सुरमई रस्सा

  • सुरमई अर्धा किलो
  • कांदे तीन (मध्यम)
  • आमसुले ८ ते १०
  • गरम मसाला (तयार) २ चहाचे चमचे
  • कोकोनट मिल्क पावडर १०० ग्रॅम
  • हळद, तिखट, मीठ
  • तेल
  • कोथिंबीर (ऐच्छिक)
३० मिनिटे
दोन जणांना पोटभर

सुरमई आणतानाच तिचे एक पेर जाडीचे काप करून आणावेत. (त्यात डोके वा शेपटाकडचा तुकडा नसावा) ते स्वच्छ धुऊन त्यांना हळद, लाल तिखट आणि थोडे मीठ लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे.

कांद्यांचा मिक्सरमधून लगदा करून घ्यावा.

आमसुले एक कप पाण्यात दहा ते पंधरा मिनिटे टाकून ठेवावीत.

कोकोनट मिल्क पावडरमध्ये साधारण दीड कप पाणी घालून गायीच्या दुधाइतके दाट/पातळ दूध करून घ्यावे.

दीड पळी तेल तापवावे. ते धुरावल्यावर त्यात कांद्याचा लगदा घालून मोठ्या आचेवर गुलाबी होईस्तोवर परतावा. त्यात आमसुलांचे पाणी घालून सारखे करावे. दोन मिनिटांनी सुरमईचे तुकडे घालावेत आणि हलक्या हाताने परतावे. गरम मसाला घालावा आणि परत एकदा हलवावे. ज्योत बारीक करावी. अंदाजाने मीठ घालावे.

पाच मिनिटांनी नारळाचे दूध घालून हलक्या हाताने ढवळावे. परत पाच मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ द्यावी.

आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरावी.

(१) मासे दहा मिनिटांपेक्षा जास्त शिजवायची गरज सहसा पडत नाही. दहा मिनिटांनी (नारळाचे दूध घातल्यावर पाच मिनिटांनी) एक तुकडा काढून कितपत शिजला आहे याचा अंदाज घ्यावा. जास्त शिजल्यास रश्श्याचे पिठले होईल.

(२) यासोबत साधा पांढरा भात (आंबेमोहोर वा कोलम) असल्यास उत्तम.

(३) हा रस्सा सुरमईच्या अंगभूंत चवीसाठी आणि नारळाच्या दुधाच्या कोवळ्या चवीसाठी करायचा आहे. त्यामुळे तो 'झणझणीत' वा 'मसालेदार' नाही याची कृपया नोंद घ्यावी.

ऐकीव आणि स्वप्रयोग