हनुमानाची पत्नी

मागच्या आठवड्यात माझ्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याने (हा दाक्षिणात्य, कन्नडिगा आहे) मला आधी विचारले की गणपतीच्या दोन बायका आहेत का? आणि असतील तर त्यांची नावे काय? तेव्हा मी त्याला सांगितलं की "हो, गणपतीच्या दोन बायका आहेत असे मानतात. 'ऋद्धी' आणि 'सिद्धी 'ही त्यांची नावे आहेत. "

इथवर सगळं ठीक आहे. पण पुढचा प्रश्न त्याने विचारलं की हनुमानाच्या बायकोचे नाव काय??!! या प्रश्नाने मला आश्चर्याचा धक्का बसला की एखादा हिंदू माणूस असा प्रश्न कसा विचारू शकतो. मी त्याला अगदी ठामपणे सांगितलं हनुमान हा बालब्रह्मचारी आहे. त्याचा विवाह झालेला नाही. बऱ्याचशा हनुमानाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश करण्यास मनाई असते हे देखील आणखी पाठिंबा म्हणून सांगितलं. हा प्रश्न जरा खटकलाच होता मला...
(मकरध्वज हा जरी त्याचा मुलगा असला तरी हनुमानाचा मकरध्वजाच्या आईसोबत विवाह झालेला नव्हता किंवा आणखी काहीही संबंध नव्हता; ती कथा वेगळी आहे. )

आज मात्र त्या सहकाऱ्याने मला हनुमानाचे लग्न झाले होते हे त्याच्या पत्नीच्या नावासकट सांगितले!! 'सुवरचला' असे तिचे नाव आहे. संदर्भासाठी त्याने ३-४ दुवे सुद्धा दिलेत. त्या दुव्यांवरून असे वाटते की दक्षिण भारतात हनुमान-सुवरचला यांना पती-पत्नी मानतात. (हनुमानाचे 'पंचमुखी' रूप सुद्धा त्यात आहे. )

हा म्हणजे माझ्या लहानपणापासूनच्या धार्मिक विश्वासाला बसलेला मोठा धक्का आहे. मी आजवर हेच मानत होते की हनुमान 'बालब्रह्मचारी' आहे.

आता माझा प्रश्न असा आहे की माझा विश्वास चुकीचा होता की दाक्षिणात्य धार्मिक कथा, विश्वास वेगळे आहेत?
जाणकारांनी आपले मत मांडावे.

ते संदर्भ दुवे येथे देत आहे:
दुवा क्र. १
दुवा क्र. २
दुवा क्र. ३
दुवा क्र. ४