सुटलेल्या पोटांची राजगड स्वारी!

रात्रीचे ९ वाजलेत, तंगड्या गळ्यात आल्यात.. पण आज जी मजा केलीय ती सांगाविशी वाटतेय म्हणून लिहितोय. आज मोने, गोगटे, रानडे आणि मी यांनी राजगड सर केला. रत्नागिरीजवळच्या कोतवड्याचे, १०० किलोच्या गटात लवकरच दाखल होतील असे, वृषभ राशीचे आयडियल उदाहरण असलेले मोने (मंदार), आमच्या ग्रुपमधले (अति)हुशार, आपली बाजू कधीही पडू न देणारे, पण नेहमी द्विधेत राहणारे असे गोगटे (समीर), कोणत्याही गोष्टीची "बरं आहे" यावर तारीफ न करणारे आणि प्रत्येक गोष्ट चुकीच्या वेळी आणि ठिकाणी बोलणारे असे रानडे (कपिल) आणि मी. आम्ही सगळे आयटी मध्ये (चिकटलेले) आणि त्यामुळे पोटं सुटलेली... डोक्यात विचार आला आपण काही करत नाही, अंगाला व्यायाम नाही व. व. मग काय एकमेकाला फोन झाले. हो नाही म्हणता म्हणता रविवारी सकाळी ७ वाजता कूच करायचे ठरवले.

स्वाइन फ्लू ने पुण्यात नाचायला सुरुवात केली होती. सगळीकडे फक्त स्वाइन फ्लू च्या चर्चा. अगदीच काही नाही तर या स्वाइन फ्लू ने काही चांगल्या गोष्टीही केल्या. पुण्याची एरवी ऊनाडणारी लोकं फक्त कामासाठीच बाहेर पडत होती, बाहेरच खाणं टाळत होती. या स्वाइन फ्लू ने बऱ्याच बायकाना घरी जेवण करायला शिकवले!! तर अशा डुक्कर तापी वातावणात पुण्याच्या बाहेर जायच आम्ही ठरवलं. चक्क ठीक ७:१५ ला. आम्ही स्वारगेटला पोचलो. फक्त १५ मि. ऊशीर! अपेक्षेप्रमाणे मोने अर्धा तास आधीच येऊन पोचले होते.

आमची तयारी: १ पाण्याची बाटली, वाटेत वाचायला पेपर, पायात चपला आणि फोटोसाठी मोबाईल. कधीच कुठली गोष्ट सिरियसली न घेण्याची ही काय पहिली वेळ नव्हती. सिरियसली केलं तर त्यात कसली मजा?

तर आम्ही स्वारगेटला होतो. पण पुढे काय? म्हंजे कोणालाच काही माहीत नव्हत असं काही नाही. गोगटे या बाबतीत नेहमी पुढे असतात. प्रत्येक बाबतीत त्याला काहीही माहीत नसलं तरी बरच काही माहीत असतं. त्याला कुंजवणी का गुंजवणी अशा गावाविषयी माहीत होते. या गावातून राजगड गाठता येतो. बास मग काय स्वारगेटला आमची बस शोधमोहीम सुरू झाली. चौकशी कक्षातला "तो" ठाणे गाड्या ३ च्याऐवजी ४ गेल्याने वैतागला होता. "राजगडला जाण्यासाठी बस" असं मी म्हटल्यावर "त्या"ने फक्त १ कटाक्ष टाकत "१० वाजता येईल" अशा एसटी खाक्यात सांगितलं. आणि १५ मिनिटातच (८ वाजता) आम्हाला "वेल्हा" या गावी जाणारी बस मिळाली. धन्य ती ST आणि धन्य ते ST वाले.

शेवटची सीट. ड्रायव्हर पिसाळला होता. वाट्टेल तशी गाडी चालवत होता. एसटी चा ड्रायव्हर बाईकर सारखा खड्डे चुकवत होता! डोकं वरती आपटता आपटता वाचल्याने "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" वगैरे अशी गोगटे स्पेशल डायलॉगबाजी झाली. गाडीतला राजगडलाच जाणारा सुंदर तरुणींचा घोळका हीच काय ती जमेची बाजू.

