व्याकरण

तू सांगितलंस म्हणून
नात्यांचं व्याकरण समजून घेताना
संबंधांच्या जाती लिहू लागले तेव्हा...
तेव्हा म्हणालास,
‘’नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्ययाच्या
या खेळात पडतेसच कशाला?
नातं दोघांसाठी असतं,
अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी.
नात्याची जात एकच - नातं हीच"
प्राधान्य ठरवण्याची वेळ आली
तेव्हा हेच शब्द तुझा आधार ठरले
कारण त्या प्राधान्यात नातं दोघांचंच होतं
माझा आधारच काढून घेणारं!
***
गेल्या अवकाळी पावसात
आपण सावरलो होतो
पुन्हा अवकाळी पाऊस आलाय...
आता आवरून घ्यायचं आहे
वाहून गेलेली स्वप्नं विसरण्याचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच!
तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच
मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त
एकाकी प्रवासाची हुरहूर छातीत साठवून घेत!
या दुःखाची जात मात्र
आता मला शोधायची आहे
नात्यांच्या जातीच्या तुझ्या व्याख्येत
ती कुठं बसेल?
रचनाकाल: केव्हातरी, २००७