एक पुस्तक वाचताना...

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला ‘व्यासपर्व’चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बऱ्याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच. आता, पुन्हा एकदा घ्यावं लागेल याची जाणीव झाली. पुस्तक आवर्जून वाचावं ही मित्राची शिफारस ऐकून घेतली आणि विषय पुढे सरकला.
आणखी काही दिवस गेले. पुन्हा एकदा विषय ‘व्यासपर्व’पाशीच आला. एव्हाना हे पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे हे माझ्या दृष्टीनं अद्याप प्राधान्यांच्या यादीत आलं नव्हतं. त्यामुळं नन्नाचा पाढा कायम होता. अशावेळी जे कुणाहीकडून घडतं, तसंच झालं. हे पुस्तक अजूनही वाचलं नाही? या आशयाच्या प्रश्नात या मित्राचा सूर असा लागला, की त्यातून माझं माप निघालं. पण मित्रच तो. सावरून घेणारच. लगेच म्हणाला, "मी पाठवू का?" हा काही प्रश्न नव्हता. त्यातून "पाठवतो" हाच सूर होता. मी आधी थोडी का कू केली. पण लगेच लक्षात आलं, त्याला मनापासून हे पुस्तक आपण वाचावं असं वाटतंय असं दिसतं. ‘हो’ म्हटलं. आठवड्यानं पुस्तक दारात आलं.
पुस्तक दारी आलं तेव्हा मी घरी नव्हतो. त्यामुळं दुसऱ्या दिवशी सकाळीच ते आल्याचं मला कळलं. इतकी शिफारस झालेले पुस्तक... असा काही भाग नव्हताच. कारण तसंही या पुस्तकाचं माहात्म्य याआधी ऐकलं होतं. घेऊ हातात केव्हातरी, असं आधी प्रत्येक वेळी ठरवत गेलो होतो. पण यावेळी मात्र तसं झालं नाही. कारण शिफारशीपेक्षा मैत्रीच्या पाऊलवाटेवर अगदी सुरवातीलाच असं एखादं पुस्तक येतं तेव्हा त्याचं एक भावनिकसुद्धा महत्त्व असतंच. तेच काम करत होतं बहुदा. दुपारचं जेवण झालं होतं. दोनेक तासांचा वेळ होता. पुस्तक उघडलं.
‘व्यासपर्व’. उणीपुरी दीडशे (कमीच, जास्त नाहीत) पानं. प्रस्तावना. असेल चारेक पानांची असं म्हणत वाचायला सुरवात केली आणि मग पुढच्या पानांचा प्रवास कसा झाला हे नंतर कळलं नाही. ते आत्ता आठवतंय, समोर पुन्हा पुस्तक ठेवल्यानंतरच!
पुस्तकाचा विषय – महाभारत; अधिक नेमकेपणानं सांगायचं तर महाभारतातील व्यक्तिरेखा. त्याहूनही तो खरं तर वेगळाच आहे. हे पुस्तक म्हणजे महाभारत या कृतीचा एक वेगळा आस्वाद आहे. त्या आस्वादाचा प्रवासही या पुस्तकात जसा झाला आहे ते पाहिले की मग दुर्गाबाईंच्या उंचीची एक वेगळी जाणीव होतेच होते. महाभारत म्हटल्यावर मनात जे-जे विचार याही आधी अनेकदा उमटले, पुस्तक वाचतानाही उमटले ते सारेच या पुस्तकात गवसत गेले, त्याहूनही पलीकडे बरंच काही मिळत गेलं आणि आजवर असं आपण गमावलेलं होतं हे उमजून एक भारावलेपण येऊन गेलं. आधी म्हटलं त्या वेगळेपणात या भारावलेपणाचे मूळ असावं.
‘व्यासपर्व’मध्ये वेगळेपण काय असावं? महाभारत म्हटलं की आधी डोळ्यांसमोर येणारं क्षेत्र म्हणजे समाजशास्त्र. मानवी व्यवहार हेही आहेच. दुर्गाबाईंनीच म्हटल्याप्रमाणे प्राचीन इतिहासाच्या सर्वच शाखांचा वेध महाभारतातून अभ्यासकांनी घेतला आहे. किंबहुना अशा प्रत्येक अभ्यासाचा महाभारत हा आधार राहिलाच आहे. त्यापलीकडे महाभारत नाही का? आहे. कुणाला गीतेच्या अनुषंगाने तो धर्मग्रंथ वाटेल, कुणाला त्यातलं नाट्य भावेल, कुणाला त्यातील राजकारण, कुणाला आणखी काही. कुणाला त्यात नीतीचे शास्त्र दिसेल. दुर्गाबाईंच्या या पुस्तकात महाभारत किंचित वेगळे गवसते. गवसते म्हणजे सार्वत्रिक गवसेलच असे नाही. पण गवसायला हरकत नाही.