मार्गासनी नावाच्या फाट्यावर "तुमचा स्टॉप आला" म्हणत कंडक्टरने आम्हाला ऊतरवले. इथून पायथा ६ कि. मी.... दुसरं काही नसलं तरी एक पानपट्टी मात्र होती. गोगटेंच काम झालं. "अता मी कमी केलेय" म्हणत चैतन्य कांडीचा झुरका त्याने मारला. पायथ्यापर्यंत जायला वडाप मिळते असे पानपट्टीवाल्याकडून कळले. १५-२० मिनिटे झाली तरी वडाप काही येईना. शेवटी काय, चालायला लागलो आणि रा़जगडाची लांबूनच पाहणी करू अशी चिन्हं दिसू लागली. त्यात समीरच्या सिगरेटची कीक, दुसऱ्या धूडाचं अर्धा मैल चालणं आणि सकाळचे वडे यांमुळे दोघाना निसर्गाने जोरात पुकारले. रस्त्यावरचे साचलेले पाणी आणि पिण्यासाठी आणलेली पाण्याची रिकामी बाटली यावर दोघांची (विचित्र) नजर पडली. उरली एकच गोष्ट ती म्हंजे "आडोसा". ती मिळायच्या आधीच एक "वडाप" अवतरली आणि माझी पाण्याची बाटली वाचली. कुं(गुं)जवणीला पोहोचेपर्यंत २ ओढे लागले. मंदार (मोने) आणि समीर(गोगटे)ने ओढ्यांच्या पुलावरून जाताना माहेरवासीण जशी सासरी परत जाताना "परत कधी यायला मिळेल? " अशा भावनेने बघते, त्याप्रकारे त्या वाहत्या ओढ्याकडे पाहिले "पुढे अशी जागा कधी मिळेल? "

शेवटी आम्ही पायथ्यापर्यंत येऊन पोचलो. शेजारीच एक पर्ह्या असल्याने दोन्ही माहेरवासीणीनी आपल्या दु:खाचं विसर्जन केले. ईतक्या वेळ गप्प असलेले रानडे (कपिल) हळूहळू सुरू झाले होते. फोटोग्राफी आणि बाईक्स हे त्याचे आवडते विषय. बाकी दोघांना त्यात फारसा interest नसल्याने मीच होतो सगळं ऐकून घ्यायला. त्यात चुकून मी कपिलला विचारले.. "कुठली बाईक घेऊ रे? " झालं.... अर्धा तास बाईकपुराण ऐकलं.. तशी मी गेले २ वर्षापासून बाईक घेतोय... :P

राजगडाच्या पायथ्याला मस्त वडा आणि चहा झाला. एव्हाना साडे दहा-अकरा वाजले होते. अत्ता कुठे आम्ही चढाईस सुरुवात करणार होतो. चहावाल्याने चढायला दीड-दोन तास लागतील असे सांगितले.

तर हळू हळू आम्ही वर जाऊ लागलो. डोंगर ऊतारावर लावलेली भातशेती, कौलारू घरे, म्हशी, त्यांचे गोठे पाहून का कोणजाणे पण खूप छान वाटले.

शेजारून विविध ट्रेकिंग गिअर्स घालून प्रोफेशनल भटके चालले होते. (अशा लोकांच्या ब्लॉगचे नाव "भटकंती अनलिमिटेड", "रानवाटा", "सह्याद्रिच्या कुशीत" वगैरे असेच का असते कोण जाणे ) कोणी सुंदर मुलींना घेऊन समोरून जात होते. सिंगल ऍण्ड लुकिंग त्यापेक्षा हंटिंग असलेले आम्ही फक्त डोळ्यांचाच वापर करू शकत होतो. तशी तर आम्हाला सवय झाली होती. सुंदर मुली चुकुनसुद्धा जवळपास न फिरकण्याची. या बाबतीत मोनेचे नशीब हल्ली पलटले होते. त्याच्या टीममध्ये मुली जास्त असल्याने इतरांना जळवण्याचा आसूरी आनंद तो मिळवत होता. आम्ही मात्र ही आशा कधीच सोडून दिली होती.

