भगारे बैंगन

  • काळीभोर, गोल, छोटी वांगी १/२ किलो
  • खवलेला नारळ १ वाटी
  • तीळ १ टी स्पून
  • जिरे १ टी स्पून
  • गुळ लिंबा एवढा
  • भाजलेल्या दाण्याचा कुट १ टेबल स्पून
  • कोथिंबीर १ टेबल स्पून
  • मीठ चवीपुरते
  • लाल तिखट १ टी स्पून
  • धण्याची पावडर १ टी स्पून
  • हळद १/२ टी स्पून
  • आलं-लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  • डाळं १ टी स्पून
  • गरम मसाला पावडर १/४ टी स्पून
  • तेल अर्धी वाटी
  • कांदा १ मध्यम
  • चिंच लिंबा एवढी
४५ मिनिटे
३-४ वांगीप्रेमींसाठी.

एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात एक टेबल स्पून मीठ घालून विरघळवावे. वांग्यांना देठापर्यंत दोन उभे असे छेद द्यावेत जेणे करून वांगे चार फोडीत विभागले जाईल पण या चारही फोडी देठापाशी जोडलेल्या राहतील. (थोडक्यात, आपण भरली वांगी करण्यासाठी वांगी चिरतो तशी चिरावीत.)

कांदा बारीक, चौकोनी चिरून घ्यावा.

चिंच, अर्धा तास गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ बनवून घ्यावा.
खवलेला नारळ भाजून कोरडा करून घ्यावा.
तिळ आणि जिरं एकत्र करून खमंग भाजून घ्यावे.
लाल तिखट, धण्याची पावडर, हळद आणि गरम मसाला पावडर एकत्र करून हलक्या आंचेवर भाजून घ्यावे.
नारळ, तिळ, जिरं, गुळ, दाण्याचा कुट, कोथिंबिर,मीठ, तिखट, धण्याची पावडर, हळद, आलं-लसून पेस्ट, डाळं, गरम मसाला पावडर आणि चिंचेचा कोळ एकत्र करून मिक्सर मधून अगदी थोडे पाणी घालून गंधा सारखे मुलायम वाटून घ्यावे.

मसाला तयार झाला की वांगी पाण्यातून काढून निथळून घ्यावीत.

आता वाटलेला मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यावा. मसाला उरला तर वांगी शिजताना तो वरती पसरून टाकावा.

लोखंडाच्या कढईत तेल घेवून त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. कांदा लाल झाला की मसाला भरलेली वांगी त्यात टाकून जरा परतावे. भांडभर पाणी त्यावर ओतून वांगी नीट मिसळून घ्यावीत. मध्यम आंचेवर वांगी गरम झाली गॅस एकदम कमी करून वर घट्ट झाकण ठेवून वांगी शिजवावीत. वांगी व्यवस्थित शिजून मऊ झाली आणि रस आटला की खाली उतरवावे.

भगारे बैंगन सर्व्हिंग बाऊल मध्ये काढून त्यावर ओला नारळ आणि कोथिंबीर भुरभुरावी.

शुभेच्छा....!

अत्यंत महत्वाची गोष्टः

मसाल्यातील दाण्याचा कुट, तिळ आणि डाळं या वस्तूंमुळे मसाला/वांगी कढईच्या तळाला चिकटतात आणि जळण्याची १००% खात्री असते. त्यामुळे गॅस अगदी मंद असावा. दर ५ - १० मिनिटांनी हलक्या हाताने वांगी वरखाली हलवून ती चिकटत नाहीत याची खात्री करून घ्यावी.

पोळी, परोठा या बरोबर भगारे बैंगन धम्माल लागते. तसेच ते पांढऱ्या भातावर कालवूनही लई झ्याक लागते.

हेच भगारे बैंगन मातीच्या वाडग्यात आणि ज्वारीच्या गरमगरम भाकरी बरोबर वाढले तर जेवायला आलेले पाहूणे कौतुकाची टीप देवून जातील.   

कुकरी बुक आणि अनुभव...