पुस्तकाच्या वीस पानी प्रस्तावनेच्या पहिल्याच परिच्छेदात भारतीय विचार-विमर्षाच्या विश्वात महाभारताचा स्वीकार किंवा अ-स्वीकार का झाला असावा हे दुर्गाबाई सांगत जातात आणि एक विधान करतात: "काव्यसमीक्षेचे प्रतिकूल अंग डावलून, अन्य यशोदायी धोरणांनी महाभारताचा अर्थ धोरणी तत्त्वज्ञांनी, पंडितांनी व राजकारणपटूंनी स्वतःच्या आवडीच्या जीवनक्षेत्राच्या समर्थनासाठी विविध प्रकारे लावला. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रे उजळली. विचारांचे क्षितिज रुंदावले. संस्कृतीच्या कक्षा वाढल्या. परंतु त्यातले काव्यमय भाव मात्र झाकोळून गेले."
‘व्यासपर्व’मध्ये दुर्गाबाईंनी टिपलंय ते महाभारताचं हे काव्यमय आणि तत्सम भावांचं, रंगांचं वैशिष्ट्य. एकेका व्यक्तिरेखेला केंद्रवर्ती ठेवत. कृष्णापासून (अर्थातच, दुसरा कोण असावा) सुरू होणारा हा प्रवास द्रौपदी या (या पुस्तकातील) एकमेव स्त्री व्यक्तिरेखेपाशी येऊन थांबतो. या दरम्यानच्या काळात इतर व्यक्तिरेखा येत जातात. एकेका व्यक्तिरेखेसाठी योजलेले शीर्षकच मुळी वाचकाशी बोलू लागते – पूर्णपुरुष कृष्ण, मोहरीतली ठिणगी (आहे द्रोणाविषयी, पण संदर्भ एकलव्याविषयीचे तितकेच गडद आणि म्हणून हे प्रकरण दोघांविषयीचेही ठरावे), कोंडलेले क्षितिज (अश्वत्थामा), व्यक्तिरेखा हरवलेला माणूस (दुर्योधन), एकाकी (कर्ण), परिकथेतून वास्तवाकडे (अर्जुन), मुक्त पथिक (युधिष्ठिर), अश्रू हरवल्यावर (भीष्म), माणसात विरलेला माणूस (विदुर) आणि कामिनी (द्रौपदी).
कृष्ण ते कृष्णा असा या प्रवास संपतो तेव्हा वाचक किमान दोन अंगांनी समृद्ध झालेला असतो – दुर्गाबाईंनी हे लिहिताना उपयोजलेल्या भाषेचं, कदाचित त्यांनाच झेपू शकेल असं, सौंदर्य आणि महाभारतातील वेगळेपण दाखवणारे भाव-रंग. "भव्य दगडी कोरीव मूर्तीच्या तोंडावर जी कोवळ्या मानवी भावाची छटा दिसते, तीच कोवळी छटा महाभारताच्या नाट्यपूर्ण, अतिविशाल कथेच्या अंगप्रत्यंगात भरून राहिली आहे, याचा साक्षात्कार झाला तरच महाभारताच्या कलाकृतीचे भान येण्याचा संभव" असं म्हणतच दुर्गाबाई या प्रवासावर वाचकाला बोट धरून नेतात. आणि मग एकेका शीर्षकातून एक झलक देत एकेक व्यक्तिरेखा उलगडून दाखवताना त्या वाचकाला हे भान देऊन जातात, त्यालाही न कळतच बहुदा.