हा हा म्हणता.... आम्ही अजून तिथेच होतो. फारतर १०-१५ मिनटं चढलो असू. सगळ्यांचे भाते एव्हाना फुलले होते. आयटी / ऑफिस / मॅनेजर यावर आमच्या वाइट स्टॅमिना चं खापर यथेच्च शिव्यांसह फोडत आम्ही एका झाडाच्या सावलीत आपलं सुटलेलं पोट घेऊन बसलो. मोनेला आता भूक पण लागू लागली होती. तशी ती कायमच लागलेली असते. जनरली एकावेळी २ पेक्षा कमी गोष्टी (कणसे, वडे व) खाणे त्याला प(च)टत नाही.

रानडे अचानक पेटले, म्हणाले "हे बरोबर नाही.. म्हातारेसुधा चढून जातात.. आपल्याला जमलेच पाहिजे. " आणि परत चालायला सुरुवात केली. झक मारत आम्हा सगळ्याना ऊठावे लागले. १०-१५ मिनिटातच अजून एक स्टॉप झाला. यावेळेस कपिलच पहिला बसला आणि मॅनेजर च्या नावाने शिव्याची लाखोली वाहू लागला. आता यात त्या मॅनेजर ची काय चूक? पण नाही... "माझा मॅनेजर.... फुल्या फुल्या फुल्या..... "

बरं.. तर आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की मी "रात्रीचे ९ वाजलेत" असं अगदी "रात्रीचे १२" वाजल्याप्रमाणे का बोललो ते. मी अता खूपच दमलोय, झोपतो अता.

--------

दुपारचे बारा वाजलेत, शरीराचा कुठलाच भाग जागेवर नाहिये. "विश्रांतीच्या" मागणीवरून पायांचा संप सुरू झालाय. काही विचारू नका..

तर..... आम्ही राजगड चढत होतो. २ स्टॉप झाल्यावर पुढे जरा सपाटी आली. तेवढाच एक आधार! फक्त लोकांनी सांगितले म्हणून त्या वाटेने आम्ही पुढे जात होतो. राजगड काही दिसत नव्हत. त्यात धुकं होतं. जरा पुढे गेल्यावर एक खोपटं लागलं. ऊशीर झाला होता पण तिथे जाणे मँडेटरी होतं. मोने रूल नुसार प्रत्येकी २ लिंबू सरबते आणि २ बिस्कीटाची पाकिटे झाल्यावर आम्ही पुढची वाट धरली. तिथल्या माणसाला विचारलं तर त्याने आम्हाला चढायला दीड-दोन तास लागतील असे सांगितले. आम्ही फक्त एकमेकाकडे पाहिले.

चालायला सुरुवात केली. साधारणसा चढाव असल्याने जास्त अंतर कापत होतो. तेवढ्यात अशा एका ठिकाणी आलो की तिथे जवळपास फूटभर चिखल होता. साधारण १०० मी. ची वाट असेल. इतकावेळ पावसाने मेहेरबानी केली होती, पण नेमका याच वेळी जोराचा पाऊस आला. चिखल खूपच झाला होता. अजूनपर्यंत कोणी पडला नव्हता. पण पुढचा काही भरवसा नव्हता.

कसबसं त्या चिखलातून बाहेर पडल्यावर परत सपाटी आली आणि राजगडाने पहिले दर्शन दिले. खूपच छान ट्रीट होती डोळ्याला. हिरव्या रंगात, कापसासारख धुकं, वरती निळ्या आकाशात गडद ढग यांत राजगडाची काळी तटबंदी एकदम खुलून दिसत होती.

