंवा व्हूफाईंडरमधून कोण आहे ते पाहून दरवाजा उघडायची शिस्त त्यांनी लावून घेतलेली असते. त्यामुळं आपण फक्त सुखाला आत घेऊ व दुःखाला उंबरठ्याच्या हद्दीवर रोखू या खुळ्या कल्पनेत फ्लॅटवाले मश्गुल असतात. 'एकला चालो रे' हा त्यांचा सुखाचा मूलमंत्र असतो.

म्हणे भूकंपात मातीची घरे पडतात आणि सलोह काँक्रीटचे फ्लॅट जगतात! पण मातीची कनवाळू घरं नाहीशी होत चालली आहेत आणि त्या जागी बिनहृदयाचे कॉंक्रीटचे फ्लॅट पाय रोवून खडे होत आहे ही वस्तुस्थिती भूकंपाहून धक्कादायक नाही काय?