वाचत गेलो, चोवीस तासांतील तीन छोट्या बैठकांत पुस्तक संपलं. महाभारताचा विचार आजवर मी करायचो तो केवळ समाजशास्त्राच्या अनुषंगानं. पूर्वी कधी तरी, विचारांची मूस आत्ताइतकी बांधीव होण्याच्या आधीच्या काळात कृष्णाचं देवत्व स्वीकारलेलं होतं. नंतरच्या काळात ते मागं पडलं होतं. मग मध्ये कधी तरी कृष्ण म्हणजे अब्राह्मणी सत्तेचा पहिला राजा किंवा तत्सम काही तरी विचारांची आवर्तंही झाली होती. पांडवांचा पक्ष न्यायाचा हे आधीचं आकलन नंतर बदलत गेलं. आपण समजतो तितकं हे सारं सरळ – स्वच्छ नाही हे कळत गेलं. कर्णाविषयी (लिहितानाही अभावितपणे कर्ण हा पांडवांमध्ये असतच नाही. पांडव हे त्या अर्थाने पंडूचे नसूनही – हे आकलनही असंच कधी तरी उमगत गेलं) किंवा अगदी दुर्योधनाविषयीचं आकलनही असंच बदलत गेलं. भीष्म ही व्यक्तिरेखा तशी त्या प्रतिज्ञेमुळं वगैरे फक्त आदरणीच राहिली होती. द्रोण किंवा इतरांचा खास असा प्रभाव नसायचाच. असेलच तर, द्रोणाचं विद्यापारंगतत्व मान्य करूनही, त्यानं एकलव्याला दिलेल्या वागणुकीचा, एकूणच शिष्यांबाबतच्या भेदभावाविषयीचा थोडा रागच. द्रौपदी तर केवळ सौंदर्याची ‘पुतळी’च. आकलन त्यापलीकडं गेलं असेल तर जिच्यावर अन्याय झाला अशी एक स्त्री इतकंच. पुढं त्याला पुरुषी व्यवस्था वगैरे रंग जोडले गेले. म्हणजेच, हे सारं किती नाही म्हटलं तरी सामाजिक अंगानंच जाणारं. त्यापलीकडं नाही. तीन छोट्या बैठकांत ‘व्यासपर्व’ वाचून संपलं तेव्हा या व्यक्तिरेखा म्हणजे एकेका सामाजिक परिस्थितीनं वेढलेली एक व्यक्ती हे आतापर्यंत केवळ सामाजिक संदर्भात असलेलं आकलन आणखी विस्तारत त्यांच्यातही खचाखच भरलेला एक माणूस होता असाही विचार करण्याइतपत पुढं सरकलेलं होतं.
‘महाभारताला डावलून सामाजिक आशयाचे सम्यक स्वरूप ओळखणे अगर विशद करून सांगणे जमण्यासारखे नाही’ या दुर्गाबाईंच्याच विधानाला (हे विधान अर्थातच, त्या काळाच्या संदर्भातीलच असावे) धरून आधीचं आकलन असतं. म्हणजे महाभारत काय आहे हे थोडेसे समजून घ्यायचे इतकाच हा प्रांत असतो. त्या एकूण भूमिकेत आता बदल होतो. ‘हीही एक बाजू आहे महाभारताची’ हे आपणच आपल्याला सांगू लागतो. त्याची कारणं शोधण्याच्या प्रवासाला विचारचक्र आपोआप लागतं. मग दुवे सापडत जातात ते दुर्गाबाईंना दिसलेल्या या वेगळ्या रंगांचे, भावाचे. "राधाकृष्णाच्या प्रीतीचा वसंत एकदाच आला आणि गेला, पण काही तरी सदा फुलते, घमघमते मागे ठेवून गेला... प्रीतीचा लालभडक रंग राधेमुळे सौम्य निळा, रुपेरी झाला. या निळ्या प्रीतीला सामावून घेताना कृष्णाचे व्यक्तिमत्त्व आकाशाएवढे विस्तारले, उंच झाले...", "... गाणीच गाणी या कलावंत व्यासाने गायिली. पण एक गाणे असे आले की स्फुरता स्फुरेना. सोडू म्हटल्या सुटेना. त्या गाण्याच्या अमूर्त सुरांनी, भावांनी तो झपाटला गेला. आणि त्या अवस्थेत एकलव्याची व्यथा द्रोणाच्या चिरव्यथेत एकरूप झाल्याचे त्याने पाहिले", "महाभारतातला वृद्ध म्हटल्यावर एकच आवृत्ती प्रथम डोळ्यांसमोर येते, आणि आदर्श वृद्धाची कल्पना तिच्या पूर्णत्वाने साकारली नाही तरी तिच्या आसपास छायेसारखी वावरणारी आकृती कुणाची असेल तर ती पितामह भीष्माचीच", "तीव्र चोखंदळ बुद्धी आणि प्राकृतिक वासना यांचा मेळ रूपगर्वितेच्या बाबतीत घालायचा झाला, तर त्याला द्रौपदीइतके समर्पक प्रतीक दुसरे नाही"... वाक्येच अशी काढावयाची ठरवली तर अशक्य होईल.