एवढ्यात आम्हाला एक माणूस भेटला. तो एकटाच होता. आमच्याकडून त्याने स्वतःचे राजगड बॅकग्राउंड वर फोटो काढून घेतले. त्याने आमच्याशी ओळख करून घेतली आणि इंग्लिश-मराठी मध्ये बोलायला सुरूवात केली. पहिला गुन्हा.. पुढे आम्हाला ट्रेकींगविषयी त्याने उपदेश द्यायला सुरूवात केली. गोगटे, मोने आणि रानडे यांना उपदेश!! दुसरा गुन्हा.. त्याने तिन्ही ग्रहांना नाराज केले होते. विंचवासारख्या तीन जिभा त्याला नांगी मारू लागल्या. तिघांनी त्याच्या उपदेशांची भरपूर खिल्ली उडवून त्याला "तुम्ही पुढे व्हा.. वरती भेटूच ! " म्हणत टांग दिली. त्यानेही लगेच काढता पाय घेतला. हे सगळं मी मात्र खूप एन्जॉय करत होतो.

राजगड दिसत असला तरी दूर होता. "राजगड दूर दिसतोय, पण आता आपण गडाच्या ऑलमोस्ट लेव्हल ला आलोय.. म्हंजे सरळ चालायला लागेल, जास्त चढाव नसावा.... " इति रानडे... ऊगीच आपलं मनाचं समाधान!! थोडं पुढे गेल्यावर आम्हाला २ इसम भेटले. ते नुसते ऊभे होते. आम्ही आमचा "अजून किती वेळ लागेल हो? " असा पेटंट प्रश्न विचारला. अगदी केविलवाण्या सुरात एकाने सांगितले.. "माहित नाही हो... आम्ही पण वरच जातोय".. दुसरा तर भलताच वैतागला होता.. तो सुरू झाला... "शिवाजीला काही ऊद्योग नव्हते काय... कुठेही किल्ले बांधले ते? व. व. " आम्ही त्याची परिस्थिती चांगलीच समजू शकत होतो. शेवटी त्या बिचाऱ्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. मला माहित होते.. मोनेच्या मनात पण हेच चाललं होतं. त्याच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं. पण आम्हाला तो सांगूही शकत नव्हता.

समोरचं धुंक जरा कमी झालं आणि आम्हाला एकच उंच, ऊभा असा कडा आणि त्यावरून चढणारी मुंगीसारखी माणसं दिसली. आम्ही तिथेच बसलो...

"ऊंचीवर असल्यावर खाली बघू नये" असं म्हणतात... मी म्हणतो "शिवाजीचे गड चढताना कधीही वरती बघू नये!! " बसल्यावर थोडं बरं वाटलं... त्यामुळे गप्प झालेल्या मोनेने त्याची कंपनी, शिवाजीच्या काळातले सगळे "खान" आणि आम्हाला (राजगडस्वारीच्या आयडिया बद्दल) शिव्या घालत लागलेला दम घालवला.

तर डिसिजन ची वेळ आली होती. पण निर्धार पक्का होता. "राजगड चढायचाच". सगळ्यांनी ऊठून परत चालायला सुरुवात केली. वाटेत परतणारे लोक अजूनही आम्हाला "दीड तास लागतील" असं सांगत होती..... म्हणूनच लोकांकडे दुर्लक्ष करायचं असतं!!

आम्ही अता जरा अवघड चढ चढत होतो. "पहिल्यांदा मला मुघल सैन्याची दया येतेय" मोने म्हणाला.

आम्ही वहानांनी, चांगल्या रस्त्याने पायथ्याशी पोचलो. त्या काळी जंगलातून वाट काढत, श्वापदांपासून वाचत, नद्या नाले ओलांडत पायथ्याशी पोचायचे. सगळी शस्त्रे सांभाळत गड चढायला सुरुवात करायची. बरं घनदाट जंगलातून कधी आणि कुठून मावळे बाहेर पडतील आणि कापून काढतील याचा भरवसा नाही. वरतून होणाऱ्या तोफगोळ्यांच्या माऱ्यापासून वाचत तुम्ही जरी तटबंदीपर्यंत पोचलात तरी वरून उकळंत तेल, दगड यांचा मारा. एवढ्या लेव्हल्स पार करून जर तुम्ही चुकून गडावर पोचलात तरी तिथे तुम्हाला कापायची सगळी तयारी करून बसलेल्या शूर सरदारांबरोबर लढायचं?.. इम्पॉसिबल.. शिवराय मानलं तुम्हाला..!

