ऑक्टोबर १७ २००९

काळ आला होता पण वेळ आली नव्हती - सत्यकथा - ६

कृप इंडिया नावाची पुण्यातील नावाजलेली कंपनी साखर कारखान्याची मशिनरी तयार करते. तसेच साखर कारखाना उभारणीचे कामही कंत्राटाने घेते. ह्या कंपनीत आपले राजाभाऊ दाते काम करीत होते. ते कंपनीचे लिगल ऍडव्हायझर व व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम पाहत होते. कामानिमित्त त्याना देशात व देशाबाहेर कंपनीचा प्रतिनिधी म्हणून बऱ्याच वेळा फिरावे लागत होते. मला वाटते महिन्यातील पंधरा दिवस ते पुण्याबाहेरच असत. असेच एकदा कंपनीला साखर कारखान्याचे पुरवठा व उभारणीचे काम केनिया मध्ये मिळाले. त्या कामानिमित्त राजाभाऊना केनियात जावे लागले. त्याना काम मिळालेली फॅक्टरी साऊथ नियांझा शुगर फॅक्टरी नावाची असून ती नैरोबी पासून जवळ जवळ २५० ते ३०० किलोमिटर वर होती. त्यांचे बरोबर दोन जर्मन लोक कृप कंपनीने पाठवले होते. त्याना वेळ नसल्याने बाय रोड जाण्याचे ऐवजी चार्टर विमानाने ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार होते. त्या साखर कारखान्यानेच ही व्यवस्था केली होती. चार्टर विमान नविनच होते. त्यावर पायलट म्हणून एक नवीनच लायसेन्स घेतलेली बाई होती.
केनिया विषुववृत्तीय प्रदेश असल्याने तेथे दररोज दुपारी चार वाजता दोन तीन तास पाऊस पडतो. मग सर्व स्वच्छ होते. तेथे मैलोगणिक ऊसाची शेती व चहाचे मळे दृष्टीस पडतात. तो डोंगराळ भाग असल्याने पाऊस पडल्यावर सर्व पाणी निघून जाते व तो भाग कोरडा होतो. त्या दिवशी चार्टर विमानातून दाते, दोन जर्मन माणसे व कंपनीचा माणूस असे चौघेजण त्या शुगर फॅक्टरीत जाण्यास निघाले. हे विमान साधारण आकाशात पंधरा हजार फूट उंचीवर उडते. विमान सुरू झाल्यावर साधारण पंधरा मिनिटे झाली असतील नसतील, तेवढ्यात समोर काळे पावसाचे ढग दिसू लागले. त्यात पाणी असल्याने हवेच्या दाबावर कांहीतरी परिणाम झाला व त्यांचे विमान थरथरू लागले. तशातच सोसाट्याचा वारा पण सुरू झाला. समोरचे कांही वैमानिकाला दिसत नव्हते. एअरपोर्टशी असलेला वैमानिकाचा संपर्क तुटला. ती वैमानिक बाई घाबरली. ते विमान पंधरा हजार फुटावरून पांच हजार फुटापर्यंत खाली आले. तुम्ही विचार करा आपण पाच किंवा सहा मजली इमारतीतील उघड्या बाल्कनीतून जमिनीकडे पाहिले तर आपले डोळे फिरतात. फार काय आपण जायंट व्हील मध्ये बसून चक्कर मारीत असताना जेंव्हा आपला पाळणा वरून खाली येतो तेंव्हा आपल्या पोटांत कसा भीतीचा गोळा निर्माण होतो. तरी आपण त्यात सुरक्षित असतो व उंची जास्तीत जास्त चाळीस फूट असते. पण येथे विमान पंधरा हजार फूटावरून पांच हजार फूटापर्यंत सरळ खाली आले. दहा हजार फूटावरून कडेलोट केल्याप्रमाणे जीव मुठीत धरून, अक्षरशः देवाचे नाव घेऊन दाते आपण जगतो की नाही याचाच विचार करत होते. पण पाच हजार फूटावर आल्यावर विमानाचे इंजीन सुरू होऊन परत विमानाने हवेत भरारी घेतली. वर घेतल्यावर परत तीच अडचण आली. समोरचे कांही दिसत नव्हते व विमान थरथरू लागून परत खाली यायचे. असे कमीत कमी आठ ते दहा मिनिटे झाल्यावर दाते यानी आपली जगण्याची आशाच सोडून दिली. काय करणार पायलटला विमानावर ताबा मिळवता येत नव्हता. पण एकदा विमान खाली आल्यावर पायलटला एका टी इस्टेटची 
एअर स्ट्रीप दिसली. त्यामुळे तिने हिंमत करून आपले विमान त्या स्ट्रीपवर उतरवले. ते टी गार्डन कोणाचे होते कोणास ठाऊक पण त्यानी सर्वांना दिलासा दिला. सर्वजण तेथे सुखरूप उतरले. सर्वांनी विमानाचा धसकाच घेतला होता. कारण मरण्यापेक्षा आपण मरणार ही कल्पनाच मोठी पीडादायक व मनस्वास्थ्य घालवणारी होती. आपल्याला समोर मृत्यू दिसतो तेंव्हा सर्व ब्रम्हांड आठवते. आपले कुटुंब, प्रियजन सर्व डोळ्यासमोर दिसू लागतात. असा थरारक अनुभव दातेंनी घेतला होता. त्यामुळे त्या रात्री तेथील टी इस्टेटच्या गेस्ट हाऊस मध्ये त्यानी मुक्काम केला. सकाळी उठल्यावर हवामान स्वच्छ झाले होते. एअरपोर्टशी संपर्क साधून त्यानी त्यांचे उतरण्याचे ठिकाण त्याना कळवले. कंपनीने त्याना आणावयास जीप पाठवली. कारण हे लोक परत विमानात बसावयास तयार नव्हते. साखर कारखान्यात आल्यावर त्यानी देवाचे आभार मानले.


Post to Feed
Typing help hide