सामाजिक संदर्भांच्या पलीकडं नेणारं, या व्यक्तींच्या व्यक्तित्वाची रचना समोर मांडणारं आणि तरीही त्या व्यक्तींचं असामान्यत्व हे मुळातच त्यांच्या सामान्यत्वातच कसं दडलं आहे हे दाखवणारं हे आकलन. दुर्गाबाईंना दिसलेल्या महाभारत नामक दगडी मूर्तीच्या चेहऱ्यावरील या कोवळ्या छटा अशा पानोपानी विखुरलेल्या दिसतील. साऱ्या छटा पटतीलच असं नाही. सहजी नाकारताही येतील अशादेखील नक्की नाहीत. काही रंग असे आहेत की ज्यांच्याविषयी लिहिताना दुर्गाबाईच ‘अनामिक रंग’ असं लिहितात. वाचक तो रंग शोधत त्याच्याच एका प्रवासावर निघावा असं सूचक लेखन. पानोपानी भाषेचं हे सौंदर्य विखुरलेलं असतं... महाभारताच्या आपल्या आकलनाला एक आव्हान देत... त्यात बदल घडवत आणि तरीही मनोमनी त्या सौंदर्याचा एक आनंद देतच. भाषेच्या या सौंदर्याचे भान मात्र सुटत नाही. असं सौंदर्य लीलया आणतच महाभारताचा एक वेगळा आस्वाद (तोही आपल्यालाच झालेला, उगाच त्याविषयी सार्वत्रिकीकरणाचा पवित्रा न घेत) मांडायचा आहे या लेखनाच्या मूळ (स्वतःच ठेवलेल्या) हेतूचं हे भान. या पुस्तकाचं समग्र सौंदर्य ते हेच असावं.
हे पुस्तक आपण आधी का वाचलं नाही? आपल्याकडं असलेलं हे पुस्तक बेपत्ता कसं झालं? कुणाला दिलं असेल आपण ते पुस्तक? समाजशास्त्राच्या दृष्टीनं महाभारताच्या आकलनात या पुस्तकानं फार मोठी भर वगैरे घातलेली नाही, असं एकदा क्षणभर वाटून गेलं सगळं वाचन झाल्यानंतर. पण एका क्षणातच "महाभारताच्या एका अंगाचे दर्शन हे त्याच्यातल्या सामर्थ्यपूर्ण व सौंदर्यशाली गाभ्याचे संपूर्ण दर्शन नव्हे" हे दुर्गाबाईंचंच वाक्य समोर येतं. त्या वाक्याचाच आणखी एक अर्थ खुणावू लागतो – या प्रत्येक अंगाच्या दर्शनातूनच या कृतीचं सामग्र्यानं दर्शन होणं शक्य होतं, एरवी नाही. म्हणजे समाजशास्त्रीय अंगानंही "…द्रौपदीच्या मनाचे तडफडणे हे भारतातल्या विलक्षण सुंदर अशांततेचा मूलस्रोत आहे" या वाक्यातून महाभारत कळणं वेगळंच. किंवा द्रोणाच्या संदर्भातील "विद्यावंतांची बधिरता हा संस्कृतीला लागलेला मोठा शाप आहे... जागा मोठ्या, माणसे लहान – असे उलटे गणित सुरू होते. हे उलट्या गणिताचे चक्र द्रोणाने युगापूर्वी फिरवले. अजून ते तसेच फिरते आहे" यासारखे वाक्य तर अगदी आजही लागू होतेच की... महाभारत लिहून झालंय, आता काहीही लिहिण्याची गरज नाही हे याहीसंदर्भात असं खरं असावं? असेलही. ‘व्यासपर्व’विषयीही लिहून झालंच असेल...
असा हा प्रवास संपत आला तेव्हा एक गोष्ट नव्यानं कळली. प्रस्तावना पुन्हा वाचावीच लागेल. नव्हे, ती आधी वाचण्याऐवजी आधी पुस्तक वाचून मग प्रस्तावना वाचायला हवी होती. पहिला मार्ग हाती असतोच. मी पुन्हा त्या प्रवासावर निघालोय... त्या मित्राप्रती कृतज्ञ होत!
(व्यासपर्व, मौज प्रकाशन, लेखिका - दुर्गा भागवत)