आता मात्र आम्ही सलग न बसता चढ चढत होतो. अहो करणार काय? बसायला जागाच कुठे होती? एक माणूस कसाबसा जाईल अशी ती पायवाट... त्यात मरणाचा पाऊस, बाजूला दरी.. कधी एकदा इथून वाचून ("सटकून") जातोय असं झालं होतं.

अधून मधून स्वाइन फ्लू चा विषय निघतच होता. स्वाइन फ्लू पासून वाचण्यासाठी लोकांनी काय काय नाही केले.. स्वारगेटच्या गटारावर मिळणारे मास्क घेतले. रामदेवबाबांनी "तुळस खा" असं सांगितल्याने पुणेकरांनी अख्ख्या पुण्यातल्या सगळ्या तुळशी मुळासकट ऊपटून खाल्ल्या. कोणी सांगितलं "निलगिरीचं तेल वापरा"... पुण्याच्या सगळ्या दुकानातले सगळे तेल २ दिवसात संपले. लिंबं, कापूर, धूप हे असेच काही स्वाइन फ्लू चे बळी. आमच्या हिरोंपैकी सगळ्यात घाबरट गोगट्यांनी "वुई आर लिव्हिंग इन अ पॅनडेमिक! " म्हणत पहिला मास्क घेतला, पहिल्यांदा घालतानाच त्याचा एक दोर तुटला आणि गोगटे परत मास्कच्या वाट्याला गेला नाही.. मोनेने अगदीच काही नाही केलं असं नको म्हणून तोंडाला रुमाल बांधला असावा एखादवेळी.. रानड्यांना मात्र या सगळ्या गोष्टी मुळी मान्यच नव्हत्या.. "नोबडी कॅन टच मी, ऍज लाँग ऍज आय ऍम रायडिंग! " असं काहितरी बरळून तो चालू लागला. याचा अर्थ काय आहे आणि तो हे अत्ता का बोलला हे कळलं तर मला मात्र नक्की सांगा!

आता आम्ही अशा ठिकाणी आलो होतो की जिथून खाली "डायरेक्ट फॉल" होता. कोणी भल्या माणसाने रेलिंग लावले होते आमच्यासारख्यांसाठी! हुश्श.. केलं बुवा पार सगळं.. समोर प्रचंड धुकं होतं. आम्ही चढतच होतो..

अचानक धुकं कमी झालं आणि डोळ्यांसमोर राजगडाची तटबंदी दिसू लागली... झप झप चढत ५-१० मिनिटातच आम्ही राजगडावर होतो. आणि समोरच एक भगवा अभिमानाने फडकत होता.. आम्हाला नवा हुरूप चढला.. थकवा नाहिसा होऊन गेला...

तिथे गेल्यावर, मावळ्यांना स्फूर्ती देणारे शिवरायच जणू येऊन आपल्याला ताकद देतात..

याहू....!! आम्ही राजगड सर केला होता. वर पोचायला आम्हाला एकूण २ तास लागले. आम्ही गेलो ती चोरदरवाजाची वाट. वर गेल्यावर समोरच एक सुंदर तलाव दिसतो.. तो "पद्मावती तलाव".. तलावाचं सौंदर्य खरोखर अवर्णनीय.

आम्ही त्या तलावावर गप्पा मारत बसलो. राजकारण, इतिहास, कविता, साहित्य ही गोगटे आणि मोन्यांची आवड.. दोघांचही वाचन चांगलं.. गांधीजी, नेहरू यांचे विचार.. भारत-पाकिस्तान, पॉलिटिक्स, इलेक्शन्स हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय.

