अनोळखी चेहरा

जाताना अलगद मला दिसला;

एक अनोळखी चेहरा;

मी उगीचच त्याच्याकडे पाहून;

स्मितहास्य केलं नेहमीसारखं.

चार पावलं चालल्यावर मला जाणवलं;

तो चेहरा माझाच पाठलाग करतोय;

माझ्या हसण्याचा तो दिवाणा;

म्हणून क्षणभर मला अभिमानच वाटला.

पुन्हा आयुष्यात पुढे जाताना;

चेहरा तोच माझ्या मागे;

कोण आहे, का असा वागतो;

म्हणून माझे मन सैरभैर झाले.

पुन्हा चार पावले चालल्यावर;

मला भितीच वाटाया लागली;

मी फटकूनच त्याला विचारले;

ही पाठलागाची रीत कसली.

तो म्हणाला तूच हसलास;

माझ्याकडे बघून जुनी ओळख असल्यासारखा;

नाही ओळखलंस का मला;

तर निघूनच जातो मी आता.

आणि क्षणभर मला वाटलं;

मी हरवत जातोय वावटळात अडकल्यासारखा;

तो चेहरा मात्र निघून गेला;

तेजाळत एखाद्या तेजःपुंजासारखा.

अन् मला समजत गेलं मी माझ्याच सुखाला;

नकळत दूर केलं होतं;

अंधारात साथ देणाऱ्या त्या चेहऱ्याला;

मी करंटेपणाने नाकारलं होतं