रानड्यांसाठी मात्र गांधीजी, नेहरू ही लोकं फक्त शिव्या देण्यासाठीच आहेत. कविता, कविच्या कल्पना वगैरे त्याला कधी शिवूसुद्धा शकत नाहीत..काँग्रेस, बीजेपी सोडून दुसरे कुठले पक्ष त्याला माहित असतील असं वाटत नाही.. इतिहासात शिवाजी, इंग्रज आणि भारताचा स्वातंत्रदीन एवढ्याच गोष्टी त्याला माहीत असतील.. साहित्य (इतर) साहित्यातच राहिले तर चांगले टिकते असे उदात्त विचार.. अभ्यासाव्यतिरिक्त त्याने गेल्या २५ वर्षांत सर्व भाषा मिळून एकूण ३ ते ४ पुस्तके वाचली असतील. परीक्षेच्या आधी २ दिवसाच्यावर त्याने कधी अभ्यासाच्या पुस्तकालाही स्पर्ष केला नसेल. पण कधी कधी जास्त पुस्तके वाचून भरकटण्यापेक्षा एखादी गोष्ट ब्लाइंडली फॉलो कलेली चांगलं असतं.

नेहरू (का गांधीजी) "शिवाजी हा वाट चुकलेला देशभक्त आहे" असं म्हणाले होते.. गोगट्यांनी सुरूवात केली.. कपिलने खास माखजनी शिव्या घालत त्याला गप्प केले. माखजन हे कोकणातलं एक मोठं गाव (गाव नेहमी "छोटसं"च असतं असं काही नाही). हे गाव साप, विंचू आणि शिव्यांचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे आणि रानडे गावाची इज्जत राखून आहेत.

"शिवाजी आपलं दैवत आहे.. शिवाजी नसता तर माझं नाव अत्ता 'अब्दूल गब्दूल रानडे' असते.. " कपिल म्हणाला. आणि हे १००% पटलं.. मोने आणि मी मजा बघत होतो. मोने तसा भला पण "झोंड" (म्हंजे लबाड) माणूस. तो कधीच एक्स्ट्रीम जात नाही. दोन्ही बाजूनी मतं मांडतो.. म्हंजे "काट्याला" राग येऊ नये म्हणून तो टॉसच्या वेळी "छाप-काटा" असं म्हणेल... आणि जिंकण्याचे चान्सेस पण १०० %. लहानपणी आम्ही त्याला "कलुषा कब्जी" म्हणायचो!! वृषभ राशीचा असल्याने खादाडपणा, टापटीपपणा, वक्तशीरपणा आणि उधळेपणा त्याचात ठासून भरलेला आहे.

काढलेले सगळे फोटो ब्लूटूथने ट्रान्स्फर करायची वेळ आली होती. समीर लगेच टाळाटाळ करू लागला... तो "स्टोन एज मॅन" आहे. एखादी हाय टेक गोष्ट करणे म्हंजे त्याला रानड्यांना एखादं मोठं पुस्तक वाचण्याएवढी किंवा मोनेने राजगड चढण्याइतकीच अवघड आहे. समीरला मंदार "सरबरीत" आणि कपिल "झाम्रट झं" (अर्थ विचारू नका) म्हणतो.

तलावाच्या वरच एक मंदीर आहे. राजगड प्रचंड आहे. एका दिवसात होणे कठीण आहे. या मंदिरात रहायची आणि खायची सोय होते. आम्ही मात्र प्रत्येकी २ पोहे आणि मस्त गरम चहा पिऊन रिफ्रेश झालो.

राजगडाच्या तीन मोठ्या माचा आहेत आणि चढायला अवघड असलेला असा बालेकिल्ला. मग काय, आम्ही पुचके सरदार बालेकिल्ल्याच्या वाटेने निघालो.. फोक्शे असलो तरी सरदार होतो!!

खाली भेटलेला "तो" आगाऊ आम्हाला परत भेटला.. म्हणाला "अरे तुम्ही अजून इथेच? मी बालेकिल्ल्यावर जाऊन आलो.. अर्धा तास लागला... तुम्हाला एक-दीड तास लागेल. " त्याने शेवटचा गुन्हा केला होता... समीरचं तोंड, रानड्यांचे मोठे घारे डोळे आणि अख्खा मोने पाहून "ऑल द बेस्ट गाइज" म्हणत त्याने चक्क पळ काढला.. नंतर पाच मिनिटं मी फक्त शिव्याच ऐकत होतो... डॅम, आय वॉज लव्हिंग इट!

जाता जाता, वाटेत जोरदार पाऊस पडू लागला. एका झाडाखाली आम्ही थांबलो.. डाव्या बाजूला एक प्रचंड, काळ्या दगडाची नैसर्गिक अशी भींत होती. समीरला चांगलचं सुरसुरलं.. त्याने बॅगेतनं कुठलंतरी परदेशी सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं. साहेब अत्ताच "बल्गेरिया"ला जाऊन आले होते. त्याच्या जवळपास ७-८ परदेशवाऱ्या झाल्या होत्या... म्हणून त्याला आम्ही "फॉकलंड" म्हणायचो. (प्ली. याचाही अर्थ विचारू नका.. रानड्यांचा माखजनी शब्द आहे. ) "ही सिगरेट फक्त स्पेशल ठिकाणी ओढायची" असा त्याचा फंडा होता. समीरने चक्क दुसऱ्या काडीतच सिगरेट सुलगावली (इतरवेळा ३-४ तरी लागतातच.. त्यासुधा वारा नसताना.. ). गडावर सिगरेट पेटवल्याबद्दल त्याने शिव्या खाल्ल्याच...

पाऊस जरा कमी झाला होता.. आजूबाजूचा परिसर खूपच छान होता. हिरव्या रंगाच्या सगळ्या छटा सजल्या होत्या... झक्कास्स.....

पुढे गेल्यावर आम्ही परत एका अवघड वाटेवर आलो होतो. कोणाला माहीत होतं की मगाशी दिसलेली ती काळी प्रचंड दगडी भींत चढायची आहे? भींत पाहून मोनेच्या पायात क्रॅम्प आला. "मी नाही येत वर"..... समीरने मोनेला काय सांगितले देव जाणे.... पण १ क्विंटलच ते धूड... ती भींत चढत होतं... आणि त्यामुळे आम्हालाही धीर आला. ती वाट (Iइफ वुई कॅन कॉल इट ऍज) खरोखरच अवघढ होती... म्हंजे पाय सटकला तर काहिही होऊ शकतं. तिथेही रेलिंग होतं. ते डळमळीत रेलिंगच आमच्या आयष्याची दोरी होती. कसबसं आम्ही वर पोचलो. सगळे जीवंत होतो.. सगळे अवयवही शाबूत होते. समीरने वरती पोचल्यावर लगेच सिगरेट पेटवली. "ही सिगरेट तुला माफ आहे".. मंदार म्हणाला..

वरती एक सुंदर कमान आहे. तिथे जरा फोटोग्राफी वगैरे झाली.. आणि आम्ही पुढे चालू लागलो. पाय हळूहळू असहकार करू लागले होते पण आम्ही पुढेच रेटतच होतो. अजून वर गेल्यावर लांबूनच एक भगवा दिमाखात फडकताना दिसला.. होय.. आम्ही बालेकिल्ल्याजवळ होतो..

काळाच्या धुक्यात धुसर झालेला बालेकिल्ला दिसू लागला. राजवाड्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत.. त्या काळी ही जागा त्या तेजस्वी राजश्रीच्या तेजाने झळाळलेली होती. त्याठिकाणी मला फक्त एकच गाणं आठवलं..

"हे हिंदू शक्ती सभूंत दिप्तीतम तेजा... हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा... प्रभो शिवाजी राजा"!

(काही भाग वगळला : प्रशासक)